मराठा समाजातील तरुणांना तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे

    19-Jun-2018
Total Views | 74



महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी सुलभपणे कर्ज मिळावे, यासाठी बँकांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी दिले. या योजनेसंदर्भातील बँकांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करून कर्जपुरवठा सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरुणांसाठी सुरू असलेल्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणार्‍या तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी विविध बँकांचे अधिकारी, बँकर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बँकांच्या प्रतिनिधींना या योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, आर्थिक मागास समाजातील विशेषत: मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. व्याज परतावा योजनेतील व्याजाची रक्कम राज्य शासन देणार आहे तर गट प्रकल्पासाठी महामंडळ कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे एकप्रकारे या नवउद्योजकांना मोठा हातभार लागणार असून आतापर्यंत राज्यातील सुमारे ९ हजार ५०० तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि उद्योग उभारणीसाठी उत्सुकता दाखविली आहे. अनेक युवकांनी महामंडळाकडून लेटर ऑफ इंटेट देखील प्राप्त केले आहे. मात्र, बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी तरुणांना अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी व उद्योग उभारणीसाठी महामंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये मार्गदर्शक कार्यालये सुरू करण्यात आली असल्याचे ते यावेळी म्हणाले. व्याज परताव्याची हमी महामंडळ देत असल्यामुळे बँकांनी या योजनेसाठी कर्जपुरवठा करावे, असे आवाहनही महसूलमंत्र्यांनी यावेळी केले.

अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121