देशात क्रीडा क्षेत्र नवनवीन उंची गाठत आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यामागे देशांतर्गत स्पर्धांचा वाढलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. अशीच एक उत्तम दर्जा असलेली वनवासी क्रीडा महोत्सव स्पर्धा छत्तीसगढमध्ये पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत अत्यंत साधेपणाने प्रारंभ झालेला आणि जनजाती युवकांचे क्रीडानैपुण्य दर्शवणारा, राष्ट्रीय ‘वनवासी क्रीडा महोत्सव २०२४’ हा भारताच्या छत्तीसगढ राज्याची राजधानी असलेल्या, रायपूर येथील विज्ञान महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर दि. २७ ते दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी दरम्यान संपन्न झाला.
“उछले कुदे, जल में तैरे । बाधाओं के पथ पर दौडे । योग कबड्डी खोखो खेले । वजनो से ताकद को तोले । धनुष बाण से तीर साधेंगे एकलव्य का मेल । खेल खिलाडी खेल ॥” हा आहे कै. अशोक साठे यांच्या क्रीडा गीतामधील एक परिच्छेद. त्यामधील ‘धनुष बाण से तीर साधेंगे एकलव्य का मेल ।’ ही ओळ दरवर्षी वाचतानाच आपल्यासमोर उभे राहते, एकलव्याचा महाभारत काळ ते आजच्या आधुनिक ऑलिम्पिकपर्यंतचे धनुर्विद्येचे स्वरुप आणि आदिवासी क्षेत्रातील क्रीडापटूंचे कसबही.
आपल्याला माहीत आहेच की, ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ हा राष्ट्रीय स्तरावर ‘एकलव्य खेलकुद प्रतियोगिता’ आयोजित करतो. या स्पर्धांमध्ये मैदानी स्पर्धा, खो-खो, कबड्डी, फुटबॉल अशा अनेक क्रीडाप्रकारांचा सहभाग असतो. या बहुविध क्रीडा प्रकारात धनुर्विद्येचा सहभाग तर अनिवार्य असतोच असतो, तर त्याच्याच जोडीने दरवर्षी अजून एका क्रीडाप्रकाराचा सहभागही असतो.
रायपूरला २४व्या ‘राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धां’चे परंपरागत पद्धतीत सुरू झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी, प्रथमत: सर्व पाहुणे आणि उपस्थित क्रीडापटू, त्यांचे व्यवस्थापक व प्रशिक्षक वगैरेंनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत, त्यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
या राष्ट्रीय स्तरावर चालणार्या स्पर्धेत ‘वनवासी कल्याण आश्रम’च्या, ३३ प्रांतामधील जवळपास ८०० मुलामुलींनी सहभाग घेतला होता. त्यात अंदमान निकोबारसहित पूर्वोत्तर राज्ये, ओडिशा, गुजरात, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, उत्तर प्रदेश अशा राज्यांसहित, नेपाळ देशातील जनजातीय खेळाडूंनीही सहभाग घेतला होता. या खेळांमध्ये यावर्षी फुटबॉल आणि तीरंदाजीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. फुटबॉलच्या स्पर्धांसाठी, ‘कोटा स्टेडियम’ आणि ‘पंडित रवि शंकर शुक्ल युनिवर्सिटी’ मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. तर धनुर्विद्येच्या स्पर्धांसाठी राज्य तीरंदाजी अॅकेडमीचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते.
छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री विष्णुदेव रामप्रसाद साई आणि राज्याचे वनमंत्री केदार कश्यप, जे स्वागत समितीचे अध्यक्षही होते, यांनी स्पर्धांना जे शुभेच्छा संदेश पाठवले होते. या शुभेच्छा संदेशांचे प्रदेश सचिव डॉ. अनुराग जैन यांनी कार्यक्रमस्थळी वाचन केले. ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’चे राष्ट्रीय संगठनमंत्री अतुल जोग, राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट, छत्तीसगढ प्रांताचे अध्यक्ष उमेश कश्यप आणि संगठनमंत्री रामनाथ कश्यप हे यावेळी उपस्थित होते.
स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतेंद्र सिंह या प्रसंगी म्हणाले की, “जनजातीय खेळाडूंची प्रतिभा विश्व स्तरावर पोहोचावी, या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच, त्यांनी खेलकुदमुळे होणारे फायदे विशद करताना म्हटले की, कोणत्याही खेळातील नियम शिकून ते आचरले, तर त्यातून अनुशासनाची आणि शिष्टाचाराची शिकवण घेणारे नागरिक तयार व्हायला मदत होते.” पुढे ते म्हणाले की, “ज्यांच्याकडे खेल भावना असते, त्याला त्याच्या जीवनात संघर्षांशी लढण्यासाठीचे साहस आपसूकच येते. खेळच मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक दृष्टिकोन शिकवत, आपल्याला मजबूत करत असतात. खेळांच्या माध्यमातूनच आपण देशाचे आदर्श नागरिक होत, राष्ट्र विकासात आपला यथोचित हातभार लावत असतो.” श्री सिंह यांनी २४वी ‘राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धां’चे उद्घाटन होत असल्याची घोषणा करत, खेळाडूंना क्रीडा भावना जोपासत खेळण्याची शपथही दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सतेंद्र सिंह यांनी, त्या प्रसंगी ‘वनवासी खेल महोत्सवा’च्या प्रारंभाच्या आठवणी सर्वांना सांगितल्या. आजच्या पिढी समोर या आठवणी ताज्या करताना ते म्हटले, ”१९५२ साली ‘वनवासी कल्याण आश्रम’च्या स्थापनेनंतर ३३ वर्षांनी पुण्यात, ‘खेल खिलाडी खेल’ या गीताचे लेखक कै अशोक साठे यांच्या पुढाकाराने खेलकुद प्रकल्पाची सुरुवात झाली. मुंबईत २० नवयुवकांना जोडीने घेऊन दि. ७ ते दि. ९ ऑगस्ट १९८७ रोजी खेल केंद्र सुरू करण्यात आले होते. १९९१ साली मुंबईत पहिली ‘वनवासी क्रीडा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्याला सुप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या पहिल्याच स्पर्धेत, १५ राज्यांच्या ३९२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तेव्हापासून २३ स्पर्धा झाल्यानंतरची २०२४ सालची ही २४वी स्पर्धा यशस्वीपणे रायपूरात पार पडली.”
रायपूरच्या स्पर्धेत भाषण करताना ऑलिम्पियन धावपटू कविता राऊत यांनी सांगितले की, “आज आपण खेळांचा उपयोग आपले भविष्य घडवण्यासाठी करु शकतो. रोजगाराची संधी क्रीडा स्पर्धेच्या बक्षिसाच्या स्वरुपात उपलब्ध होऊ शकते. खेळाडूला त्याच्या नैपुण्यामुळे नोकरीत वाव मिळू शकतो.” कविता राऊत या ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष आहेत. कविता राऊत यांची जडणघडण बालपणात ज्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’मुळे घडली, त्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची त्यांनी न विसरता आठवण काढली. रांचीमध्ये २००० साली झालेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा महोत्सवा’त एक धावपटू म्हणून सहभागी झालेली तेव्हाची कविता, आजही वनवासी कल्याण आश्रमाच्या खेलकुद आयामाचे आभार मानत नवीन पिढीला प्रोत्साहन देत आहे.
समारोपाच्या कार्यक्रमात ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह, अखिल भारतीय खेलकुद प्रमुख फूल सिंह लेप्चा, राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट, छत्तीसगढ प्रांत अध्यक्ष उमेश कश्यप आणि संगठनमंत्री रामनाथ कश्यप, सचिव अनुराग जैन, स्वागत समितीचे सचिव अमर बंसल, क्षेत्रीय संगठनमंत्री प्रवीण ढोलके, सह संगठनमंत्री सुभाष बडोले, पं. रविशंकर शुक्ल विश्वविद्यालयाचे शारीरिक शिक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक राजीव चौधरी, वनवासी विकास समिती महानगर रायपूरचे अध्यक्ष रवि गोयल व सचिव राजीव शर्मा, सह खेलकुद प्रमुख पंकज सिंह, संगीता चौबे, डॉ. विजय साण्डिल्य, डॉ. आशुतोष साण्डिल्य, डॉ. मीना मुर्मू, टिशेन भगत, गोपाल वियानी असे अनेक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.
जनजातीय खेळाडूंचा सहभाग असलेली व जगातील सर्वात भव्यदिव्य क्रीडास्पर्धेचे वनवासी कल्याण आश्रमाद्वारे आयोजन होत आले आहे. जोग यांनी सांगितले की, यापूर्वी भोपाळला आयोजित झालेल्या स्पर्धेत फक्त धनुर्विद्येचा सहभाग असलेल्या ३१६ जनजातीय धनुर्धारांनी सहभाग घेतला होता. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड’ने त्याची दखल घेत, त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती.
जोग सांगतात की, या खेलकुद स्पर्धांचे आयोजन केवळ पदके मिळवण्यापुरते मर्यादित नसून, खेळाडूंमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी उपयोगी पडते. कठोर परिश्रमाने आपापल्या खेळाचा सराव करत राहिल्यास, आगामी काळात राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव तुम्ही सहज उज्ज्वल करु शकता.
वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एच.के.नागु यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करत सांगितले की, ”खेळांना ना कोणती एक भाषा असते ना कोणती सीमा, खेळ, प्रतिभा हीच खेळाडूंची खरी ओळख असते.” ते सांगतात की, “शारीरिक स्वास्थ्याच्या जोडीनेच, क्रीडाक्षेत्रातल्या संघर्षासाठीही आपण तयार राहिले पाहिजे.” या स्पर्धेतील सहभागी विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते करंडक, विजयचिन्ह, पारितोषिक, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
फक्त मुलांसाठी ठेवण्यात आलेल्या फुटबॉलच्या स्पर्धेत, एकूण २२ सामन्यात मिळून १२२ गोल झाले. तर नऊ सामन्यांचा निकाल टायब्रेकर अथवा पेनल्टी शूटआऊटच्या माध्यमातून लागला. फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, संथाल परगणाच्या संघाने केरळचा पेनल्टी शूट आऊटमध्ये एक विरुद्ध चार गोलने पराभव केला आणि करंडक हस्तगत केला. केरळ उपविजेते ठरले, तर झारखंडने तिसरा क्रमांक मिळवला. संथाल परगण्याचा गोलकिपर विनय कुण्डू हा सर्वश्रेष्ठ गोलकीपर ठरला. त्याच्याच संघातील विमल मराण्डी हा ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरला. अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा, केरळचा अभिनंद हा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.
धनुर्विद्येच्या स्पर्धेत मुलांसमवेत मुलींनीही आपला खेळ आणि कौशल्य सगळ्यांना दाखवत मंत्रमुग्ध केले. धनुर्विद्येच्या क्रीडा प्रकारात ४० मीटर, ३० मीटर आणि २० मीटर असे अंतर ठेवले होते, त्यात जुनियर-सब जुनियर गटात ४०० आदिवासी मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.
पूर्व-उत्तर प्रदेशच्या मुलांच्या, तर मुलींमध्ये कर्नाटकच्या संघाने स्पर्धेत आपले विशेष कसब दाखवले. धनुर्विद्येत पूर्व-उत्तर प्रदेशच्या धनुर्धारांनी एकूण १२ पैकी चार पदके पटकावली. धनुर्विद्येत जुनियर बालक गटात, राजस्थानच्या हिमेश बरांडा याने ६४३ गुण मिळवत सुवर्ण पदक मिळवले. पूर्व उत्तर प्रदेशाच्या आदित्य सिंहने ६३७ गुण मिळवत रौप्य पदक, तर हीरा सिंहने ६२६ गुण मिळवत कांस्य पदक मिळवले. सब जुनियर बालक या गटात, उत्तर बंगालच्या सकनोन लेपचा याने ६६४ गुणांसह सुवर्ण, पूर्व उत्तरप्रदेशाच्या दीपक याने ६६१ गुण घेत रौप्य, तर इंद्रदेव कुमार याने ६५१ अंक घेत कांस्य पदक पटकावले.
जुनियर बालिका वर्गात, ओडिशाच्या मंजुलता हिने ५६३ अंक मिळवत सुवर्ण, छत्तीसगढच्या रामशिला हिने ४९३ अंक घेत रौप्य आणि ओडिशाच्या मीना तीरियाने ४६० गुण घेत कांस्य पदक मिळवले. सब जुनियर बालिका गटात कर्नाटकच्या भाग्यश्री हिने ५९९ गुण मिळवत सुवर्ण आणि अन्नपूर्णा हिने ५६३ गुण मिळवत रौप्य पदक तर राजस्थानच्या दर्शी डामोर हिने ५४१ गुण घेत कांस्य पदक मिळवले.
भारतीय क्रीडाक्षेत्रात जर हे जनजाती युवक-युवती स्पर्धांमध्ये असे कसब दाखवत असतील आणि त्यांची प्रशंसा होत असेल, तर देशात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू नक्कीच घडत राहतील आणि देशाची क्रीडाक्षेत्रातील कामगिरी वृद्धिंगत होत राहील हे नक्की.
(लेखक माजी खेलकुद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकी पटू आहेत)
संपर्क ९४२२०३१७०४