Operation Sindoor : २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त, केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणांवर कशी केली कारवाई? कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती
मुंबई : (Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. याबाबत भारतीय लष्कराने आज म्हणजे बुधवार, दि. ७ मे रोजी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत भारताची हवाई हल्ल्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करत हल्ला घडवून आणलेल्या ठिकाणांचे व्हिडिओ फुटेजही जारी केले आहेत. यावेळी पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. सीमारेषेपासून हल्ल्याचे ठिकाण किती लांब आहे याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
#WATCH | Delhi | #OperationSindoor| Col. Sofiya Qureshi, while addressing the media, presents videos showing destroyed terror camps, including Mehmoona Joya camp, Sialkot, which lies 12-18 km inside Pakistan.
१) मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर : हा तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून अंदाजे ८० ते १०० किमी अंतरावर आहे. जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यासह दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित. इथेच पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
२) मेहमुना जोया कॅम्प, सियालकोट : आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ ते १८ किलोमीटर दूर होते. हिज्बुल मुजाहीदीनचे मोठं तळ होतं. कठुआ जम्मू भागात दहशत पसरवण्याचे नियंत्रण केंद्र होतं. पठाणकोट एअरफोर्स बेसवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट इथंच तयार करण्यात आला होता.
३) सरजल कॅम्प, सियालकोट : हा तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किलोमीटर दूर आहे. साबा कठुआच्या समोर. मार्च २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या ४ जवानांची हत्या करण्यात आली होती. त्या दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित करण्यात आले होते. हे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचे मुख्य प्रक्षेपण केंद्र आहे. ही सुविधा सरजल परिसरातील तेहरा कलान गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आहे जेणेकरून त्याचा खरा उद्देश लपून राहील.
४) मरकझ तैयबा , मुरीदके : आंतरराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किलोमीटर दूर आहे. २००० मध्ये स्थापित लष्कर-ए-तैयबाचे सर्वात महत्वाचे प्रशिक्षण केंद्र अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसह २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशवाद्यांना इथेच प्रशिक्षित करण्यात आले होते.
पाकव्याप्त काश्मीरमधील लक्ष्य
५) सवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद : पाकिस्तान प्रशासित. काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून ३० किमी दूर. लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र. २० ऑक्टोबर २०२४-सोनमर्ग, २४ ऑक्टोबर २०२४ - गुलमर्ग आणि २२ एप्रिल २०२५ पहलगामच्या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांना प्रशिक्षण. तसेच एलईटी कॅडरची भरती, नोंदणी आणि प्रशिक्षणासाठी वापरले जाते. हे कॅम्प २००० च्या सुरुवातीपासून कार्यरत आहे.
६) सय्यद ना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद : हा जैश-ए-मोहम्मदचा महत्त्वाचा भाग आहे. हा शस्त्रं, स्फोटकं आणि प्रशिक्षणाचं केंद्रही होतं. इथे दहशतवादी दारुगोळा आणि शस्त्रे ठेवत होते.
७) गुलफूर कॅम्प, कोटली : हे नियंत्रण रेषेपासून दूर असलेले लष्कर-ए-तैयबाचे तळ होतं. ते राजौरी, पूंछमध्ये सक्रिय होते. २० एप्रिल २०२३ ला पुंछमध्ये आणि ९ जून २०२४ ला तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांच्या बस हल्ल्याची दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित केले होते.
८) बरनाला कॅम्प, भिमबर : नियंत्रण रेषेपासून ९ किलोमीटर दूर आहे. इथे शस्त्रं चालवणे, आयडी आणि जंगलात कसं सर्व्हाईव्ह करावं याचं प्रशिक्षण देण्यात येत होते.
९) अब्बास कॅम्प, कोटली : नियंत्रण रेषेपासून १३ किलोमीटर दूर आहे. लष्कर-ए-तैयबाचे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. १५ दहशतवादी प्रशिक्षित करण्याची याची क्षमता होती.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\