आंध्रप्रदेशच्या जान्हवीने घातली अवकाशाला गवसणी! ठरली नासातर्फे अंतराळात जाणार एकमेव भारतीय महिला
25-Jun-2025
Total Views | 22
अमरावती : आंध्र प्रदेशच्या पलाकोल्लूतील लघूग्रह शोधक जान्हवी डांगेती हीच्या नावे एक अनोखा विक्रम रचला जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या पलाकोल्लू येथे राहणारी डांगेती जान्हवी २०२९मध्ये अंतराळात जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असलेल्या जान्हवीने नासाकडून घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण करत तीने हे यश संपादन केले आहे.
नासाकडून जान्हवीची ‘टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशन’ला प्रवास करण्यासाठी निवड झाली आहे. अंतराळात जाणाऱ्या जान्हवीने आपले प्राथमिक शिक्षण पलाकोल्लू येथे पूर्ण केल्यानंतर पुढील पदवी शिक्षण पंजाबच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. सध्या जान्हवीचे आई-वडील श्रीनिवास व पद्मश्री हे आपल्या कामानिम्मित कुवेत येथे स्थायिक आहेत.
जान्हवीने आपल्या अभ्यासातून संग्रहीत केलेल्या डेटामुळे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र शोध सहकार्यातील पॅनोरामिक सर्वेक्षण टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टम मधील लघुग्रहांचा शोध लागला होता. ती अॅनालॉग अंतराळवीर आणि स्पेस आइसलँडच्या प्रशिक्षणासाठी निवडली गेलेली पहिली भारतीय महिला होती. भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) सारख्या प्रमुख संस्थांमध्ये जान्हवी विद्यार्थ्यांना संबोधित करते.
नासातर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या अॅनालॉग मोहिमा, खोल समुद्रातील डायव्हींग आणि अंतराळ प्रवासाच्या ग्रहविज्ञान संबंधित जागतिक परिषदांमध्ये जान्हवीने सहभाग घेतला आहे. जान्हवीला तिच्या योगदानामुळे नासाने स्पेस अॅप्स चॅलेंजमध्ये पीपल्स चॉइस अवॉर्ड आणि इस्रोने वर्ल्ड स्पेस वीक यंग अचीव्हर अवॉर्डने सन्मानित केले आहे.