राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देशातील एक महत्वाचे संघटन, यावर्षी विजयादशमीला ९२ वर्षे पूर्ण करत आहे. १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे स्थापन झालेली ही संघटना आज देशाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. आज भारतात असा कुणीही व्यक्ती नाही ज्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहित नाही. काही लोक याला RSS नावाने देखील ओळखतात. या संघटनेबद्दल प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी भावना असली तरी देखील याची ओळख मात्र सर्वांना कमी अधिक प्रमाणात आहे.
प्रखर हिंदुत्ववादी संघटन ते अनेक गरजवंतांना खांदा देणारे संघटन,संकटांच्या वेळी धावून येणारे संघटन, अशा नानाविध प्रतिमा प्रत्येकानी आपल्या समजुती नुसार तयार केल्या आहेत. मात्र हे संघटन नेमके काय आहे? हे ९२ व्या स्थापना दिनानिमित्त जाणून घेतले पाहिजे. किंबहुना बदलत्या सामाजिक परिस्थिती नुसार आज संघाबद्दल जाणून घेणे प्रत्येकाला आवश्यक होऊन गेले आहे. त्यामुळे प्रत्येक विचारसरणीचा हा अभ्यासाचा विषय होऊन गेला आहे.
समाजावर आलेल्या प्रत्येक संकटांच्या वेळी धावून जाणारे स्वयंसेवक अनेकांच्या नजरेस पडले असतील. अलिकडच्या काळातील घटनेचा संदर्भ द्यायचा झाल्यास माळीण गावात संघ स्वयंसेवकांनी केलेले काम हे समाजमनात संघ कामाची स्पष्टता निर्माण करण्यासाठी पुरेसे आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव एका रात्रीतून उध्वस्त झाले होते, संपूर्ण गाव डोंगराखाली दाबले गेले असताना या गावाला सावरण्यासाठी सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र कार्यरत असणाऱ्या संघ स्वयंसेवकांचे कार्य महाराष्ट्रासह अवघ्या देशाच्या स्मरणात राहणारे आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही हे करून दाखवले असा कुठलाही अभिनिवेष नाही, किंवा यासाठी वेगळी म्हणून प्रसिद्धी नाही. अगदी सहज, जसे आपल्या कुटुंबावर संकट ओढवल्यास व्यक्ती ते सावरण्यासाठी कार्यरत असते, त्याचा कुठेही अभिनिवेष मनात नसतो, त्याचप्रमाणे संघ स्वयंसेवक समाजावर आलेले प्रत्येक संकट आपल्या कुटुंबावर संकट ओढावल्याप्रमाणे मानून सहजरित्या कामाला लागतो. हे या संघटनेचे वैशिष्ट्य.
राष्ट्रार्थ सजग नित्य सिद्ध शक्ती
‘राष्ट्रकारणी सर्व समर्पूनि’ या उक्तीला जगणारे लाखो कार्यकर्ते संघाकडे असल्यामुळे आपल्या समाजावर आई सारखे प्रेम करण्याची वृत्ती संघात सजग आहे. संपूर्ण समाज आपला आहे, आणि आपण या समाजाचे आहोत हा अहं पासून वयं चा भाव संघकामातून पदोपदी जागृत केला जातो. म्हणूनच तर समाजाच्या सेवेसाठी कुठल्याही लाभाशिवाय संघकार्यकर्ते समर्पित भावनेने काम करतात. आणि विशेष म्हणजे हा भाव संपूर्ण देशभर सारखाच बघायला मिळतो. याचे कारण म्हणजे एकसारखी कार्यपद्धती, आणि शाखेच्या माध्यमातून या भावाचे नित्य जागरण होते. परंतु बाहेरून पाहून ही कार्यपद्धती लक्षात येत नाही, किंबहुना केवळ दर्शक असणाऱ्यांच्या मनात अनेक संभ्रम असतात.
संघात केवळ विशिष्ट जाती-पंथाच्या लोकांनाच प्रवेश आहे का ? असा सवाल अनेकजण विचारत असतात. मात्र संघात कधीही जात-पात पाळली जात नाही. किंबहुना आपल्या बरोबर काम करणारा कार्यकर्ता कुठल्या जातीचा आहे? हे माहिती नसते, त्याबद्दल कुणीही वेगळी विचारणा करत नाही. गेल्या ९२ वर्षात संघाने जातींमधील भेदभाव मिटविण्याचे प्रत्यक्ष कार्य केले आहे. शाखेत येणारे स्वयंसेवक समाजाच्या सर्व स्तरातून येत असतात. ‘एका रांगेत उभे राहा’ अशी आज्ञा आल्यास सर्वच जाती-पातीचे स्वयंसेवक उच्च-निच, काळा-गोरा, सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब असा कुठलाही विचार न करता एका रांगेत उभे राहतात. शिबिरात एकत्र जेवण करतात. जाती अंतावर केवळ भाषण ठोकून जाती भेद नष्ट होत नाही, ते प्रत्यक्ष आचरणानेच घालवावे लागते हे संघाने सिद्ध करून दाखवले आहे. जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत भल्या-भल्यांना जमले नाही.
पुणे महानगराचे उदाहरण घ्यायचे म्हटल्यास येथे प्रत्येक वस्तीत संघाचे काम चालत असते. कोथरूड, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, प्रभात रास्ता केवळ येथेच संघाचे काम बहरले नसून ते शिवाजी नगर, येरवडा, वाघोली, हडपसर सारख्या भागांत पसरले आहे. तर केळेवाडी, वडार वस्ती, गोसावी वस्तींसारख्या परिसरात देखील तेवढ्याच भक्कमपणे उभे राहिले आहे. सर्वसमावेशकता म्हणजे नक्की काय ? हे पुणे महानगराच्या संघ कामाच्या भौगोलिक विस्तारातून लक्षात येते. पुणे महानगराच्या जवळपास ८५ टक्के भागात आज प्रभावीपणे संघ काम सुरु आहे. याचा परिणाम म्हणून आज पुणे सारख्या शहरातील महत्वाच्या क्षेत्रात संघ स्वयंसेवकांचा प्रभाव दिसून येतो. गेल्यावर्षी पुणे येथे सामाजिक रक्षाबंधनानिमित्त संघ स्वयंसेवकांच्या प्रयत्नातून इ-कचरा संदर्भात घराघरात जाऊन जागरण करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून पुणेकरांनी ४ तासांत ४५ टन इ - कचरा या अभियानांतर्गत संकलन केंद्रावर जमा केला होता. ही संकलन केंद्रे पुण्यातील ४४ ठिकाणी उभारण्यात आली होती. हे सर्वभाग सामाजिक,आर्थिक दृष्ट्या भिन्न होते, मात्र तरी देखील संघ स्वयंसेवकांच्या बरोबर इ-कचरा सारख्या समस्येवर काम करण्याचा उत्साह सगळीकडे एकसारखाच दिसून आला.
यावरून संघ विचारसरणीच्या स्वीकृतीचा अंदाज आपण बांधू शकतो. शिवशक्ती संगम सारख्या कार्यक्रमात मिळालेला प्रतिसाद सर्वच बाबतीत ना भूतो असा होता. शिवशक्ती संगमामुळे शाखांमध्ये येणारे तथा संघाच्या विविध आयामांमध्ये काम करू इच्छीणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ आहे. २०१४ साल पर्यंत पुणे महानगरात ७ ठिकाणी विजयादशमी पथसंचलन निघत असत, त्यात झालेल्या वाढीमुळे २०१५ सालापासून ४४ ठिकाणी या संचालनाचे आयोजन केले जाते. ही आकडेवारी संघकामाचा वाढता प्रभाव विशद करणारी आहे.
दर वर्षाप्रमाणे यावर्षी देखील विजयादशमी निमित्त ठिकठिकाणी पथसंचलन निघणार आहे. पुणे महानगरात कोणत्या भागात कुठे संचलन आहे हे गूगल मॅप च्या साहाय्याने पाहता येईल अशी सुविधा संघाने केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून आपल्या नजीकच्या संचलनात सहभागी होता येईल. तथा सहकुटुंब याचे दर्शन घेता येईल. संघाचे पथसंचलन हे सज्जन शक्तीच्या संघटित स्वरूपाचे एक प्रतीक आहे. काही पाऊले आज यात चालत आहेत,तर अनेक पाऊलांची याला आवश्यकता आहे. त्यामुळे मॅप पाहून आपण नक्कीच जवळच्या संचलनात सहभागी व्हावे, आणि संघाच्या नित्य सिद्ध शक्तीच्या अविष्काराची अनुभूती घेऊन संघ कसा आहे, हे एकदा तरी नक्की अनुभवावे.