स्वयंपुनर्विकास योजना - गृहनिर्माण क्षेत्रात 'गेमचेंजर' ठरेल
- आ. प्रविण दरेकर; अभ्यासगटाची पहिली बैठक संपन्न
03-May-2025
Total Views | 56
मुंबई, स्वयंपुनर्विकास योजना ही महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रात 'गेमचेंजर' ठरेल, असा विश्वास स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी शुक्रवार, दि. ३ मे रोजी व्यक्त केला.
वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन, गुलझारीलाल नंदा सभागृहात दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरेकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करीत आहेत. मुंबईत १५ इमारती स्वयंपुनर्विकसित झाल्या. मुंबईतून मराठी माणूस बाहेर जात होता, त्याला मुंबईत राहण्यासाठी स्वयंपुनर्विकास हे हत्यार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ओळखले. म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली या विषयात आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, पैसे उभे करण्याबाबत काय केले पाहिजे, नियमात काही सुधारणा केल्या पाहिजेत का? अशा प्रकारचा सर्वकष अहवाल शासनाला अभ्यास गटाच्या माध्यमातून द्यावा, अशी सरकार व मुख्यमंत्री यांची इच्छा आहे. त्यामुळे आज जवळपास अडीच तास सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या हौसिंग विषयावर बैठकीत उहापोह झाल्याचे दरेकरांनी म्हटले.
सरकारने स्वयंपुनर्विकासाबाबत १८ निर्णय घेतले होते. त्यातील बऱ्याच निर्णयांची अंमलबजावणी झाली नव्हती. ती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून काय केले पाहिजे, त्या-त्या विभागाने जीआर काढले पाहिजेत, या संदर्भात संदीग्धता होती ती दूर करण्याचे ठरले. तसेच हा विषय केवळ मुंबईतच नाही तर ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या सर्व महापालिका क्षेत्रात, तालुका स्तरावरील नगरपालिका, पंचायत क्षेत्रात कसा राबविता येईल याची अहवालात मुख्यमंत्र्यांना अपेक्षा आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्व महापालिका आहेत तेथील जिल्ह्याचे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्षही या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. ते हा विषय त्यांच्या क्षेत्रात नेणार आहेत. काही आमदारांवरही ही जबाबदारी देण्यात आली आहे. ते तेथील यंत्रणेसोबत चर्चा करतील. त्यांचेही काही प्रश्न असतील तर ते आम्ही अहवालात समाविष्ट करू व चांगला परिपूर्ण अहवाल स्वयंपुनर्विकासासंदर्भात कसा होईल याची काळजी घेऊ, असेही दरेकरांनी स्पष्ट केले.
या बैठकीला भाजपा आमदार प्रसाद लाड, आ. प्रशांत ठाकूर, आ. स्नेहा दुबे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांसह मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी, म्हाडाचे मुख्य अधिकारी, मुंबई पालिका आयुक्तांनी प्राधिकृत केलेले उपायुक्त, एमएमआरडीए आयुक्तांनी प्राधिकृत केलेले अतिरिक्त आयुक्त, महसूल विभागाचे अधिकारी, अप्पर आयुक्त, उपजिल्हाधिकारी, सिडको अधिकारी, वित्त विभागाचे सह-उपसंचालक, लेखाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारच्या गृहनिर्माण धोरणात स्वयंपुनर्विकास योजनेचा अंतर्भाव करायचा आहे. त्यामुळे या बैठका महत्वाच्या आहेत. अशा बैठका पुढेही होतील, उपबैठका होतील. संबंधित विभागासोबत समन्वय होईल, या सगळ्याचा सार एकत्रित करून आमच्या अभ्यास गटाचा अहवाल दोन-अडीच महिन्यांत सरकारला सादर करण्याचा प्रयत्न करू, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.