विरोधी पक्षाने रिफ्रेश कोर्स करण्याची गरज – केंद्रीय मंत्री नड्डांचा टोला

    10-Mar-2025
Total Views |
 
j p Nadda on congress
 
नवी दिल्ली: ( j p Nadda on congress ) सभागृहाचे कामकाज कसे चालते, हे समजून घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी रिफ्रेश कोर्स करावा, असा टोला केंद्रीय आरोग्य मंत्री आणि सभागृह नेते जगतप्रकाश नड्डा यांनी राज्यसभेत लगावला आहे.
 
संसद अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. यावेळी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी नियम २६७ अंतर्गत सभागृहात राज्यसभेत विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. परवानगी न मिळाल्याने विरोधी सदस्यांनी सभागृहातून गदारोळ करून सभात्याग केला. विरोधकांच्या या वृत्तीवर सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी नाराजी व्यक्त केली.
 
केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यासह विरोधी पक्षातील सदस्यांसाठी एक रिफ्रेशर कोर्स आयोजित केला पाहिजे, जेणेकरून त्यांना संसदेचे नियम आणि कायदे कळतील. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या सभात्याग ही बेजबाबदार कृती असून त्याचा निषेध करत असल्याचेही नड्डा यांनी यावेळी म्हटले.
 
ही पद्धत म्हणजे एक प्रकारे विरोधी पक्षांकडून संस्थांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, याद्वारे संसदेच्या शिष्टाचाराला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही टोला नड्डा यांनी यावेळी लगावला.
 
मतदारयादीचा मुद्दाही संसदेत
 
मतदारयादीमध्ये घोळ असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. देशभरात मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदार यादीवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे, असे संपूर्ण विरोधी पक्ष एकत्रितपणे मागणी करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. याच मुद्द्यावरूवन तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही गदारोळ केला.