छत्रपती शिवरायांच्या थीम पार्कचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा; भाजपा गटनेते दरेकरांची विधान परिषदेत मागणी
- पाचाड येथील ३०० वर्षांपूर्वीचा वाडा उभारण्याच्या कामाला पर्यटन विभागाच्या आराखड्यात प्रथम प्राधान्य
- मंत्री शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत घोषणा
05-Mar-2025
Total Views |
मुंबई - ( Chhatrapati Shivaji's theme park ) राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे थीम पार्क संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या थीम पार्क संग्रहालयाचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने घोषित करावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रती सरकार अनेक ठिकाणी स्मृती भवने, थीम पार्क उभारत आहे. त्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा. जिजाऊंच्या पाचाड येथील वाड्याच्या कामाचाही कालबद्ध कार्यक्रम जाहीर करुन ते काम पूर्ण करावे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी रायगड किल्ल्यासाठी प्राधिकरण तयार केले आहे, त्याचेही काम प्रगतीपथावर आहे. ही शिवसृष्टी झाली तर आणखी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील व आपल्या राजांचा इतिहास सर्वदूर जाईल. त्यामुळे यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावा, अशी विनंती दरेकर यांनी सभागृहात केली.
या प्रश्नाला सरकारतर्फे उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कि, रायगड संवर्धन प्राधिकरण हे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केले आहे. त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर वेगळ्या पद्धतीचे संवर्धनाचे काम सुरू आहे. सन्माननीय सदस्य प्रविण दरेकरांनी उल्लेख केला ती जागा पाचाड येथे आहे. जिथे राजमाता जिजाऊंचा वाडा होता, जिजाऊंनी तेथेच देह ठेवला. तो पाचाडचा वाडा शिवकाळात जसा होता तसाच करण्याचे नियोजन आहे. ती जागा पुरातन खात्याच्या अखत्यारीत येत नाही. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. त्यामुळे ३०० वर्षांपूर्वीचा वाडा उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याला प्रथम प्राधान्य या वर्षाच्या पर्यटन विभागाच्या आराखड्यात दिले जाईल.