सेन्सॉर बोर्डाला 'तो' अधिकार नाही! फुले वाड्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
11-Apr-2025
Total Views |
पुणे : क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महात्मा फुले यांच्या चित्रपटातील दृष्य समग्र वाड़मयाप्रमाणे आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसवर आंदोलन करू. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही अस्तित्वात आहेत. १५० वर्षांहून अधिक काळ त्यांच्या कार्याला झाला आहे. पण सर्व समाजांमध्ये त्यांचे कार्य स्विकारले जात नसल्याचे दिसत नाही."
"महात्मा फुले यांच्यावर असलेल्या चित्रपटातील ते दृष्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या महात्मा फुलेंच्या समग्र साहित्याचा हिस्सा आहे. केंद्र शासनानेही त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाला त्याला विरोध करण्याचा अधिकार नाही. सेन्सॉर बोर्ड जर आपला विरोध तसाच ठेवणार असेल तर सेन्सॉर बोर्डाच्या मेंबरच्या घरासमोर आम्ही निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही. त्यांची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणीच देशातध्ये राबवली जाईल," असेही ते म्हणले.