सृष्टी निर्मितीच्या रहस्याचे कुतुहूल नेहमीच मानवाला राहिले आहे. त्यादृष्टीने प्राचीन काळापासून ते आज तागायत मानव या रहस्यांच्या दिशेने शोध घेत आलेला आहे. त्यासाठी विविध अंतराळ मोहिमा करणे, वेगवेगळ्या ग्रहांवर संशोधन करणे हा सर्व त्याचाच एक भाग आहे. परंतु मानवी कल्पनेच्या सीमा केवळ एखाद्या ग्रहमालिकांच्या कक्षेपर्यंत थांबलेल्या नाहीत. त्यातून बाहेर पडून देखील सृष्टीचा शोध घेत सरसावल्या आहेत.
असाच एक नवीन शोध दिनांक १३ जुलै रोजी प्रकाश झोतात आला. तो म्हणजे 'सरस्वती' दिर्घिकेचा. यात मोठी अभिमानाची बाब म्हणजेच हा शोध भारतीय वैज्ञानिकांनी लावला आहे. पुणे येथील आयुका (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमि अँड अॅस्ट्रोफिजिक्स), आयसर पुणे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च), एनआयटी जमशेदपूर तसेच केरळ आयुकाच्या शाखेतील वैज्ञानिकांच्या गटाने मिळून हे यशस्वी संशोधन पार पाडले.
४०० कोटी प्रकाशवर्ष लांबची दीर्घिका
सरस्वती दीर्घिका पृथ्वीपासून ४०० कोटी प्रकाशवर्ष एवढ्या अंतरावर आहे. यावरून त्याच्या अंतराचा अंदाज आपण बांधू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते सृष्टीची निर्मिती ही सुमारे १३ हजार ८०० कोटी वर्षांपूर्वीची आहे. म्हणजेच जेव्हा सृष्टीला निर्माण होऊन १ हजार कोटी वर्ष झाले होते, तेव्हा सरस्वती दीर्घिका निर्माण झाली, असा शास्त्रज्ञांनी अंदाज बांधला आहे. यातून सृष्टी निर्मितीच्या रहस्याकडे मानवाने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे, असेच म्हणावे लागेल.
अवकाश तंत्रज्ञानात प्रसिद्ध असलेल्या 'कोल्ड डार्क मॅटर' मॉडेलनुसार सृष्टी निर्मितीच्या उत्क्रांती वेळी आकाशगंगा सारखे लहान साचे सर्वप्रथम तयार होत असतात, त्यानंतर त्यातून विविध मोठे समूह तयार होतात. या मॉडेलनुसार आतापर्यंत शोधले गेलेल्या कोणत्याही दिर्घिकेचा आकार सरस्वती एवढा कधीच नव्हता. त्यामुळे 'कोल्ड डार्क मॅटर' ही केवळ एक मांडणी बनून राहिली होती. मात्र सरस्वती सारख्या प्रचंड मोठ्या दिर्घिकेने वैज्ञानिक जगताला 'कोल्ड डार्क मॅटर'वर पुन्हा विचार करायला भाग पाडले आहे.
या शोधामुळे आजची सृष्टी कधी निर्माण झाली, याचा मागोवा घेणे अधिक सोपे आणि सोयीचे ठरणार आहे. अवकाश विज्ञानातील प्रसिद्ध 'बिग बँग' थेअरी नंतर हा शोध महत्वाचा ठरणार आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडला असेल की अशा प्रकारच्या भल्या मोठ्या ग्रह ताऱ्यांचा साचा कसा तयार होतो? शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार गेल्या काही वर्षांपूर्वी 'डार्क एनर्जी' नावाची संज्ञा मांडली गेली, जी गुरुत्वाकर्षणापेक्षा खूप वेगळी आहे. अवकाशात या ऊर्जेमुळे विविध आकाशगंगा एकत्र येऊन सरस्वती दिर्घिकेसारखे साचे निर्माण होत असतात.
या प्रचंड मोठ्या दिर्घिकेत विविध आकाशगंगेसह, गडद पदार्थ, वायू, विविध क्लस्टर, अन्य लहान मोठे घटक, तंतुजन्य पदार्थ, मोठमोठे शून्य स्थानं, अशा विविध घटकांचा समावेश आहे. यामुळे याचा आवाका ६०० दशलक्ष प्रकाशवर्ष एवढा असून २ कोटी सूर्यांच्या वजनाएवढे याचे वजन असल्याचा निष्कर्ष शास्त्राद्यांनी काढला आहे.
शोध लावण्याची प्रक्रिया
शॅप्ली ही आतापर्यंत जगातील सर्वात मोठी दीर्घिका म्हणून ओळखली जात असत, त्यात सुमारे ७६ हजार आकाशगंगांचा समवेश होत होता. मात्र सरस्वती दिर्घिकेच्या शोधानंतर ही ओळख बदलली आहे. पुणे येथे हा शोध लागला आहे, त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की याचे सर्व निरीक्षण नारायणगाव येथील दुर्बिणीतून केले का? मात्र याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना भारतात एवढ्या लांब पल्ल्याची निरीक्षणे नोंदवू शकेल अशी दुर्बीण उपलब्ध नाही. शास्त्रज्ञांनी न्यू मॅक्सिको येथील सोलन डिजिटल स्काय सर्व्हेच्या मदतीने अवकाशातील सर्व निरीक्षणे नोंदविली आहेत.
या प्रक्रियेत केवळ निरीक्षणे नोंदवून काम होत नाही. तिथून पुढे सिद्धांत मांडणी सर्वाधिक महत्वाची असते. सिद्धांत मांडणी करताना सर्व माहिती, निरीक्षणे, पुरावे यांचा लेखाजोखा आंतरराष्ट्रीय संस्थांपुढे मांडावा लागतो. त्यात सिद्धांताची कोणतीही ओळ इतर कुणाची कॉपी नाही ना! याची देखील काळजी घेतली जाते.
भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूने अॅस्ट्रोफिजिकल जर्नल या अंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनाच्या नामवंत संस्थेसमोर आपल्या संशोधनाची मांडणी केली. अॅस्ट्रोफिजिकल जर्नलने त्याचा संपूर्ण तपास करून, सर्व पुरावे तपासून सरस्वती शोधला हिरवा कंदील दाखवला, आणि भारतीय विज्ञान जगतात एक नवीन मानाचा तुरा रोवला गेला.
अमेरिकेने शॅप्ली या दिर्घिकेचा जेव्हा शोध लावला होता, त्यावेळी डॉ. शोमक रायचौधरी देखील त्या वैज्ञानिक चमूत सहभागी होते. तेव्हापासून सरस्वती दीर्घिकेची जाणीव त्यांना होती. मात्र खात्रीपूर्वक माहिती आणि पुरावे यांचा अभाव असल्यामुळे तेव्हा ते संशोधन पुढे सरकले नव्हते, अशी माहिती शिशिर सांख्यायन यांनी एका मुलाखतीत दिली.
डॉ. शोमक रायचौधरी (आयुका, पुणे), जयदीप बागची (आयुका, पुणे), शिशिर सांख्यायन (आयसर, पुणे), प्रतिक दाभाडे (आयुका, पुणे), डॉ. प्रकाश सरकार (एनआयटी, जमशेदपूर), डॉ. जॉय जेकब (आयुका केरळ) या शास्त्रज्ञांच्या चमूने गेल्या ३-४ वर्षांपासून माहिती, पुरावे आणि निरीक्षण गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यातून ते सरस्वतीच्या शोधापर्यंत यशस्वीपणे पोहोचले.
सरस्वती नावाचे महत्व
भारतीय संस्कृती ज्या दोन नदींच्या काठावर विकसित झाली त्यातील एक सिंधू आणि दुसरी म्हणजे सरस्वती. पैकी सरस्वती नदी ही आज लुप्त झाली आहे. मात्र त्या प्रदेशातील समृद्ध संस्कृती आजही ओसंडून वाहताना दिसते. त्याच बरोबर कला, शिक्षण, संगीत, ज्ञान, विज्ञानाची देवता म्हणून सरस्वती देवीची उपासना भारतात केली जाते. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत सरस्वतीचे महत्व मोठ्या प्रमाणात आहे. त्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिक म्हणूनच भारतीय शास्त्रज्ञांनी या दिर्घिकेला सरस्वती असे नाव दिले आहे. जी प्रचंड मोठी आहे, अनेक आकाशागंगांनी समृद्ध आहे.
जगाला प्रत्येक वेळी भारताने नवीन दिशा दिली आहे. अगदी शून्याचा शोध असो, किंवा साप्ताहिक वारांची संकल्पना असो, संपूर्ण जगाने भारताकडूनच स्वीकारली आहे. रविवार ते शनिवार हे साप्ताहिक वार सर्व अवकाश विज्ञानाशी संबंधित आहेत. आजही इस्रो करत असलेल्या कामगिरीवर संपूर्ण जग कौतुकाचा वर्षाव करत आहे. योग ही भारताची जगाला असलेली देणगी, संपूर्ण मानवतेच्या कल्याणाकरिता आहे. त्याच प्रमाणे सरस्वती दिर्घिकेचा शोध देखील सृष्टी निर्माणाकरिता महत्वाचा मैलाचा दगड ठरणार असून, यातून मानव जाती एका नव्या पर्वाला सुरुवात करेल याची खात्री वाटते.
- हर्षल कंसारा