
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kashish Chaudhary Balochistan) भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तानातून एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी येतेय. २५ वर्षीय कशिश चौधरी या हिंदू युवतीने इतिहास रचलाय. बलुचिस्तानमध्ये सहाय्यक आयुक्त होणारी ती पहिली अल्पसंख्याक हिंदू मुलगी ठरलीय. कशिश या चगाई जिल्ह्यातील नोशकी शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी बलुचिस्तान लोकसेवा आयोगाची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केलीय. मुख्यमंत्री सरफराज बुगती यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महिला आणि अल्पसंख्याकांसाठी काम करण्याबद्दल चर्चा केली. कशिश चौधरी या बलुचिस्तानसाठी अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. ज्या भागातून मुलींचे अपहरण आणि धर्मांतराच्या बातम्या येतात अशा भागातून एक हिंदू मुलगी इतक्या उच्च पदावर पोहोचली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
हे वाचलंत का? : जवान पूर्णम कुमार भारतात परतले; २० दिवसांपासून होते पाकिस्तानच्या ताब्यात
समाजासाठी काहीतरी करण्याचा दृढनिश्चय केला होता आणि यामुळे आपल्याला या प्रवासात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली, असे कशिश यांचे म्हणणे आहे. कशिशचे वडील गिरधारी लाल हे एक सामान्य व्यापारी आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, हा त्यांच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. कशिश सुरुवातीपासूनच अभ्यासाबाबत हुशार होती आणि नेहमीच ती महिला सक्षमीकरणाबद्दल बोलायची.