महासागरांची महती... भाग १६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2018   
Total Views |


 


मागील लेखात आपण जगातील विविध समुद्रांची माहिती घेतली. याशिवाय पृथ्वीवर सर्वांत मोठे असे पाच महासागर आहेत - प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर व आर्क्टिक महासागर. आजच्या लेखातून या प्रत्येक महासागरांबद्दल जुजबी माहिती व त्यांची भूशास्त्रीय वैशिष्ट्ये बघूया...


.प्रशांत महासागर (Pacific Ocean) - हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे. हा उत्तरेस आर्क्टिक महासागर ते दक्षिणेस दक्षिण महासागर व पूर्वेस अमेरिका खंड ते पश्चिमेस आशिया व ऑस्ट्रेलिया खंड इतका पसरलेला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे १६ कोटी, ५२ लाख चौरस किलोमीटर आहे. हा इतका मोठा आहे की, पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी जवजवळ ३३ टक्के पृष्ठभाग, तर एकूण जलीय पृष्ठभागापैकी साधारण ५० टक्के पृष्ठभाग या एकाच महासागराने व्यापलेला आहे. या महासागराचेही दोन भाग पडतात. त्यापैकी विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला ‘उत्तर प्रशांत महासागर’ (Northern Pacific Ocean), तर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागाला ‘दक्षिण प्रशांत महासागर’ (Southern Pacific Ocean) असे म्हणतात. या महासागराची सरासरी खोली चार हजार मीटर आहे. जगातली सर्वात खोल जागा मरियाना घळई (Mariana Trench) हीसुद्धा याच महासागरात आहे. तिची खोली जवळजवळ ११ हजार मीटर आहे. या महासागराबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या महासागराचा सामुद्रिक ठोकळा (Oceanic Plate) हा कालपरत्वे पूर्वेकडीलउत्तर व दक्षिण अमेरिका खंडाखाली चालला आहे. यामुळे या प्लेटच्या सर्व बाजूंना सबडक्शन झोन तयार झाला आहे. यामुळे याच्या जवळजवळ सगळ्या किनार्‍यांवर सक्रिय व निष्क्रीय ज्वालामुखी आहेत. म्हणून येथे भूकंप व ज्वालामुखींच्या उद्रेकाचा धोका कायम असतो. याच गोष्टीमुळे याच्या किनाऱ्याकिनाऱ्याला जोडून जे वर्तुळ बनते त्यालाप्रशांत अग्निचक्र’ (Pacific Ring of Fire) असेही म्हणतात.

 

.अटलांटिक महासागर (Atlantic Ocean) - हा जगातला दुसरा सर्वात मोठा महासागर आहे. याचे क्षेत्रफळ १० कोटी, ६४ लाख चौरस किलोमीटर आहे. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी २० टक्के, तर एकूण जलीय पृष्ठभागापैकी २९ टक्के पृष्ठभाग हा या महासागराने व्यापला आहे. याच्या पूर्वेलायुरोप व आफ्रिका खंड, पश्चिमेस उत्तर व दक्षिण अमेरिका खंड, उत्तरेस ग्रीनलँड, इतर देश व आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेस दक्षिण महासागर व अंटार्क्टिका खंड आहे.हा महासागर साधारणपणे इंग्रजी ‘एस्’ (S) आकारात आहे. याची सरासरी खोली तीन हजार, ३०० मीटर आहे, तर अधिकतम खोली ही प्युएर्टो रिको घळई (Puerto Rico Trench) येथे आठ हजार, ३८० मीटर आहे. या महासागराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची मध्य सामुद्रिक पर्वतरांग. ही पर्वतरांग जवळजवळ एक लाख, सहा हजार किलोमीटर लांब व एक हजार ६०० किलोमीटर रूंद असून काही ठिकाणी इतकी उंच आहे की, समुद्राच्या पृष्ठभागावर आलेली आहे. यामुळे आइसलँडसारखी बेटे तयार झाली आहेत. रहस्यमय बर्म्युडा त्रिकोणही (Bermuda Triangle) याच महासागरात आहे.

 

.हिंदी महासागर (Indian Ocean) - भारत (India) देशाच्या नावावरून या महासागराचे हे नाव ठेवण्यात आले आहे. हा जगातील तिसरा सर्वात मोठा महासागर आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे सात कोटी, ३४ लाख, ४० हजार चौरस किलोमीटर आहे. पृथ्वीच्या एकूण जलीय पृष्ठभागापैकी सुमारे २० टक्के पृष्ठभाग हिंदी महासागराने व्यापलेला आहे. या महासागराच्या उत्तरेला भारत देश व आशिया खंड, पश्चिमेला आफ्रिका खंड, पूर्वेस ऑस्ट्रेलिया खंड व दक्षिणेस दक्षिण महासागर व अंटार्क्टिका खंड आहे. हिंदी महासागराची सरासरी खोली सुमारे तीन हजार, ९६० मीटर आहे. तर सर्वाधिक खोली ही जावा घळई (Java Trench) येथे सुमारे सात हजार, ४५० मीटर आहे. हा महासागर तीनही प्रमुख महासागरांमध्ये तुलनेने तरुण तसेच सर्वात गुंतागुंतीचा महासागर आहे. याचे वय सुमारे ८० ते १४० दशलक्ष वर्षे आहे. या महासागरात भूकंपप्रवण अशी मध्य सामुद्रिक पर्वतरांग आहे. याशिवाय या महासागरात समुद्रांतर्गत अनेक मृत ज्वालामुखीही आहेत. या महासागरात जगातील सर्वात कमी घळया आहेत. या महासागराचा सामुद्रिक ठोकळा हा आशिया खंडाखाली सरकत चालला आहे. त्यामुळे याच्या ईशान्य सरहद्दीवर सबडक्शन झोन तयार झाला आहे. यामुळे याच्या पूर्व व ईशान्य किनाऱ्यावर अनेक संहारक भूकंप झालेले आहेत. तसेच जगातील काही मोठे ज्वालामुखी उद्रेकही येथे झाले आहेत.

 

.दक्षिण महासागर (Southern Ocean) - याला ‘अंटार्क्टिक महासागर’ (Antarctic Ocean) असेही म्हणतात. हा महासागर अंटार्क्टिका खंडाच्या सर्व बाजूंना आहे. कोणत्याही बाजूंनी दक्षिणेला गेल्यास अंटार्क्टिका खंड यायच्या आधी हा महासागर लागतोच. या समुद्राला कोणत्याही बाजूने जमिनीचा अडथळा नाही. याचे क्षेत्रफळ हे सुमारे दोन कोटी चौरस किलोमीटर आहे. याची सरासरी खोली चार हजार ते पाच हजार मीटर आहे, तर अधिकतम खोली दक्षिण सँडविच घळई (South Sandwich Trench) येथे सात हजार, २३६ मीटर आहे. हा जगातील सर्वात तरुण महासागर आहे. याचे वय सुमारे २० दशलक्ष वर्षे मानले जाते. या महासागरात ‘बॅलेनी हॉटस्पॉट’ (Balleny Hotspot) नावाचा ज्वालामुखीय हॉटस्पॉट (Volcanic Hotspot) आहे. हा हॉटस्पॉट अनेक बेटांच्या निर्मितीस कारणीभूत आहे. तसेच या महासागरात अनेक मध्य सामुद्रिक पर्वतरांगा आहेत. पॅसिफिक-अंटार्क्टिक रिज (Pacific-Antarctic Ridge) नावाची पॅसिफिक व दक्षिण महासागरांमध्ये असणारी मध्य सामुद्रिक पर्वतरांगही या महासागरात आहे.

 

. आर्क्टिक महासागर (Arctic Ocean) - याला ‘उत्तरी महासागर’ असेही म्हणतात. हा जगातील सर्वात लहान महासागर आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे एक कोटी, ४० लाख, ९० हजार चौरस किलोमीटर आहे. याची सरासरी खोली फक्त ९८७ मीटर आहे पण, याची अधिकतम खोली ही पाच हजार, ५०२ मीटर आहे. याच्या सर्व बाजूंना दक्षिण दिशा आहे आणि हा महासागर उत्तर अमेरिका, रशिया व ग्रीनलँड या जमिनींनी तसेच अटलांटिक समुद्रांनी वेढलेला आहे. याचे वय हे सुमारे ६५ दशलक्ष वर्षे आहे. या महासागरातही अनेक मध्य सामुद्रिक पर्वतरांगा आहेत. ‘अल्फा रिज’ (Alpha Ridge) नावाची ज्वालामुखीय पर्वतरांगही या महासागरात आहे. याशिवाय नैसर्गिक वायूचे साठेही आहेत. तर, अशा प्रकारे या लेखात आपण जगातील सर्व महासागरांची माहिती घेतली. समुद्राचा अभ्यास थांबवून पुढील लेखात आपण रचनात्मक भूशास्त्राचा अभ्यास करूया.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@