कै. व्यंकटराव बळवंतराव जोशी तथा नाना जोशी यांचा जन्म १९३७ सालचा. शालेय शिक्षण उदगीर येथे झाले. भाग्यनगरच्या महाविद्यालयातून बीएससी केमिस्ट्री केल्यानंतर पुढील दीड वर्ष शिरूर अनंतपाळ व उदगीर येथे शाळेत शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर धाराशिव आणि नांदेड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टेक्निशियनची नोकरी केली, साधारण पाच वर्षे. १९५९ मध्ये उषा हिंगे यांच्याशी धाराशिव येथे विवाह झाला. विवाह नंतर हैदराबादच्या नागार्जुन आयुर्वेद कॉलेजमधून आयुर्वेदाची त्यांनी पदवी घेतली.
पुढे १९६५ दरम्यान मुंबई येथे एकट्याने येऊन हाफकिन इन्स्टिट्यूट मधून डॉ. पारीख यांच्याकडे एम. एस सी. बाय रिसर्च केले. एम एस सी झाल्यावर परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियनची नोकरी तीन ते चार वर्षे केली. त्यानंतर ठाण्याला एका मल्टिनॅशनल कंपनीत केमिस्टची नोकरी चालू असताना डॉ. आपटे यांच्याशी झालेल्या परिचयानंतर पार्टनरशिप मध्ये केमिकल आणि फार्मासिटिकल कंपनीची सुरुवात केली. गोवंडी येथे 'IMMU' किमया लॅबोरेटरीजची सुरुवात आणि नवी मुंबई येथे पारस ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडची सुरूवात केली . त्यांनी शेवटपर्यंत पारस ऑरगॅनिक्समध्ये मॅनेजिंग डायरेक्टर हे पद भूषविले.
धाराशिव म्हणजे त्यावेळचे उस्मानाबाद येथे असतानाच तिथले संघ प्रचारक संभाजीराव भिडे यांच्यामुळे नाना जोशी संघाच्या संपर्कात आले. पुढे मुंबईत कुर्ला नेहरूनगर येथे स्थायिक झाल्यानंतर स्थानिक स्वयंसेवक शांताराम तथा आप्पा सुर्वे व श्री पिसाट यांच्यामुळे नियमितपणे दैनंदिन शाखेवर उपस्थित राहू लागले. संघाच्या सर्व कार्यक्रमात पुढाकार व उपस्थिती असल्यामुळे त्यांच्यावर संघाच्या कामाची जबाबदारी दिली जाऊ लागली. सुरुवातीला कार्यवाह आणि नंतर नेहरूनगर मध्ये राहत होते तोपर्यंत नगर संघचालक अशी जबाबदारी होती.
नाना हे संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित होते. नेहरूनगर मधील सदा चव्हाण, एड. दाणी व अन्य स्वयंसेवकांना बरोबर घेऊन नेहरूनगर मध्ये केदारनाथ विद्याप्रसारिणी या इंग्रजी माध्यम शाळेची व केदारनाथ लायब्ररीची स्थापना केली. शाळा आणि लायब्री दोन्हीचाही पुढे उतम विस्तार झाला. आजमितीला शाळेच्या मॅनेजिंग कमिटी मध्ये संघाच्या पुढच्या पिढीतील स्वयंसेवक आहेत. त्यांनी शाळेसाठी नवीन इमारत बांधून घेतली आहे व उत्तम रीतीने ती शाळा चालवत आहेत.
आणीबाणीत सत्याग्रह करून तुरुंगात असलेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी स्वतःच्या कंपनीत नोकरी दिली. नेहरू नगर मध्ये संघाचा पाया मजबूत होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. श्रीराम जन्मभूमी आंदोलनादरम्यान कारसेवेसाठी (बाबरी मशीद पतनाच्या वेळी) ते व त्यांचा मुलगा अयोध्येला गेले होते.
नेहरूनगर सोडून सीवूड येथील अगदी नव्या व त्यावेळी तुरळक असलेल्या वस्तीत राहायला गेल्यावर त्यांनी तिथल्या शाखेत जायला सुरुवात केली. तेथील स्वयंसेवकांना बरोबर घेऊन दुसऱ्याच वर्षी 'सीवूडचा राजा' ह्या गणेशोत्सवाची सुरूवात केली व शेवटपर्यंत गणेश मंडळाचे अध्यक्ष पद भूषविले.
धाराशिव येथे सज्जनगडाच्या समाधी मंदिर व राम मंदिराच्या सारखेच त्यांनी त्यांचे गुरु श्री अनंतदास महाराज रामदासी यांची समाधी व भव्य राम मंदिराची उभारणी केली व त्यासाठी लागणारी अर्थ उभारणी स्वतः केली. ह्या कामात धाराशिव चे एड. मिलिंद पाटील व अन्य स्वयंसेवकही त्यांच्या सोबत होते. धाराशिवच्या राम मंदिरात त्यांनी निवासी वेद पाठशाळा सुरू केली. त्याकरीता विदयार्थी यावेत यासाठी अनेक प्रयत्न केले.
२०१३ च्या ऑक्टोबर मध्ये त्यांचे गुरू श्री अनंतदास महाराज याच्या ५० व्या पुण्यतिथी निमित १३ कोटी रामनामाचा जप करण्याचे अनुष्ठान आयोजित केले होते. अनुष्ठानासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील श्री श्रीराम महाराज यांनाही तेरा दिवस पाचारण केलं होतं. १३ दिवस चाललेल्या या भव्य कार्यक्रमात आजूबाजूच्या गावातील नागरिक व शाळांच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी विशेष प्रयत्न केले.
घरातील सर्वजण संघ परिवारातील कुठल्यातरी संघटनेशी संबंधित असल्यामुळे, सहकार्य व पाठिंबा होता. पत्नी राष्ट्रसेविका समितीच्या सेविका, मुलगा डॉ. विवेक व स्नुषा डॉ. भारती दोघेही डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज मध्ये प्रोफेसर आहेत. मोठी मुलगी डॉ. ज्योती पटवर्धन निवृत्त प्राध्यापक, रामनारायण रुईया महाविदयालय. एम. एससी नंतर दोन वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विस्तारक व भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापकांपैकी एक. दुसरी मुलगी सुखदा वेलणकर राष्ट्रसेविका समितीच्या ठाणे जिल्ह्याची सह बौद्धिक प्रमुख व अरुंधती या समितीच्या हस्तलिखिताची संपादक आहे. एकंदरीतच संपूर्ण परिवार हा संघमय झाला आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कै. व्यंकटराव जोशी यांना २०१७ मध्ये देवाज्ञा झाली. संघाप्रती त्यांचे असलेले कार्य सदैव स्मरणात राहील.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक