ठाणे : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आधीच काँग्रेसमध्ये गळती सुरू असताना ठाणे काँग्रेसमध्ये आजी - माजी पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात येत आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणास्तव ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांना पक्षातुन निलंबीत केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता महायुतीच्या उमेदवाराचा जाहीर प्रचार करून शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आठ जणांना पक्षातून निलंबित करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विधानसभा निवडणुकीत अनिल साळवी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करता, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार नजीब मुल्ला याचा जाहीर प्रचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सबब काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात, आघाडी धर्म न पाळता पक्ष शिस्तभंग केल्यामुळे साळवी यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.