एप्रिलमध्ये चांद्रयान-२, २०२१ मध्ये ‘गगनयान’

    11-Jan-2019
Total Views | 17


बंगळुरू : चंद्राच्या पृष्ठभागाचा आणखी अभ्यास करण्याच्या मोहिमेतील ‘चांद्रयान-२’ हे अंतराळयान येत्या एप्रिल महिन्यात अंतराळात झेपावणार आहे, अशी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी शुक्रवारी येथे केली. “२०२१ मध्ये ‘गगनयान’ हे मानवी मिशन अंतराळात पाठविण्याची तयारीही आम्ही सुरू केली आहे,” असेही सिवान यांनी जाहीर केले.

 

‘चांद्रयान-२’ साठी इस्रोने आधी यावर्षीच्या १६ जानेवारी ते १६ फेबु्रवारी या काळातील कोणत्याही एका दिवसाची निवड करण्याचे ठरविले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच ही मोहीम आता अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत इस्रोने दिले होते. सुमारे ८०० कोटी रुपये खर्चाची ‘चांद्रयान-२’ ही मोहीम ‘चांद्रयान-१’ पेक्षा अनेक पटींनी अत्याधुनिक आणि प्रगत असल्याची माहिती सिवान यांनी पत्रकारांना दिली. ‘चांद्रयान-२’ या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कोणत्याही दिवशी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. एप्रिलच्या मध्यात या मोहिमेची शक्यता फार जास्त आहे, असे सिवान यांनी सांगितले.

 

‘गगनयान’चीही तयारी जोरात 

एका महिलेसह सात अंतराळवीरांना अंतराळात पाठविणार्‍या, संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘गगनयान’ या मानवी मोहिमेची तयारीही अगदी जोरात सुरू आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत भारतीय माणूस अंतराळात पाठविण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत,” असे सिवान म्हणाले. भारत लवकरच अंतराळवीर अवकाशात पाठवेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील स्वातंत्र्यदिनी केली होती. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला. गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळात मानव पाठविणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.

 

७ अंतराळवीरांसह अवकाशात भरारी घेण्याआधी, दोन मानवविरहित अंतराळयाने अवकाशात झेपावणार आहेत. यातील पहिले यान डिसेंबर २०२० मध्ये व दुसरे यान जुलै २०२१ मध्ये अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे. गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड भारतीय हवाई दल आणि इस्रो संयुक्तपणे करणार आहे,” असे ते म्हणाले. “या अंतराळवीरांना प्राथमिक प्रशिक्षण भारतात देण्यात येईल, तर प्रगत प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात येईल. अंतराळवीरांमध्ये एका महिलेचाही समावेश असेल. मानवी अंतराळयान पाठविण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे, ते देशात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आले असले, तरी यात रशियाचीही मदत घेतली जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121