दहशतवादाविरोधी निर्णायक कारवाईची वेळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
03-May-2025
Total Views | 22
नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल लॉरेन्को यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोलाने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनाबद्दल भारत त्यांचे आभार मानतो. दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, १४० कोटी भारतीयांच्या वतीने, मी अंगोलाला 'आफ्रिकन युनियन'च्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देतो. भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या काळात 'आफ्रिकन युनियन'ला जी20 चे कायमचे सदस्यत्व मिळाले हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारत आणि आफ्रिकन देशांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवला. त्यांनी एकमेकांना प्रेरणा दिली. आज आपण ग्लोबल साउथच्या हितसंबंधांना, आशांना, अपेक्षांना आणि आकांक्षांना आवाज देण्यासाठी एकत्र उभे आहोत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.