व्हेलचे सुमधुर गाणे

    28-Apr-2025
Total Views | 12

melodious sound of this whale
 
गेल्या आठवड्यात आपण अरबी समुद्रात अधिवास करणार्‍या ‘हम्पबॅक व्हेल्स’ची माहिती घेतली. या लेखातून आपण या व्हेलबद्दल भूतकाळात आणि वर्तमान स्थितीत कोणते संशोधनकार्य सुरू आहे, तसेच या व्हेलच्या सुमधुर आवाजाचा आढावा घेऊया.
 
पॉमिला सी आणि इतर संशोधक मंडळींचा 2014 मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, अरबी समुद्रात ‘हम्पबॅक व्हेल्स’चा एक अत्यंत विशेष गट आढळला आहे. हे व्हेल्स इतर प्रवासी व्हेल्सप्रमाणे स्थलांतर करत नसून त्या अरबी समुद्रात सुमारे 70 हजार वर्षे अडकून पडल्या आहेत. या व्हेल्सच्या जनुकीय अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, त्यांचे मूळ हे दक्षिण हिंदी महासागरातील असावे. मात्र, अरबी समुद्रात अडकल्यामुळे त्यांचा एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण समूह तयार झाला आहे. त्यांच्या जनुकांमध्ये अत्यंत कमी विविधता आढळली आहे, जी त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते.
 
‘पॅसिव अकुस्टिक मॉनिटरिंग’ ही एक पाण्याखाली काम करणारी ’स्पाय नेटवर्क’सारखी यंत्रणा आहे. जी जलचर जीवांच्या नैसर्गिक आवाजांचा अभ्यास करण्यासाठी ‘हायड्रोफोन्स’ नावाचे विशेष वॉटरप्रूफ मायक्रोफोन्स वापरते. संशोधक मंडळी ही उपकरणे अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेलचा वावर असणार्‍या नेत्राणी बेट (कर्नाटक) किंवा गोव्याच्या सागरी परिक्षेत्रात बोटीतून किंवा समुद्रतळी बसवतात. बॅटरी किंवा सोलर पॅनेलद्वारे चालणारे हे हायड्रोफोन्स 24 तास रेकॉर्डिंग करतात.
 
व्हेल्सचे गाणे (150-540 कू, कमी स्वरातील संगीतासारखे), जहाजांचा आवाज आणि समुद्राच्या पृष्ठभागावर पाऊस पडण्याचा आवाजसुद्धा हे उपकरणे रेकॉर्ड करते. आठवडे किंवा महिन्यांनंतर ही उपकरणे परत पाण्यातून बाहेर काढली जातात आणि हजारो तासांच्या ऑडिओचे विश्लेषण केले जाते. संगणक प्रोग्राम प्रथम जहाजांचा आवाज वेगळा करतात. नंतर व्हेल्सचे आवाज रंगीत स्पेक्ट्रोग्राममध्ये (आवाजाचे आलेख) रूपांतरित करतात. संशोधक हे आवाज तपासतात आणि अरबी समुद्रातील व्हेल्सच्या गाण्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण फ्रेजेस आणि थीम्स ओळखतात.
 
ही ’नॉन-इन्वेसिव्ह’ म्हणजे या संरक्षित प्रजातीला हात न लावता संशोधन करण्याची पद्धत आहे. याद्वारे ओमान आणि भारतामध्ये आढळणार्‍या अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल्सचे गाणे जुळते का, याचा अंदाज घेण्यात येतो. तसेच, वर्तनाविषयी माहिती मिळते. मजेदार माहिती म्हणजे हम्पबॅक व्हेल्सचे गाणे 30 किमी अंतरापर्यंत पाण्यात ऐकू येते. नर दरवर्षी नवीन गाण्याचे ट्रेंड कॉपी करतात आणि अरबी समुद्रातील पॅसिफिक व्हेल्सपेक्षा तुलनेने सोपे आवाज काढतात.
 
डॉ. श्याम कुमार मधुसूदन आणि इतर संशोधन सहकार्‍यांनी 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधानुसार अरबी समुद्रातील भारतीय किनार्‍याजवळ हम्पबॅक व्हेल्सचे मंत्रमुग्ध करणारे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. फक्त नर व्हेल्स गाणे म्हणतात, असे संशोधनातून समजले आहे. हे गाणे सहसा प्रजनन काळात जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी गायले जाते प्रत्येक प्रदेशातील नर एकसारखेच गाणे म्हणतात, पण हे गाणे प्रत्येक हंगामात बदलत जाते. इतर हम्पबॅक व्हेल्स प्रवासी असतात, पण अरबी समुद्रातील व्हेल्स इथेच राहतात. या अभ्यासात 5 हजार, 424 आवाज युनिट्सचे विश्लेषण करून नऊ वेगवेगळ्या प्रकारचे गाण्याचे नमुने ओळखले गेले. माया डिसूझा आणि त्याचे संशोधक सहकारी टीम यांनी 2023 मध्ये केलेल्या संशोधनानुसार ’संकटग्रस्त’ घोषित केलेल्या अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल्स भारताच्या पश्चिम किनार्‍यावर ऑक्टोबर ते मार्चदरम्यान दिसतात.
भारताच्या समुद्रकिनार्‍यावर अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल्सच्या संशोधनात महत्त्वाची प्रगती होत असल्याचे ’अरबियन सी व्हेल नेटवर्क’च्या अलीकडील अहवालात नमूद केले आहे.
 
कर्नाटकातील नेत्राणी बेटावर नोव्हेंबर, 2019 मध्ये ’साऊंडट्रॅप’ स्थापन करण्यात आले. ज्यामुळे अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल्सचे गाणे रेकॉर्ड करण्यात यश मिळाले. हे ठिकाण डॉ. दिपानी सुतारिया आणि इतर संशोधक सहकारी यांच्या 2017-18 मधील अभ्यासानुसार व्हेल्ससाठी महत्त्वाचे असलेले ठिकाण आहे. कन्याकुमारी आणि तामिळनाडूमध्येदेखील 2020 मध्ये दुसरे ‘साऊंडट्रॅप’ ठेवण्याची योजना होती. कारण ओमानमध्ये चिन्हांकित केलेली एक मादी व्हेल (जच02-008) याठिकाणी आढळली होती. मात्र, ‘कोविड’मुळे हे काम सध्या स्थगित आहे. सध्या केंद्र सरकारची ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ ही संस्था याबद्दल एक मोठा संशोधन प्रकल्प राबवत आहे. गेल्या वर्षी याच शोध कार्यादरम्यान संशोधक मंडळींना रायगड जिल्ह्यातील रेवदंडा समुद्री किनारी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे-पाज समुद्र किनारी व्हेलचे विचरण असते, अशी माहिती मासेमारी करणार्‍या मंडळींसोबतच्या मुलाखतीदरम्यान मिळाली.
 
-  प्रदीप चोगले 
(लेखक ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी - इंडिया’ या संस्थेत सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121