एशियाटिक सोसायटीच्या सत्तेसाठी राजकारण करणार्‍यांना दणका!

दि. ३ ऑटोबरपर्यंत सदस्य झालेल्यांनाच मतदानाचा अधिकार

    01-Nov-2025
Total Views |

Asiatic Society
 
मुंबई : ( Asiatic Society ) मुंबईच्या इतिहासातील ज्ञानकेंद्र अशी ओळख असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, दि. ८ नोव्हेंबर रोजी एशियाटिक सोसायटीची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक दि. ३ ऑटोबर रोजी छाननी समितीच्या बैठकीत सदस्यत्व देण्यात आलेल्या सदस्यांच्या यादीनुसार घेण्यात याव्यात, असे निर्देश धर्मादाय उपायुक्त राम लिप्ते यांनी शुक्रवार, दि. ३१ ऑटोबर रोजी दिले. तसेच, दि. ३ ऑटोबर रोजीपर्यंतचे सदस्यच मतदानासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे एशियाटिकच्या सत्तेसाठी राजकीय मोर्चेबांधणी करणार्‍यांना चांगलाच दणका बसला आहे.
 
दि. २७ सप्टेंबर रोजी एशियाटिक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सोसायटीच्या वार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. दि. ८ नोव्हेंबर रोजी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्ष, चार उपाध्यक्ष, सचिव, व्यवस्थापन समिती आणि छाननी समितीसाठी निवडणूक पार पडणार आहे. मात्र, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट, काँग्रेस, उबाठा आणि काही डाव्या संघटनांनी सोसायटीवर आपली सत्ता राखण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात सदस्यत्वाचे अर्ज दाखल केले. तसेच अर्ज दाखल करताना त्यासाठी लागणारे शुल्क थेट राजकीय पक्षाच्या बँक खात्यातून भरले, असा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. मात्र, एशियाटिकवरील सत्ताप्राप्तीसाठी केलेला हा प्रयत्न पुरता फसल्याचे दिसून येत आहे.
 
हेही वाचा : Satyacha Morcha : काँग्रेसला राज ठाकरे नकोसे? मोर्चातूनही पक्षचिन्ह, झेंडे गायब!
 
दि. ८ ऑटोबर रोजी निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे यानंतर झालेल्या सदस्यांना यंदा मतदारांचा दर्जा देणे योग्य होणार नाही, असे स्पष्ट करीत निवडणूक जाहीर केलेल्या दिवसापर्यंतचे, म्हणजेच दि. ३ ऑटोबर रोजीपर्यंतचे सदस्यच मतदार म्हणून पात्र धरण्याचे निर्देश धर्मादाय उपायुक्तांनी निवडणूक अधिकार्‍यांना दिले. एशियाटिकच्या व्यवस्थापन मंडळातील काही सदस्यांनी दाखल केलेल्या याचिकांवरील सुनावणीनंतर धर्मादाय उपायुक्तांनी हा निर्णय दिला. या सुनावणीच्या वेळी एशियाटिकच्या अध्यक्षा विस्पी बालापोरिया उपस्थित होत्या आणि दोन्ही बाजूंनी सहमतीचे पत्र उपायुक्तांना सादर केल्यानंतर त्यांनी सदर निर्देश निवडणूक अधिकार्‍यांना दिले. एशियाटिक सोसायटीच्या सदस्यांकडून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
 
 
वैचारिक एकारलेपणा दूर करण्यासाठी एशियाटिकची निवडणूक महत्त्वाची : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
 
एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी यंदा भाजपचे माजी खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि काँग्रेसचे माजी खा. कुमार केतकर यांच्यात लढत रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दै.‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, "एशियाटिक सोसायटीसारख्या जुन्या संस्थेमध्ये मागचा काही काळ ठराविक विचारांच्याच लोकांचा वावर होता. हा वैचारिक एकारलेपणा दूर करण्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त येण्याची गरज आहे. येणार्‍या काळात ती कशी आणता येईल, संस्थेच्या उत्कर्षासाठी संसाधने कशी गोळा करता येतील, हा विचार मनात ठेवून काम होणे गरजेचे आहे. या संस्थेतील अभिलेखागार अत्यंत मौल्यवान आहे. त्याची काटेकोरपणे सुरक्षा होणे गरजेचे आहे आणि याला विशेष प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर एशियाटिक सोसायटीमधील कार्यक्रम केवळ मुंबई महानगरापुरते मर्यादित न राहता, सबंध महाराष्ट्राची जोडण्याबाबत येणार्‍या काळात प्रयत्न केला जाईल.”