कोरटकर चिल्लर माणूस, तुम्ही नेहरूंचा निषेध नोंदवणार का?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंबादास दानवेंना सवाल

    05-Mar-2025
Total Views |

Koratkar Chillar Man, will you register your protest against Nehru Devendra Fadanvis on ambadas danve
 
मुंबई: ( Devendra Fadanvis on ambadas danve ) छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुद्दा बुधवार, दि. ५ मार्च रोजी विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची कोंडी केली.
 
"प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. पण, तुम्ही जितेंद्र आव्हाड आणि जवाहरलाल नेहरू यांचा निषेध नोंदवणार का?", असा सवाल त्यांनी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना विचारला. प्रशांत कोरटकर छत्रपतींबद्दल अवमानकारक बोलतो, त्याचा मोबाईल जप्त केला जातो. मात्र, त्याला अटक होत नाही. महाराजांचा अवमान करणाऱ्या अबू आझमीवरही कारवाई झाली पाहिजे, त्याला तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली.
 
दानवेंच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रशांत कोरटकरने कोल्हापूरच्या कोर्टातून अटकेपासून संरक्षण मिळवले आहे. कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. मला सांगा जितेंद्र आव्हाड काय काय बोलले. त्याचा कधी निषेध केला का तुम्ही? ते म्हणतात, औरंगजेब होते म्हणून शिवाजी महाराज होते, महाराज पाच फुटांचे होते आणि औरंगजेब बलाढ्य होता. त्यांचाही निषेध करा. सिलेक्टिव्ह निषेध करु नका. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, पं. जवाहरलाल नेहरूंनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल जे काही लिहिले आहे, त्याचा निषेध करणार आहात का? आहे का हिंमत? आम्ही खऱ्या अर्थाने महाराजांचा आदर करतो, अपमान सहन करणार नाही. "देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था... महापराक्रमी, परमप्रतापी एकही शंभूराजा था..." त्यामुळे पं. नेहरुंचाही धिक्कार झाला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
 
सभागृहाचे कामकाज स्थगित
 
मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक उत्तरामुळे विरोधकांच्या मुद्द्यातील हवा निघाली. त्यामुळे चिंतीत झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानपरिषदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभापती राम शिंदे यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
 
संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार
 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या संगमेश्वर भूमीतून घाताने पकडण्यात आले, त्या संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.