पुण्यात काँग्रेसला धक्का! रवींद्र धंगेकरांनी दिला राजीनामा, कुठल्या पक्षात जाणार?
10-Mar-2025
Total Views |
पुणे : (Ravindra Dhangekar left Congress) पुण्यातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. काँग्रेसला पुण्यात हा मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर म्हणाले, “अशा प्रकारचा कोणताही निर्णय हा प्रचंड कठीण असतो. आपण सगळी माणसं आहोत. अशा प्रसंगी आपल्याला दुःख होतंच. मात्र, कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून सांगत होते, चर्चा करत होते. माझी मतदारांशी चर्चा झाली. त्या सर्वांचं म्हणणं आहे की आमची कामं कोण करणार? लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामं करू शकत नाही. अशा वेळी माझी दोन-तीन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. मी त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री उदय सामंत हे देखील माझे मित्र आहेत. माझी त्यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांनी वारंवार सांगितलं की एकदा आमच्याबरोबर काम करा.”
शिवसेनेतील प्रवेशाबाबत सुरु असणाऱ्या चर्चांवर धंगेकर म्हणाले, “मी शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर असल्याच्या बातम्या मधल्या काळात वर्तमानपत्रांनी दिल्या होत्या. त्यानंतर डोक्यावरून बरंच पाणी गेलं. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, ‘तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील’. मात्र, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत. याच काळात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तसेच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चोहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे. त्यानंतर आमचा जो निर्णय होईल तो जाहीर करू.”