कै. वसंत त्रिंबक जोशी हे मालाड मधील एक ज्येष्ठ वैद्यकीय चिकित्सक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक. आपले शालेय शिक्षण व वैद्यकीय शिक्षण पुणे व कर्णावती येथे पूर्ण केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील पालघरजवळील मनोर मधल्या शासकीय वैद्यकीय केंद्रावर त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकीर्दीस प्रारंभ केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९३८ मध्ये वसंतरावांचा संबंध आल्यापासून त्यांच्या जीवनातील तेच प्रमुख कार्यक्षेत्र बनले. संघाची प्रतिज्ञा घेतल्यापासून संघकार्याचे स्वीकारलेले व्रत त्यांनी आजन्म यशस्वीपणे निभावले. संघाचे काम करण्यावरून तेथील एका शासकीय अधिकाऱ्याशी खटका उडाल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली व १९३८ मध्ये मालाड येथे त्यांनी आपला स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.
मालाड बरोबरच मार्वे व गोरेगाव या उपनगरातही त्यांचा दवाखाना होता. त्यांना पैशाचा लोभ अजिबात नव्हता, उलट अनेकांवर त्यांनी सवलतीने वा विनाशुल्क उपचार केले आहेत. त्यांच्या अशा आत्मीयतेच्या वागण्याने व बोलण्याने असंख्य रुग्णांच्या परिवारातील ते एक वडीलधारे घटक बनले होते. वसंतरावांनी वैद्यकीय व्यवसायाबरोबरच अनेक सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने भाग घेतला. मालाडची ब्राह्मण सभा, श्रीसमर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय इत्यादी कामांकडे त्यांचे लक्ष असे. त्या-त्या ठिकाणी योग्य कार्यकर्त्यांनी दायित्व घेऊन काम करावे यासाठी त्यांनी अनेकांना कार्यप्रवृत्त केल्याची माहिती आहे.
मालाडमधील मराठी माध्यमाची शाळा अचानक बंद झाल्यामुळे काही प्रतिष्ठित मंडळींनी शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने एक शैक्षणिक संस्था जून १९५६ मध्ये स्थापन केली. डॉक्टर जोशी या मंडळाचे एक प्रमुख संस्थापक सदस्य होते. समााजिक जाणीव असलेल्या समाजातील अनेक सामान्य व धनवान मंडळींकडून त्यांनी देणग्या व ठेवी मिळवल्या होत्या. पाच - दहा विद्यार्थ्यांनिशी पत्र्याच्या शेडमध्ये सुरु झालेल्या या शाळेचा आता मोठा वटवृक्ष झालेला आहे. आज या संस्थेच्या उत्कर्ष मंदिर या नावाने बालमंदिर ते दहावी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या दोन नामवंत शाळा मालाड पूर्व आणि मालाड पश्चिमेला असून त्यात ३७०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
संघावर पहिली बंदी लागली ती ३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या गांधीहत्येमुळे. तेव्हा आलेल्या संघबंदीत वसंतरावांना अल्पकाळ कारावास घडला. पण संघबंदी उठेपर्यंतच्या काळात त्यांनी आपल्या व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्वयंसेवकांना सत्याग्रहासाठी तयार करणे, निधी जमवणे आदी गोष्टींसाठी अहोरात्र प्रयत्न केले. व्यवसाय सुद्धा जवळजवळ थांबल्यामुळे संसारात आर्थिक ओढाताण प्रकर्शाने जाणवू लागली. परंतु त्या काळात त्यांना त्यांच्या सहधर्मचारिणीची धीरोदात्त साथ लाभल्याने त्याही आपत्तीतून ते बाहेर पडले. द्वितीय सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजींवर वसंतरावांची अपार श्रद्धा होती. संघबंदीपूर्वी त्यांनी वांद्रे ते विरार या क्षेत्राचे संघचालक म्हणून दायित्व उत्तम रीतीने सांभाळले होते. संघ प्रचारक असो वा अन्य कार्यकर्ते; वसंतरावांच्या घरी त्यांचा सतत राबता असे व अगदी आनंदाने त्यांचे स्वागत होत असे. यात त्यांच्या पत्नीचा मोठा सहभाग होता.
शेवटपर्यंत वसंतरावांची तिच जिद्द, तीच लढाऊ वृत्ती मात्र कायम होती. ते नेहमी म्हणायचे की, 'मी काम करता करताच मरेन, अंथरुणाला खितपत पडणार नाही.' १९९९ मध्ये ते एकाएकी व्हायरस न्यूमोनियाने आजारी पडले. सर्वांनी आशा सोडली होती, पण त्या दुबळ्या शरीरातदेखील जी प्रचंड जिद्द होती तिने अंथरुणात आलेल्या मृत्यूला परतवून लावले आणि खरोखरच त्यातून ते पूर्णपणे बरे झाले. मात्र शेवटी मरण अटळच असते. दि. ७ नोव्हेंबर २००१ रोजी त्यांचे निधन झाले. वसंतरावांचे संघाप्रती असलेले समर्पण सदैव स्मरणात राहील.