ते पंधरा दिवस : १ ऑगस्ट, १९४७

    01-Aug-2018   
Total Views |
 
 
 
 
 
 
शुक्रवार. १ ऑगस्ट, १९४७. हा दिवस अचानकच महत्वाचा होऊन गेला. या दिवशी काश्मीर च्या संदर्भात दोन गोष्टी घडल्या, ज्या पुढे खूप महत्वाच्या ठरणार होत्या. त्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी तसा काही संबंध नव्हता. पण पुढे घडणाऱ्या रामायण-महाभारतात या दोन गोष्टींचं स्थान आवश्यक असणार होतं.
 
 
१ ऑगस्ट ला गांधीजी श्रीनगर ला पोहोचले, ही ती पहिली गोष्ट. गांधीजींचा हा पहिलाच काश्मीर दौरा.
 
 
यापूर्वी सन १९१५ मध्ये, अर्थात गांधीजी नुकतेच दक्षिण अफ्रिकेतून परत आले असताना आणि पहिलं विश्व युद्ध चालू असताना, काश्मीरचे महाराजा हरीसिंह यांनी गांधीजींना काश्मीर भेटीचं व्यक्तिगत निमंत्रण दिलं होतं. महाराज तेव्हा फक्त वीस वर्षांचे होते. मात्र १९४७ मधे सारंच काही नाटकीयरित्या बदललेलं होतं. या खेपेस महाराजांना आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाला गांधीजींचा दौरा नको होता. स्वतः महाराज हरीसिंहांनी या संदर्भात एक पत्र व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांना लिहिलं होतं. त्यात ते म्हणाले होते, “सर्व दृष्टीने, सर्वकष विचार करता आम्हाला हेच सुचवावसं वाटतं की महात्मा गांधींनी त्यांचा नियोजित काश्मीर दौरा या वेळेस रद्द करावा. आणि त्यांना जर यायचेच असेल तर त्यांनी शरद ऋतू संपल्यावर यावं. आम्ही परत सांगू इच्छितो, गांधीजी किंवा अन्य कोणाही राजकीय पुढाऱ्याने काश्मीर मधील स्थिती सुधारल्या शिवाय येथे येऊ नये.”
 
 
म्हणजेच ‘यजमानांचा विरोध असतानाही त्यांच्या घरी जावं’ असा हा प्रसंग होता. गांधीजींना ही काही प्रमाणात याची जाणीव होती. काश्मीर हा आता भारत आणि पाकिस्तान, या दोघांसाठी कळीचा मुद्दा होता. स्वातंत्र्य अक्षरशः दोन आठवड्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं. आणि अजूनही काश्मीर ने आपला निर्णय जाहीर केलेला नव्हता.
 
 
म्हणूनच गांधीजींना काश्मीरचा हा दौरा म्हणजे ‘काश्मीर भारतीय संघराज्यात विलीन व्हावं, अश्या अर्थाने आपण कॅंपेन करतोय’ असं चित्र नको होतं. ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरणारी झाली असती, असं त्यांना वाटत होतं. २९ जुलै ला, काश्मीर दौऱ्यावर निघण्यापूर्वी गांधीजींनी दिल्लीतल्या आपल्या प्रार्थना सभेत म्हटलं होतं – “मी महाराजांना भारतात शामिल व्हा आणि पाकिस्तानात होऊ नका, असं सांगायला जात नाहिये. काश्मीर चे खरे मालक म्हणजे काश्मिरातली जनता आहे. तिनेच ठरवायचे की कुठे शामिल व्हायचं ते. आणि म्हणूनच मी काश्मिरात काहीही सार्वजनिक काम करणार नाहिये. अगदी प्रार्थना सुध्दा. ती माझी वैयक्तिक असेल..!”
 
 
गांधीजी रावळपिंडी मार्गाने काश्मीरच्या श्रीनगरमध्ये १ ऑगस्टला दाखल झाले. या वेळेस त्यांना महाराजांचे निमंत्रण नसल्याने ते ‘किशोरीलाल सेठी’ यांच्या घरी थांबले. त्यांचं हे घर भाड्याचं असलं तरी चांगलं प्रशस्त होतं. आजच्या श्रीनगर मधल्या बार्झुल्याच्या ‘बोन एंड जॉइंट हॉस्पिटल’च्या अगदी जवळ हे घर होतं. हे सेठी साहेब जंगलांचे ठेके घ्यायचे. ते कॉंग्रेसच्या जवळचे होतेच, पण नेशनल कॉन्फ्रेंसच्याही जवळ होते. मात्र त्यावेळी नेशनल कॉन्फ्रेंसचे नेते शेख अब्दुल्ला यांना महाराजांनी तुरुंगात डांबले होते. नेशनल कॉन्फ्रेंसच्या अनेक नेत्यांना काश्मीर बाहेर हाकलण्यात आले होते. शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली हे सर्व नेते / कार्यकर्ते महाराजां विरुद्ध कट करत होते, असा त्यांच्यावर आरोप होता.
 
 
आणि म्हणूनच, १ ऑगस्टला गांधीजी जेंव्हा रावळपिंडी च्या मार्गाने श्रीनगरला येत होते, तेव्हा चकलाला ला बख्शी गुलाम मोहंमद आणि ख्वाजा गुलाम मोहम्मद सादिक, या नेशनल कॉन्फ्रेंसच्या नेत्यांनी त्यांना ‘कोहला ब्रिज’ पर्यंत सोडलं आणि ते दोघंही परत लाहोरला गेले. गांधीजींच्या बरोबर त्यांचे व्यक्तिगत सचिव प्यारेलाल आणि दोन पुतण्या होत्या. श्रीनगरमध्ये प्रवेश केल्यावर गांधीजी सरळ किशोरीलाल सेठी यांच्या घरी गेले. तिथे थोडा विश्राम केल्यावर त्यांना दल सरोवरावर नेण्यात आले.
 
 
गांधीजींच्या या संपूर्ण दौऱ्यात नेशनल कॉन्फ्रेंसचीच माणसं त्यांच्या आजुबाजूला होती. हे असं कां..? तर काश्मीरच्या या पहिल्या भेटी आधी गांधीजींनी नेहरूंकडून सर्व माहिती घेतली होती. त्यांनी स्वतःच या काश्मीर दौऱ्यात ही माहिती दिली. काश्मिरात पंडित नेहरूंचे सर्वात जवळचे मित्र होते – शेख अब्दुल्ला, जे तुरुंगात बंदिस्त होते. अर्थात तरीही शेख साहेबांच्या बेगमेनं आणि इतर अनुयायांनी गांधीजींची सर्व व्यवस्था बघितली होती.
 
 
काश्मीरमध्ये गांधीजींना भेट देणारी पहिली अधिकृत शासकीय व्यक्ति होती – ‘रामचंद्र काक’. महाराजा हरीसिंहांचे अत्यंत विश्वासपात्र असलेले, काश्मीरचे प्रधान. नेहरूंच्या ‘हेट लिस्ट’ मधे सर्वात वरचं स्थान असलेली व्यक्ति. कारण जेव्हा १५ मे, १९४६ ला शेख अब्दुल्लांना, त्यांच्या काश्मीर विरोधी कारस्थानासाठी बंदिस्त करून तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा नेहरूंनी त्यांचं वकीलपत्र घेण्यासाठी काश्मीरला येण्याची घोषणा केली. या काक महाशयांनी नेहरूंना काश्मिरात प्रवेश बंदी घातली आणि मुजफ्फराबाद जवळ नेहरूंना अटक केली. नेहरूंना याचा अर्थातच प्रचंड राग होता..!
 
 
 
 
 
या रामचंद्र काक यांनी गांधीजींना सील केलेलं महाराजांचं पत्र दिलं. हे पत्र म्हणजे गांधीजींना भेटीचं निमंत्रण होतं. तीन ऑगस्टला महाराजांच्या ‘हरी निवास’ या निवासस्थानी ही भेट ठरली.
 
 
नेहरूंच्या ब्रीफिंगप्रमाणे गांधीजींच्या या संपूर्ण काश्मीर प्रवासात त्यांच्या भोवती वेढा होता तो नेशनल कॉन्फ्रेंसच्या कार्यकर्त्यांचाच. शेख साहेबांच्या अनुपस्थितीत बेगम अकबर जहाँ आणि मुलगी खलिदा ह्या गांधीजींच्या तीन दिवसांच्या वास्तव्यात अनेकदा त्यांना भेटायला आल्या.
 
 
दिनांक १ ऑगस्ट ला श्रीनगरात गांधीजींनी एकाही राष्ट्रवादी हिंदू नेत्याची भेट घेतली नाही..!
 
 
 
१ ऑगस्ट ला च दुसरीही एक महत्वाची घटना घडत होती, ज्यामुळे पुढील अनेक वर्षांपर्यंत भारतीय उपखंडात असंतोष राहणार होता. आणि ही घटना देखील काश्मीरच्या संदर्भातच होती. महाराजा हरीसिहांच्या नेतृत्वाखाली असलेलं काश्मीर राज्य बरंच मोठं होतं. सन १९३५ मधे त्यातील ‘गिलगीट एजेन्सी’ हा भाग ब्रिटिशांनी काढून, ब्रिटीश साम्राज्याशी जोडला. मुळात संपूर्ण आणि अखंड काश्मीर हे या पृथ्वीवरचं अक्षरशः नंदनवन आहे. त्यातून सामरिक आणि सैनिकी दृष्टीने काश्मीर हे फार महत्वाचं राज्य होतं आणि आहे. तीन देशांच्या सीमा या राज्याला मिळत होत्या. १९३५ मध्ये दुसरं विश्व युद्ध जरी लांब असलं तरी जागतिक राजकारणात मोठे फेरबदल व्हायला सुरुवात झाली होती. रशियाची शक्ती वाढत होती. आणि म्हणूनच काश्मीरचा रशियाला जोडणारा जो भाग, अर्थात ‘गिलगीट एजेन्सी’, होता तो ब्रिटिशांनी महाराजा हरीसिहांपासून काढून घेतला.
  
 
पुढे झेलम मधून बरंच पाणी वाहून गेलं. दुसरं विश्व युध्द संपलं. त्या युध्दात भाग घेतलेले सारेच देश खिळखिळे झाले होते. ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व परिस्थितीत ‘गिलगीट एजेन्सी’ (अर्थात गिलगीट-बाल्टीस्तान हा प्रदेश) सारख्या दुर्गम भागावर नियंत्रण ठेवण्यात ब्रिटिशांना कसलंही स्वारस्य नव्हतं. आणि म्हणूनच, भारताला अधिकृत स्वातंत्र्य देण्याआधीच, १ ऑगस्ट ला, ब्रिटिशांनी ‘गिलगीट एजेन्सी’ हा भाग महाराजांना सोपविला. १ ऑगस्ट, १९४७ च्या सूर्योदयाला गिलगीट-बाल्टीस्तान मधील सर्व जिल्हा मुख्यालयात यूनियन जेक च्या जागी काश्मीर चा राजध्वज मोठ्या दिमाखात फडकत होता.
 
 
मात्र या हस्तांतरणाला महाराज कितीसे तयार होते..? फारसे नाही..!
 
 
या भागाच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी ‘गिलगीट स्काउट’ ही बटालियन तैनात केली होती. काही ब्रिटीश अधिकारी सोडले तर अख्खी फौज मुसलमान होती. १ ऑगस्ट च्या हस्तांतरणाबरोबर ही मुस्लिमांची फौज सुध्दा महाराजांजवळ आली. महाराजांनी या प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून ब्रिगेडियर घन्सारा सिंह यांची नेमणूक केली. मात्र त्यांच्यासोबत ‘गिलगीट स्काउट’ चे मेजर डब्लू. ए. ब्राऊन आणि कॅप्टन ए. एस. मेथिसन हे अधिकारी दिले. ‘गिलगीट स्काउट’ चा सुभेदार मेजर बाबर खान देखील या लोकांबरोबर होता.
 
 
हे करताना महाराजांना असं मुळीच वाटलं नसेल की फक्त दोन महिने तीन दिवसांनी पूर्ण ‘गिलगीट स्काउट’ गद्दारी करेल आणि गव्हर्नर ब्रिगेडियर घन्सारा सिंह यांनाच बंदी बनवेल...!
 
 
१ ऑगस्ट च्या ह्या गिलगीट च्या हस्तांतरणाने भविष्यातील महत्वाच्या घटनांची नांदी लिहून ठेवली..!
 
 
अखंड हिंदुस्थानाचं खंडित स्वातंत्र्य उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं असताना देशाच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर प्रचंड नरसंहार चालला होता. स्वातंत्र्याचा आणि अर्थातच विभाजनाचा दिवस जसा जसा जवळ येत जाईल, तसा तसा हा नरसंहार वाढत जाईल असा ब्रिटीश अधिकाऱ्यांचा होरा होता. म्हणूनच त्यांनी, ह्या दंगलीची आग कमी करण्यासाठी हिंदू, मुस्लिम आणि शीख अश्या मिश्र सेनेची कल्पना मांडली. त्यानुसार ‘पंजाब बाउन्ड्री फोर्स’ ही सेना निर्माण करण्यात आली. यात अकरा मिश्रित इन्फंट्री होत्या. एकूण सैनिक होते पन्नास हजार आणि नेतृत्व करणारे चार ब्रिगेडियर होते – मोहम्मद अयूब खान, नासीर अहमद, दिगंबर ब्रार आणि थिमय्या. १ ऑगस्टला या चौघाही ब्रिगेडियर्सनि लाहोरला त्यांच्या तात्पुरत्या मुख्यालयात ‘पंजाब बाउन्ड्री फोर्स’ च्या कामाला सुरुवात केली. मात्र फक्त पंधराच दिवसांनी, ह्या मिश्रित सेनेला त्यांचं मुख्यालय, लाहोर, जळताना बघावं लागणार होतं..!
 
 
 
याच वेळी दूर कलकत्त्यात एक नाट्य रंगात आलेलं होतं....
 
 
कॉंग्रेस चे वरिष्ठ नेते आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे मोठे भाऊ शरद चंद्र बोस यांनी १ ऑगस्ट ला कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. शरद बाबू हे तसं ज्वलजहाल व्यक्तिमत्व. चाळीस वर्ष कॉंग्रेस मध्ये राहून प्रामाणिकपणाने आणि प्राणपणाने लढलेला हा माणूस. १९३० च्या ब्रिटीश इंटलीजेंस च्या रिपोर्ट मध्ये उल्लेख आहे – “He is a man, who assisted the revolutionary movement for years by means of his Purse, his Press and his Prestige, and who was unquestionably a most dengerous opponent of Government.”
 
 
शरद चंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात तसं बरंच साम्य. दोघांचाही जन्म १८८९ चा. दोघांचंही शिक्षण इंग्लंड मध्ये झालं. दोघांनीही कायद्याची पदवी इंग्लंड मधूनच घेतली. तरुण पणात दोघांचेही विचार डाव्या विचारधारेकडे झुकणारे होते. पुढे दोघेही कॉंग्रेस मध्ये सक्रीय झाले. दोघांचेही आपसातील संबंध चांगले होते.
 
 
मात्र १९३७ च्या बंगाल च्या प्रांतिक निवडणुकीत कॉंग्रेस ला सर्वाधिक ५४ जागा मिळाल्या. त्या खालोखाल ‘कृषक प्रजा पार्टी’ आणि ‘मुस्लिम लीग’ ला प्रत्येकी ३७ जागा मिळाल्या. बंगाल कॉंग्रेसचे नेते या अधिकाराने शरद चंद्र बोस यांनी कॉंग्रेसला आणि प्रामुख्याने गांधी – नेहरूंना गळ घातली की कॉंग्रेस आणि कृषक प्रजा पार्टी यांनी मिळून संयुक्त सरकार स्थापन केले पाहिजे. मात्र कॉंग्रेसने हे ऐकले नाही. सर्वाधिक जागा मिळूनही कॉंग्रेस पक्ष विरोधी बाकांवर बसला आणि मुस्लिम लीगने कृषक प्रजा पार्टीच्या मदतीने सरकार स्थापन केले. शेर-ए-बंगाल, ए. के. फजलुल हक हे बंगालचे ‘प्रधानमंत्री’ झाले. तेव्हापासून बंगालमध्कॉंयेग्रेस चा पाया कमकुवत झाला. त्याची परिणीती पुढे ९ वर्षांनी सुऱ्हावर्दी सारख्या मुस्लिम लीग च्या ‘पंतप्रधाना’ मध्ये झाली, ज्याच्या नेतृत्वात १९४६ मध्ये ‘डायरेक्ट एक्शन डे’ च्या दिवशी पाच हजार निर्दोष हिंदूंची अमानुष कत्तल झाली...!
 
 
या सर्व घटना शरद बाबूंना व्यथित करत होत्या. ते वेळोवेळी या संबंधात कॉंग्रेस नेतृत्वाला, आणि विशेषतः नेहरूंना लिहित होते. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. १९३९ च्या त्रिपुरी (जबलपुर) कॉंग्रेस च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंनी सुभाषबाबूंच्या विरोधात जी प्रचाराची राळ उठवली होती, त्यामुळेही शरद बाबूंचे चिडणे स्वाभाविकच होते.
 
 
आणि या सर्वांवर कुरघोडी म्हणजे गांधी – नेहरूंनी बंगालच्या विभाजनाला दिलेली मान्यता. शरद बाबूंना हे पटणारं नव्हतं. आणि म्हणूनच १ ऑगस्टला त्यांनी आपल्या चाळीस वर्ष जुन्या, कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली..! १ ऑगस्टलाच शरद बाबूंनी ‘सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ पक्षाची स्थापना केली. ‘देशाची फाळणी आणि देशात निर्माण झालेलं अराजकतेचं वातावरण हे नेहरूंच्या नेतृत्वाचे अपयश आहे’ असं त्यांनी जोरकस पणे मांडलं.
 
 
१ ऑगस्ट. देशात घडणाऱ्या प्रचंड आणि वेगवान घडामोडींचा दिवस आता मावळायला आला होता. पंजाब मात्र पेटलेलाच होता. रात्रीच्या त्या भयाण काळोखात पंजाब, सिंध, बलोचीस्तान इथल्या अनेक गावांमधून जळणाऱ्या घरांच्या भेसूर अग्निज्वाला दूर दूरवर दिसत होत्या. संघाचे अठ्ठावन हजार स्वयंसेवक संपूर्ण पंजाबात हिंदू – शिखांचं रक्षण करण्यासाठी दिवसरात्र एक करत होते. बंगालमध्ये परिस्थिती अराजकतेच्या दिशेने वाटचाल करत होती....
 
 
स्वातंत्र्य आणि त्याबरोबरचे विभाजन आता फक्त चौदा दिवस दूर होते...!
 
 
 
 
 
प्रशांत पोळ
‘मैत्र’, ११२६, समाधान हॉस्पिटल च्या बाजूला,
राईट टाऊन,
जबलपुर – ४८२ ००२
भ्रमणध्वनी : ०९४२५१ ५५५५१ ई-मेल : [email protected]
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रशांत पोळ

आयटी क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव. विविध मोठ्या कंपन्यांसाठी आयटी कन्सल्टंट. 'भारतीय ज्ञानाचा खजिना' या पुस्तकाचे लेखक. भारतीय इतिहासावर गहन अभ्यास. साहित्य, संस्कृती, इतिहास, तंत्रज्ञान या विषयावर लेखनाची आवड. हिंदुत्ववादी विचारधारा जोपासणारे लेखक.