एसएनडीटी महिला विद्यापीठाला NAAC कडून A+ मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त
01-Jul-2025
Total Views |
मुंबई : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई ला नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) कडून प्रतिष्ठेचे A+ श्रेणी मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त झाले आहे. विद्यापीठासाठी ही गौरवाची बाब आहे. ही उल्लेखनीय कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, समावेशक शिक्षणपद्धती व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या गतिमान नेतृत्वाखाली विद्यापीठाने अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सातत्याने प्रगती साधली आहे. आज विद्यापीठाचा विस्तार भारतभर झालेला आहे. महिला शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी विद्यापीठ अविरत प्रयत्न करीत आहे याचे हे फलित आहे.
नॅक A+ मानांकन मिळणे खऱ्या अर्थाने विद्यापीठासाठी दिशादर्शक आहे. यामुळे विद्यापीठाचा विकास आणि विस्तार घडून यायला मदत होणार आहे. या यशामागे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, अंतर्गत गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (IQAC) आणि हितधारकांचे अथक परिश्रम व संघभावना आहे. कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वात प्र-कुलगुरू प्रा. रूबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, IQAC संचालक प्रा. प्रज्ञा वाकपैंजण व टीम तसेच, सर्व अधिष्ठाते, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा व मूल्यांकन संचालक, विद्यापीठाचे सर्व संचालकगण आणि प्रशासनातील सर्व घटकांनी यासाठी मेहनत घेतली आहे.
नॅक मूल्यांकनाच्या या प्रेरणादायी टप्प्यामुळे एसएनडीटी महिला विद्यापीठ गुणवत्ता, ज्ञान, महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात अधिक जोमाने पुढे वाटचाल करणार आहे. हे A+ मानांकन म्हणजे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. गुणवत्ता, समावेश आणि नवाचार या त्रिसूत्रीवर आधारित विद्यापीठाची वाटचाल आता अधिक जोमाने पुढे जाणार असल्याचे मत कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले आहे. शैक्षणिक, सहशैक्षणिक आणि विस्तार उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनी आणि समाज यांच्यात सेतू निर्माण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न या यशामध्ये प्रतिबिंबित होत असल्याचे मत प्र-कुलगुरू प्रा. रूबी ओझा यांनी व्यक्त केले.
नियमबद्ध प्रक्रिया, पारदर्शक व्यवस्थापन व सुयोग्य समन्वय यामुळे हे यश शक्य झाले. विद्यापीठातील सर्व घटकांचे सहकार्य हे विद्यापीठाच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे मत कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर यांनी व्यक्त केले आहे. गुणवत्ता ही एकदिवसीय प्रक्रिया नसून ती एक प्रक्रिया असते. NAAC मूल्यांकनात A+ श्रेणी मिळवणे म्हणजे आपण ती गुणवत्ता प्रक्रिया जोपासली याची साक्ष आहे असल्याचे IQAC संचालक प्रा. प्रज्ञा वाकपैंजण यांनी सांगितले आहे.