'संजू'मुळे मत परिवर्तन होईलही कदाचित; पण सत्य बदलेल का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
राजकुमार हिरानीला रसिकांची अचूक 'नस' जितकी चांगल्या रितीने सापडली आहे, तितकी बहुतेक खूप कमी दिग्दर्शकांना सापडल्याचे सध्या बॉलिवूडमध्ये चित्र आहे. हिरानी यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात 'इमोशन्स'ला अनन्यसाधारण महत्व दिलं आणि गोष्ट सांगण्याची एक अनोखी खुबी त्यांनी आत्मसात केली. 'संजू' मधेही त्यांचे हे सगळे गुण प्रकर्षाने दिसून येतात. संजू बघितल्यावर खंत एकच वाटते की 'पीके' किंवा 'थ्री इडियट्स' च्या मनोरंजनाची पातळी त्यांना इथे गाठता आलेली नाही. कारण ही एक काल्पनिक कथा नसून सत्य घटनेवर आधारित असलेला हा संजय दत्तचा बायोपिक होता.
 
 
 
संजू मधून नेमकं काय दिसणार रादर हिरानी यांना काय दाखवायचं हे ट्रेलर बघितल्यावर स्पष्ट झालच होतं. उत्सुकता एवढीच होती की ते कितपत पटेल असं दाखवलंय. संजूचं परीक्षण करताना मुळातच ते दोन भिन्न पातळ्यांवर करावं लागेल. एक म्हणजे कलाकृती म्हणून आणि दुसरं म्हणजे संजय दत्तच्या जीवनात घडलेल्या घटनांचे सादरीकरण. आता मनोरंजनाच्या पातळीवर हिरानी स्टाईल यात सगळंच आहे. कॉमेडी, ड्रामा, इमोशन, श्रवणीय संगीत, रोमान्स, डबल मिनींग संवाद याचा भरणा संजू मध्ये आहेच, पण बऱ्याच ठिकाणी इमोशनल सीनचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः संजूचे आई किंवा वडिलांसोबतचे सीन अधिक भावतात. हेच हिरानी यांच्या दिग्दर्शनाचे यश आहे असे म्हणावे लागेल. 'कर हर मैदान फते' हे या चित्रपटातलं मला भावलेलं सगळ्यात जबरदस्त गाणं आहे.
 
पण हा चित्रपट केवळ एक सामान्य कथा नव्हती त्यामुळे त्याकडे वेगळ्या नजरेने बघणे तितकेच महत्वाचे आहे. संजय दत्तच्या आयुष्याला १९९३ मुंबईत झालेला बॉम्ब हल्ला हा कलाटणी देऊन गेला व त्यामुळेच त्याच्यावर दहशतवादी हा टॅग जोडला गेला. आता हिरानी यांना हाच 'टॅग' पुसायचाय की काय असं सतत चित्रपट बघताना वाटत राहतं. त्यांनी चित्रपटात यासाठी दिलेले संदर्भ 'दहशतवादी' हा टॅग पुसण्यासाठी फारच बाळबोध वाटतात. चित्रपटाच्या आशयाच्या अंगाने विचार केल्यास मध्यंतरानंतर चित्रपट फक्त 'आय एम नॉट ए टेररिस्ट' हेच बिंबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच हा चित्रपट संजय दत्तची इमेज बदलण्याच्या दृष्टीने काढला असल्याची शंका मनात आल्याशिवाय राहात नाही. संजय दत्तच्या आयुष्यातील इतर काही घडामोडीवर देखील भाष्य करायला हवं होतं असं वाटतं. म्हणजे चित्रपट पहिला एक तास फक्त संजूचे ड्रग ऍडिक्शन, त्याचे रुबी सोबतचे अफेर आणि रॉकीचं प्रदर्शन याबद्दलच बोलतो. उर्वरित वेळात संपूर्ण पडदा हा दहशतवादाची पार्श्वभूमी असणारा आहे. या दोन-तीन घटनांच्या पलीकडे चित्रपट जातच नाही. दुसऱ्या बाजूने विचार केल्यास हे या चित्रपटाचे अपयश म्हणावे लागेल.
 
रणबीर कपूरने मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलंय. तसा तो 'बॉर्न टॅलेंटेड ऍक्टर' आहेच, पण तमाशा किंवा जग्गा जासूस अशा चित्रपटांची निवड करून तो स्वतःवर अन्याय करून घेतो एवढंच. पण संजूहा त्याच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरेल. या वर्षाचं सर्वोकृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक रणबीरला मिळाल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको. याशिवाय परेश रावल आणि विकी कौशल यांनी रणबीरला भन्नाट साथ दिली आहे. बाप आणि मित्र साकारताना त्यांनी अतिशय संयमी अभिनय केला आहे. मनीषा कोईराला देखील छोट्या भूमिकेत आपली छाप पाडून जाते. बाकी सोनम, अनुष्का, दिया यांचा फार प्रभाव जाणवत नाही.
 
शेवटी चित्रपट म्हणून हिरानी यांनी आणखी एक मास्टरपीस बनवला आहे असं म्हणता येईल. पण त्यांचे आधीचे चार चित्रपट बघून जी मजा आली होती किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या त्या संजूमध्ये दिसत नाहीत. उलट मला तर हिरानी यांनाच एक प्रश्न विचारावासा वाटतो की 'संजू' मधून तुम्ही संजय दत्तची 'टेररिस्ट' ही इमेज बदलण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे, यामुळे काही लोकांचे मतपरिवर्तनही कदाचित होऊ शकेल पण यामुळे सत्य बदलू शकेल का?
 
 
-----
@@AUTHORINFO_V1@@