मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sadhvi Rithambhara Manvandana Sanchalan) तैमूर आणि औरंगजेबला जन्म देणारी माता देशाची आदर्श होऊ शकत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, राणी दुर्गावती आणि असंख्य वीरांगना याच देशाच्या परम आदर्श आहेत", असे प्रतिपादन परमपूज्य साध्वी ऋतंभरा यांनी केले.
हे वाचलंत का? : घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांना मलेशिया सरकारने पिटाळले!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी व मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत) 'मानवंदना संचलन' आयोजित करण्यात आले होते. साध्वी ऋतंभरा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर (पू) येथे मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी दुपारी ३ वाजता तब्बल ५ हजार महिला व तरुणींच्या भव्य संचलनातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यात आली. आजच्या तरुणींनी सक्षम व्हावे आणि आपल्या वीरांगनांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
साध्वी ऋतंभरा पुढे म्हणाल्या की, देशाची सनातन श्रद्धा कुठल्याही विधर्मीच्या हातात जाऊ देऊ नका. अन्यथा ती नष्ट होईल, तिचे तुकडे तुकडे केले जातील. त्यामुळे कोणीही लव्ह जिहादच्या शिकार होऊ नका, विधर्मी आणि जिहाद्यांचे डोळे काढण्याची ताकद प्रत्येक भारतीय महिलांमध्ये आहे."
"या मानवंदना संचलनातून आपले आदर्श कोण आहेत हे सर्व दुर्गावाहिनी आणि मातृशक्तीने आज निश्चित केले आहे. महिला या गृहलक्ष्मी आहेत. प्रत्येकाला धर्माची ओळख असायला हवी, धर्माप्रती निष्ठा हवी, आपल्या मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करणारी ही आईच असते. प्रत्येक आईने ते कर्तव्य बजावले पाहिजे.", असे म्हणत साध्वी ऋतंभरा यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात उपस्थित महिलांसह देशातील लव जिहाद सारख्या गोष्टींना नष्ट करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव संबोधित करताना म्हणाल्या, "महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एसएनडीटी विद्यापीठाची स्थापनासुद्धा महिला सशक्तीकरणासाठीच केली आणि तेच कार्य विश्व हिंदू परिषद मातृशक्ती व दुर्गावाहिनी करत आहे. ही बाब नक्कीच गौरवास्पद आहे. देशात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताची उज्ज्वल परंपरा, शूर विरांगणा यांचा इतिहास शिक्षण अभ्यासक्रमात येत आहे आणि ते करण्याचे सौभाग्य एस.एन.डी.टी विद्यापीठाला सुद्धा मिळाले आहे "
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत उपाध्यक्षा प्रिया सावंत, प्रांत मंत्री मोहन सालेकर, मातृशक्ति कोकण प्रांत संयोजिका मनिषा भोईर, दुर्गावाहिनी कोकण प्रांत संयोजिका स्वाती भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.