दादर-भुसावळ ट्रेनला पालघरमध्ये थांबा

पश्चिम रेल्वेने दिली माहिती

    11-Mar-2025
Total Views |

palghar station hault dadar bhusaval train



मुंबई, दि.११ : प्रतिनिधी 
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला पालघर स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता दादरहून सुटणारी भुसावळ गाडी पालघरला थांबेल. ०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ या विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने ही मागणी केली होती.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२५ पासून दादरहून सुटणारी दादर-भुसावळ विशेष गाडी क्रमांक ०९०५१ ला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन पालघर स्टेशनवर ०१.२९ वाजता पोहोचेल आणि ०१.३१ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, १५ मार्च २०२५ पासून भुसावळहून सुटणाऱ्या ०९०५२ भुसावळ-दादर विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन पालघर स्टेशनवर ०३.१७ वाजता पोहोचेल आणि ०३.१९ वाजता निघेल.

जास्तीत जास्त गाड्या पालघरला थांबाव्या असा प्रयत्न
मुंबई रेल्वे प्रवासी संघ गेले कित्येक वर्ष ही मागणी करत होती. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. वाढवण बंदर सारखा मोठा प्रकल्प पालघरमध्ये होतो आहे. अशावेळी जास्तीत जास्त गाड्या पालघरला थांबाव्या असा आमचा प्रयत्न आहे. दादर-भुसावळ गाडीसाठीही आम्ही असाच प्रयत्न केला त्याला आम्हाला यश आले आहे. पालघरमध्ये जळगाव, भुसावळ याभागात हजारो नागरिक वास्तव्य करतात. त्यांच्यासाठी हा निर्णय होणं आवश्यक होते. याप्रमाणेच पुणे-वडोदरा ही वंदे भारत ट्रेनलाही पालघरमध्ये थांबा मिळावा अशी मागणी आम्ही केली आहे. दादर-बिकानेर ही गाडीलाही पालघरमध्ये थांबा द्यावा अशी आमची मागणी आहे. पालघर दिवसेंदिवस वाढते आहे. रेल्वेलाही पालघरमधून चांगला महसूल मिळतो.

- सदानंद ( नंदु ) पावगी, पालघर, मुंबई रेल प्रवासी संघटना