मुंबई : ( Amit Satam ) मुंबई भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ तीन दिवसीय ’घर चलो’ अभियानाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यावेळी, मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉक करणार्या नागरिकांशी संवाद साधला.
मुंबई भाजपकडून ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मुंबईकरांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासंदर्भात अभियान राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आ. अमित साटम यांनी शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रीय उद्यानात नागरिकांची भेट घेतली आणि ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या अभियानांतर्गत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच, मुंबईच्या विकासाबाबत त्यांच्या सूचनांची नोंद करून घेतली. मुंबई भाजपचे हे तीन दिवसीय अभियान रविवारपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांचा सहभाग वाढवून मुंबईच्या विकासाचा नवा संकल्प मांडणार आहे.
हेही वाचा : जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘घर चलो अभियान’च्या धर्तीवर उपक्रम राबवणार
आ. अमित साटम म्हणाले की, "नागरिकांच्या मतांवर आधारित मुंबईची आगामी धोरणे आणि उपक्रमांची आखणी करणे आहे, हा या अभियानाचा उद्देश आहे. भाजप कार्यकर्ते घरोघरी, रेल्वे स्टेशनवर, कॉलेज परिसरात आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सूचना नोंदवतील. ‘घर चलो अभियान’च्या धर्तीवर हे उपक्रम राबवले जाणार असून प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि सामान्य मुंबईकर यांच्याशी थेट संवाद साधण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
अभिनेते अशोक सराफ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा
आ. अमित साटम यांनी ज्येष्ठ अभिनेते ‘पद्मश्री’ अशोक सराफ यांची भेट घेऊन मुंबईच्या विविध विषयांवर चर्चा केली. तसेच, त्यांच्या सूचनांची नोंद करून घेतली. कचरा व्यवस्थापन, पर्यावरण, रस्ते, पायाभूत सुविधा, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यविश्व या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे साटम यांनी सांगितले. यावेळी, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार उपस्थित होते.