अन् 'पॅरालीसीस' झालेले बिबट्याचे पिल्लू धावू लागले

    18-Oct-2019   
Total Views | 134



वन विभाग आणि 'वाईल्डलाईफ एसओएस' संस्थेच्या प्रयत्नांना यश


मु्ंबई ( अक्षय मांडवकर ) - अर्धांगवायूमुळे ( पॅरालीसीस) जंगलाचा अधिवास गमावलेल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बिबट्याला 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा'तील वनकर्मचाऱ्यांनी जीवदान दिले आहे. तीन महिन्यांपूर्वी संगमनेर येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या या बिबट्यावर उपचार सुरू होते. अर्धांगवायूमुळे स्वत:च्या पायांवर चालूही न शकणारा हा बिबट्या उपचाराअंती पुन्हा धावू लागला. त्यामुळे सोमवारी रात्री त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली.

 

 
 
  

जुलै महिन्यात संगमनेर येथील हिवरगाव-पावसातील शिवारात सहा महिन्यांचे बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले होते. या पिल्लाच्या शरीरावर ठिकठिकाणी मार लागल्यामुळे त्याला उभे देखील राहता येत नव्हते. त्यामुळे उपचाराकरिता त्याची रवानगी जुन्नर येथील 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा'त करण्यात आली. केंद्रात दाखल झाल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी पार पडली. या तपासणीत पिल्लाच्या मानेवर दात रुतल्याच्या खुणा आढळल्या. दुसऱ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मानेवर जोरदार आघात झाल्याने त्याच्या परिणाम मज्जासंस्थेवर पडला. त्यामुळे पक्षाघात येऊन या पिल्लाचे चारही पाय निकामी झाले. मात्र, अशा परिस्थितीतही 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राती'ल वन आणि 'वाईल्डलाईफ एसओएस' संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी हार न मानता त्याच्यावर उपचार केले. तीन महिने दिवसरात्र उपचारामध्ये सातत्य ठेवण्यात आले. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. अखेरीस सोमवारी रात्री त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 
 

 
 
 
 या पिल्लाच्या अर्धांगवायूवर उपचार करण्यासाठी फिजीओथेरपीचा अवलंब करण्यात आल्याची माहिती 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा'चे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अजय देशमुख यांनी दिली. दिवासातून तीन वेळा त्याच्यावर फिजीओथेरपी करण्यात येत होती. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो आक्रमक असायचा. त्यामुळे त्याला जबरदस्ती खाऊ घालावे लागत होते. मात्र, काही कालावधीनंतर तो स्वत:हून फिजीओथेरपीला प्रतिसाद देऊ लागल्याचे देशमुख यांनी सांगितले. उपचारामध्ये सातत्य ठेवल्याने त्याच्या निकामी झालेल्या चारही पायांमध्ये पुन्हा हालचाल सुरू झाली आणि तो चालू लागला.
 
 

 
 
 
तीन-साडे तीन महिन्यांच्या या संपूर्ण कालावधीत त्याच्या स्वभावात होणाऱ्या बदलांचीही नोंद करण्यात आली. सुरुवातीच्या काळात त्याच्यामध्ये असलेला आक्रमकपणा उपाचारादरम्यान निवळला होता. परंतु, प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरुवात झाल्यानंतर तो पुन्हा आक्रमक झाला. नैसर्गिक अधिवास सुटका करण्याच्या हेतूने या पिल्लाला पिंजराबंद अधिवासाची सवय करुन देण्यात आली नाही. त्यासाठी त्याला एकांतामध्ये ठेवणे, कोबंडी पकडण्यासाठी उद्युक्त करणे अशा निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे देशमुख म्हणाले.
 
 
 
 नेहमीच प्रयत्नशील...
माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रामध्ये दाखल होणाऱ्या बिबट्यांना पिंजराबंद अधिवासात ठेवण्याऐवजी त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका कशी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  जखमी बिबट्यांवर वेगवेगळ्या वैद्यकीय पद्धतीचा अवलंंब करुन उपचार करण्यात येतात. जेणेकरुन त्यांच्या प्रकृतीत सुधारण होईल. संगमनेर येथील पॅरालीसीस झालेला बिबट्यावर उपचार करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आमच्या टीमला यश मिळाले आहे. - जयरामेगौडा आर. , उपवनसंरक्षक, जुन्नर 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121