स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

    13-Mar-2025
Total Views |
 
tamil nadu govt replaces rupee symbol from budget language row mk stalin govt
 
चेन्नई : (Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
 
१४ मार्च रोजी राज्य विधानसभेत सादर होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पाचा टीझर एमके स्टॅलिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला.या टिझरमध्ये सुरूवातीला रुपयाचे बदललेले चिन्ह पाहायला मिळत आहे. एनईपी आणि त्रिभाषा सूत्राला तमिळनाडू सरकार विरोध करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय चलनाचे चिन्ह वापरण्यास एखाद्या राज्याने नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे भाषेच्या मुद्द्यावरुन राजकरण करणाऱ्या स्टॅलिन सरकारने हटवलेले हे चिन्ह एका तमिळ व्यक्तिने तयार केलेले आहे. द्रमुक नेते आणि माजी आमदार एन. धर्मलिंगम यांचे पुत्र उदय कुमार धर्मलिंगम यांनी रुपयाच्या (₹) चिन्हाचे डिझाइन बनवलेले होते.
 
तामिळनाडूचे भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी रुपयाचे चिन्ह बदलण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “डीएमके सरकारच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पामध्ये तमिळ व्यक्तीने बनवलेले रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले, जे की संपूर्ण भारताने स्वीकारले आणि आपल्या चलनात समाविष्ट केले.” तसेच या चिन्हाची रचना करणारे उदय कुमार धर्मलिंगम हे डीएमकेच्या माजी आमदाराचे पुत्र असल्याचे बाब नमूद करत अन्नामलाई यांनी संताप व्यक्त करत एमके स्टॅलिन यांनी खडेबोल सुनावले आहेत.