कांचनकलेची किमया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018   
Total Views |


 

कांचन यांचा कलाक्षेत्रातील प्रवासही तसा अगदी खडतर. कुठल्याही कलामहाविद्यालयातून रीतसर शिक्षण न घेता कांचनने आवडीपोटी कुंचला हाती घेतला
 

उत्तम कलाकार होण्यासाठी ती कला अगदी उपजत असावी लागते. रीतसर शिक्षणाने निश्‍चितच हातच्या कलेला धार लावता येते, सफाईदारपणाही आत्मसात करता येतो. पण, सकलमनाने कलासक्त असणार्‍यांना शिक्षणाचे बंध कधीही अडसर ठरत नाहीत. मुंबईच्या कलाकार कांचन महंते या त्यांपैकीच एक. नुकतेच जहांगीर कलादालनातील त्यांचे बुद्धांच्या आखीवरेखीव चित्रांचे प्रदर्शन पार पडले आणि विशेष म्हणजे त्यांची सगळीच्या सगळी चित्रं चांगल्या किमतीला विकलीही गेली. त्यांच्या कॅनव्हासने बुद्धमुद्रांमधील टिपलेले भाव मनाला खरंच बुद्धांच्या करुणेच्या, अहिंसेच्या मार्गाकडे घेऊन जातात....

 

आज याच आवडीसाठी त्यांनी आपले जीवन पूर्णत: समर्पित केले. गाठीशी पैसे नसताना, पै अन् पै वाचवून केवळ कलेसाठी त्या जगत होत्या. सहसा, या क्षेत्रातील अनुभवाप्रमाणे, नवोदित कलाकारांसाठी सुरुवातीचा काळ हा निश्‍चितच आव्हानात्मक ठरतो. विशेषत्वाने असे कलाकार ज्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमीही अगदी मध्यमवर्गीय असते. कुटुंबाकडूनही कलाकारांना बर्‍याचदा आधार मिळतोच असे नाही. म्हणूनच कांचन अशा कलाकारांना सल्ला देतात की, “केवळ आवड असेल तरच या क्षेत्रात उतरा, पैशासाठी कुंचला हाती घेऊ नका.” कारण, पैशासाठी चित्र रंगवल्यावर ती विकली जातीलच याची शाश्‍वती नाही, पण तीच चित्रं जर जीव ओतून रेखाटली, तर ती मेहनत कामी येतेच. त्यामुळे याच क्षेत्राला अगदी चिकटून राहिलो, धीर ठेवला की यश नक्कीच मिळते, हेही कांचन सांगायला विसरत नाहीत.

 

आगामी काळातही अशीच कलारसिकांना मंत्रमुग्ध करतील, अशी चित्रं कांचन यांच्या कुंचल्यातून रंगत राहो, हीच सदिच्छा...

@@AUTHORINFO_V1@@