अमेरिकेच्या शीर्षस्थपदी बसणार तुलसी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018   
Total Views |



 
 
 
आपल्या संस्कृतीची, धर्माची ओळख थेट महासत्तेच्या शीर्षपदावर विराजमान होण्याची चाहूल लागल्यावर आनंदाचे स्मित चेहऱ्यावर येणारच. आपल्यालाही तुलसी गॅबार्ड यांच्याविषयी जाणून घ्यायचे असेलच ना?
 

जगातल्या एकमेव महासत्तेचे बिरुद मिरवणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी हिंदू व्यक्ती स्थानापन्न होणार, अशी चर्चा सुरू झाली आणि तुलसी गॅबार्ड हे नाव आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांत उच्चारले जाऊ लागले. भगवद्गीतेवर हात ठेऊन अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये खासदारपदाची शपथ घेणाऱ्या तुलसी गॅबार्ड यांचे भारतीयांना तर विशेष कौतुक. तुलसी गॅबार्ड यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या डॉ. संपत शिवांगी यांनी ही माहिती देताच भारतात तुलसी गॅबार्ड यांच्याविषयी औत्सुक्य निर्माण झाले. होणारच म्हणा, आपल्या संस्कृतीची, धर्माची ओळख थेट महासत्तेच्या शीर्षपदावर विराजमान होण्याची चाहूल लागल्यावर आनंदाचे स्मित चेहऱ्यावर येणारच. आपल्यालाही तुलसी गॅबार्ड यांच्याविषयी जाणून घ्यायचे असेलच ना?

 

१२ एप्रिल, १९८१ रोजी माईक गॅबार्ड आणि कॅरोल पोर्टर या कॅथलिक ख्रिश्चन दाम्पत्याच्या घरी समोआ येथे जन्मलेल्या तुलसी गॅबार्ड हवाईतल्या खासदार आहेत. हवाईतील ‘अलोहा’ या संवाद साधण्याच्या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या तुलसी यांनी बॅचलर ऑफ सायन्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. भारत आणि अमेरिकेत उत्तम संबंध प्रस्थापित व्हावेत, अशी आकांक्षा बाळगणाऱ्या तुलसी गॅबार्ड सध्या शक्तीशाली अशा आर्म्ड सर्व्हिस कमिटी’ आणि परराष्ट्र संबंधविषयक समितीच्या सदस्य आहेत. हवाई प्रांतात वयाच्या दुसऱ्या वर्षापासून राहणाऱ्या तुलसी गॅबार्ड यांनी आपल्या याआधीच्या निवडणूक प्रचार मोहिमेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. आपल्याकडे जशा घरांच्या समस्या आहेत, तशाच त्या हवाईतही आहेतच. म्हणूनच परवडणारी घरे, महागाई, आर्थिक सुधारणा, रोजगार, नागरी स्वातंत्र्य या विषयांवर त्यांनी आवाज उठवला. गेल्या काही काळापासून अमेरिकेने सीरियातही लष्कर उतरवले आहे. सीरियातील युद्ध समाप्त करावे, ही मागणीदेखील तुलसी गॅबार्ड यांनी केली. अमेरिकेतल्या गन कल्चरवर बरेच बोलले जाते. कोणीही उठून बंदूक वा जी लष्करात वापरण्यात येतात, ती हत्यारे विकत घेण्याची प्रवृत्ती अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आहे. तुलसी गॅबार्ड यांनी याच्यावर नियंत्रणाची मागणी केली. सोबतच ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपच्याही विरोधात त्या आहेत.

 

जागतिक स्तरावर सध्या दहशतवादाची समस्या मोठी मानली जाते. पाकिस्तानातून जन्मलेल्या या दहशतवादाच्या राक्षसाने आज इसिस, अल-कायदा आदी नावांनी अक्राळविक्राळ रूप धारण केले. दहशतवादाला संपविण्याची भाषादेखील तुलसी गॅबार्ड यांनी केली. पण केवळ बोलून भागणार नाही, अमेरिकेने स्वतः यात उतरून प्रामाणिकपणे ही लढाई लढली पाहिजे; अन्यथा जे आपल्या हिताचे ते सुरू ठेवायचे, हे धोरण तुलसी गॅबार्ड (यदाकदाचित अध्यक्ष झाल्यास) यांना बदलावे लागले. २०१६ मध्ये त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला चांगलेच सुनावले होते. “पाकिस्तान सरकारमधीलच लोक दहशतवादाला पाठिंबा देत असून त्यात काहीही नाविन्य नाही. गेल्या १५ वर्षांपासून हेच सुरू असून अमेरिकेने पाकिस्तानला कसल्याही प्रकारची मदत करू नये,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. तुलसी गॅबार्ड यांच्याविषयीची एक माहिती म्हणजे त्यांची इराकमधील १२ महिन्यांची वैद्यकीय सेवा. एप्रिल २००३ ते जुलै २००४ या काळात तुलसी गॅबार्ड इराकमध्ये हवाई आर्मी नॅशनल गार्डसोबत होत्या. पुढे राजकारणात उतरत त्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्यपदी निवडून आल्या. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी सदस्यत्व मिळवणाऱ्या त्या हवाईतील पहिल्या उमेदवार ठरल्या.

 

सोबतच तुलसी गॅबार्ड एलजीबीटी समूहांना अन्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समानतेची वागणूक दिली जावी, असेही बोलतात. शिवाय महिलांच्या हक्कांबाबतच जागृत असल्याने त्यांनी निवडणूक प्रचारातही हा मुद्दा लावून धरला होता. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महिलांबाबतची वक्तव्ये बरीच गाजली व ट्रम्प यांच्या अनुदार उद्गारांमुळे गोंधळ, असंतोषही निर्माण झाला. तुलसी गॅबार्ड स्वतः महिला असल्याने आणि महिलांच्या हक्क, सशक्तीकरणाच्या पक्षकार असल्याने महिलांसह पुरुषांचाही त्यांना पाठिंबा मिळू शकतो. त्याचबरोबर भारतीय मूळ असलेल्या अमेरिकी जनांत तुलसी गॅबार्ड सर्वात लोकप्रिय आहेत. ज्यूधर्मीय अमेरिकनांनंतर भारतीय-अमेरिकनांचा तेथील सर्वाधिक प्रभावशाली आणि श्रीमंतांत समावेश होतो. म्हणूनच तुलसी गॅबार्ड यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची योजना डॉ. संपत शिवांगी यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला अनुमोदन दिले. तथापि, स्वतः तुलसी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान, तुलसी गॅबार्ड यांच्या पाठीराख्यांनी व सहकाऱ्यांनी मतदारांशी संपर्कासही सुरुवात केली.

 

डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले जाते. तुलसी गॅबार्ड यांची यासाठीच्या उमेदवार म्हणून घोषणा झाल्यास तो अमेरिकेतील भारतीयांसाठी आणि आपल्या इकडेही आनंदाचाच क्षण असेल. पुढे २०२० मध्ये प्रत्यक्ष निवडणूक निकालावेळी कोण विजयी, हे स्पष्ट होईलच. पण एका हिंदू महिलेने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्याने त्यांचे नाव असंख्य लोकांच्या मनात कोरले जाईल, हे नक्की.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@