धर्मादाय रुग्णालयांबाबत मोठा निर्णय! यापुढे 'धर्मादाय' असा...

    10-Apr-2025
Total Views |

Rupali Chakankar 
 
मुंबई : गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता धर्मादाय रुग्णालयांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
 
यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली. "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्यामाध्यमातून मदत न केल्याचे चौकशी अहवालातही समोर आले आहे. या अनुषंगाने अनेक रुग्णालये धर्मादाय असूनही त्याची माहिती देत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही हे निदर्शनास आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही चांगले उपचार मिळावे यासाठी असलेला धर्मादाय रुग्णालयाचा हेतूच साध्य होत नाही. तेव्हा सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, त्यानुसार असलेल्या सुविधा, नियमावली यांची माहितीही लावावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाने आयुक्त, धर्मादाय यांच्या कार्यालयाला दिले होते."
 
हे वाचलंत का? -  एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री प्रताप सरनाईक यांनी नियुक्ती!
 
दरम्यान, धर्मादाय सहआयुक्त यांच्या विधी व न्याय विभागाने असे फलक लावण्यात आले असल्याचे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही रुग्णालयाकडून फलकप्रसिद्धी करणेबाबत पूर्तता राहिली असल्यास त्याबाबत कारवाई करून त्रुटी दूर करण्यासाठी निर्देशित केले असल्याचे कळवले आहे. यापुढे सामान्य नागरिकांना असे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या पण तसा उल्लेख केलेला नाही, फलक लावला नाही असे आढळल्यास तसेच नियमावलीप्रमाणे मदत न मिळाल्यास ते राज्य महिला आयोगाला, शासनाला त्वरित तक्रार करू शकतात, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.