आजच्या तरुणाईला सोशल माध्यमांतून व्यक्त होणे तसे खूपच अंगावळणी पडले आहे, किंबहुना आता तो तरुणांचा स्वभावच बनला आहे. कुणी शिंकले तरी देखील लोकं सोशल मिडीयात व्यक्त होतात, आणि त्यावर अनेकजण आपापले मत, सहानुभूती दर्शवितात. यात देखील अनेकानेक स्वभाव असतात, काही लोक तर्कांच्या आधारावर तेथे चर्चा करतात, तर काही भावनिकतेचा मुलामा चढवून आपला मुद्दा मांडतात. सध्या असेच सोशल मीडियात एक भावनिकतेचे कार्ड खेळणारा मुद्दा गाजत आहे. कारगिल युद्धात हुतात्मा सैनिकाची मुलगी, आपल्या वडिलांच्या हौताम्याचे पुण्य वापरून “मी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी आहे, मी अभाविपला घाबरत नाही...” वैगरे सारख्या पोस्ट टाकत, आपण हिंसाचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बळी पडल्याचा कैवार माजवत आहे. परंतु व्यक्त होण्याचा अधिकार दोन्ही पक्षांना असतो याचा मात्र सोयीस्कर विसर तिने व तिच्या पुरोगामी मित्रांनी पडून घेतलेला दिसतो आहे.
ही तीच मंडळी आहे, जी नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुतेच्या नावाने टाहो फोडत असते. एआयएसएफ आणि एसएफआय सारख्या मार्क्सवादाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या संघटनांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संलग्नित हे विद्यार्थी मित्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टाहो फोडताना, मात्र त्यांच्याच पालक संघटनेचे ‘लाल’ कारनामे सोयीस्कर रीतीने विसरतात. दिल्लीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुताचे नारे देणारे तथाकथित ‘पुरोगामी’ केरळात मात्र आपल्याविरोधी विचारधारेच्या लोकांना भर दिवसा कापतात तेव्हा....!!
मार्क्सवादाच्या असहिष्णुतेचे बळी
उत्तमन आपल्या पत्नी आणि दोन लेकरांसह केरळातील कन्नूर जिल्ह्यामधील पेनराई नामक गावात राहत होते, बस चालक म्हणून नोकरी करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होते. सर्वांना असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे त्यांनी देखील आपल्या आवडीच्या विचारधारेत म्हणजेच रा.स्व.संघाच्या कामात सहभागी झाले होते. मात्र केरळमधील कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या कन्नूर जिल्ह्यातील कम्युनिस्ट(दिल्लीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रणेते) कार्यकर्त्यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य झाले नाही, आणि म्हणूनच त्यांनी मे २००२ साली उत्तमन यांना बस चालवत असतानाच रस्त्यात गाठून, भरदिवसा मारून टाकले. उत्तमन यांचा परिवारात त्यांची पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे तिघेच शिल्लक राहिले. त्यांच्या पत्नीने आपल्या संसाराचा गाडा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ओढून मुलांचे पालन पोषण केले, मुलीचे लग्न केले, मुलाला शिकवून आपल्या पायावर उभे केले, आता आईच्या म्हातारपणाची काठी होण्याजोगता मुलगा रमित झालाच होता. आपल्या परिवाराची जबाबदारी तो निभावत देखील होता, मात्र आपल्या पित्याप्रमाणे त्याने देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मार्ग अवलंबत रा.स्व.संघाचे काम करणे सुरु ठेवले होते. ते ही मार्क्सवादींच्या बालेकिल्ल्यात!, विशेष म्हणजे पेनाराई गावात. पेनाराई गाव म्हणजेच दस्तूर खुद्द केरळच्या मुख्यमंत्र्यांचे गाव, आणि असे असल्यामुळेच २७ वर्षीय रमितची ऑक्टोबर २०१६ मध्ये हत्या करण्यात आली. आपल्या गर्भवती बहिणीसाठी औषधी घ्यायला जात असतानाच, मार्क्सवादी गुंडांनी त्याला गाठले आणि जीवे मारले. त्याच्या परिवारात आई आणि बहिण दोघी जणी शिल्लक राहिल्या आहेत. सध्या त्याची आई, आपल्यावर कधी मार्क्सवाद्यांचा हल्ला होतो! याचीच वाट बघत जिंवंत आहे. कारण पती आणि पुत्राच्या मृत्युनंतर तिच्या आयुष्याला देखील जगण्याचे धाडस उरलेले नाही.
पय्यन्नुर नामक गावी राहणारे ऑटो चालक सी. के. रामचंद्रन भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते होते. आपल्या पत्नी व दोन लेकरांसह पय्यन्नुर येथे रिक्षा चालवून परिवाराचे भरणपोषण करणाऱ्या सी.के. रामचंद्रन यांच्या घरात ११ जुलै २०१६ रोजी अनेक मार्क्सवादी गुंड आणि काही पदाधिकारी दार तोडून आत घुसले, आणि पत्नी व लहान मुलांच्या देखत त्याच्यावर चाकूने वार करु लागले. पत्नीने गयावया करत त्या गुंडांकडून आपल्या सौभाग्याची भिक मागितली, मात्र त्याच्या राक्षसी हृदयाला काही पाझर फुटला नाही. शेवटी रामचंद्रन यांना आपला जीव गमवावा लागला. कारण फक्त एकच होते, की रामचंद्रन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवलंब करत सीपीएमपेक्षा वेगळ्या विचारधारेत काम करणे पसंत केले होते!!
१९८० साली कन्नूर जिल्हा अभाविप कार्यकर्ता गंगाधरन यांना देखील अश्याच प्रकारे दिवसाढवळ्या मारले गेले, त्यांचा सरकारी नोकरीचा पहिलाच दिवस होता. सर्वेक्षण विभागात रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयात शिरताच क्षणी काही गुंड पूर्व तयारीनिशी आले होते, आणि गंगाधरन यांना आपल्या टेबलवरच जीवास मुकावे लागले. अभाविपच्या नावाने टाहो फोडून ओरडणाऱ्या डाव्या विद्यार्थी संघटनांनी या घटना जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजे, आणि अभाविपने याचा कधीच सूड उगारला नाही अथवा तसा प्रयत्न देखील केला नाही, हे देखील जाणून घेतले पाहिजे.
अशी २५० हून लोकांची मालिका आहे, सगळीच लेखात लिहिणार नाही, ते शक्य देखील नाही. परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजेच या पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही, यांच्या मागे कुठलेही तथाकथित बुद्धीजीवी उभे ठाकले नाहीत, कोणत्याही तथाकथित सेक्युलर नेत्याने, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यांच्या बाजूने आवाज उठवला नाही. आपल्या केवळ घोषणाबाजीवर आक्षेप घेतला (तीही देशाविरोधातील) तरी देखील, दृकमाध्यमे, वृत्तपत्रे, सोशल मिडीया, कॉलेज कॅम्पस येथे जाऊन जाऊन आजादी-आजादीच्या नावाने टाहो फोडणारी हीच लोकं इतरांप्रती किती असहिष्णू आहेत, याचा अनुभव केरळ गेल्या ७४ वर्षांपासून घेत आहे.
केरळात डाव्यांचा 'गुंडा' राज चालतो, जो जो त्याविरोधात आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या रक्ताने केरळची माती लाल होऊन जाते. आणि जेव्हा जेव्हा या मातीवरून चालाल, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष दर्शनी खरी असहिष्णुता अनुभवायला मिळाल्या शिवाय राहणार नाही.
-हर्षल कंसारा