संघशताब्दी विशेष स्मारक टपाल तिकीट आणि नाणे हवे आहे? कसे खरेदी कराल?

    03-Oct-2025   
Total Views |

मुंबई
(विशेष प्रतिनिधी) : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने स्मारक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच संघासाठी टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात आले आहे. दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित या कार्यक्रमात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे देखील उपस्थित होते. सरकारतर्फे जारी करण्यात आलेली ही स्मारक टपाल तिकिटे आणि नाणी विकत घेण्याची एक प्रक्रिया आहे, त्याद्वारेच आपल्याला ते खरेदी करता येऊ शकते.

भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावावर टपाल तिकीट किंवा नाणे जारी करण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, ज्या सरकारच्या अखत्यारीत नियंत्रित केल्या जातात. टपाल तिकीट साधारणतः टपाल विभागाकडून जारी केले जाते, तर नाणी भारत सरकारच्या अधीन असलेल्या संस्थेद्वारे जारी केली जातात. पण यासाठी एक विशेष प्रक्रिया असते.

कोणत्याही व्यक्तीच्या नावावर स्मारक टपाल तिकीट जारी करण्यासाठी सरकार किंवा टपाल विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यामध्ये त्या व्यक्तीची माहिती, त्यांचे योगदान आणि महत्व नमूद करावे लागते. तसेच त्या व्यक्तीच्या नावाने यापूर्वी तिकीट निघाले आहे का, हेही सांगणे आवश्यक असते. जर आधीच त्या नावाने तिकीट जारी झाले असेल तर पुन्हा त्याच नावाने टपाल तिकीट काढले जाणार नाही. सादर केलेल्या प्रस्तावांचे परीक्षण टपाल विभागाची पीएसी समिती करते आणि त्यानंतर निर्णय घेतला जातो की त्या व्यक्तीच्या नावाने तिकीट जारी करायचे की नाही.

टपाल तिकीट जारी करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची पात्रताही तपासली जाते. सामान्यतः कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर किमान १० वर्षांनंतरच त्या व्यक्तीच्या नावाने टपाल तिकीट जारी केले जाऊ शकते. मात्र काही विशेष बाबतीत अपवाद केला जातो, जसे की – राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा स्वातंत्र्यसैनिक. हे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर अखेरचा निर्णय संचार मंत्रालय घेतो.

स्मारक नाणे जारी करण्याचा निर्णय भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधीन असलेल्या "भारत टकसाल विभाग" घेतो. कोणत्याही व्यक्तीच्या नावाने किंवा प्रतीकेवर स्मारक नाणे जारी करण्यासाठी राज्य सरकार किंवा इतर वैधानिक संस्थांकडून वित्त मंत्रालयाला प्रस्ताव पाठवावा लागतो. स्मारक नाणी प्रामुख्याने एखाद्या ऐतिहासिक घटना, महत्त्वाच्या प्रसंगी किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ जारी केली जातात. लक्षात ठेवा की ही नाणी बाजारात व्यवहारासाठी चालत नाहीत, तर ती मुख्यतः संग्रहणीय स्वरूपाची असतात.

स्मारक नाणे कसे खरेदी करावे? आपण स्मारक नाणी SPMCIL (Security Printing and Minting Corporation of India Limited) च्या वेबसाइटवर जाऊन खरेदी करू शकता. यासाठी सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर उपलब्ध नाणी पाहून, निवडलेल्या नाण्याचे ऑनलाइन पेमेंट करून खरेदी करता येते. काही उच्च मूल्याची स्मारक नाणी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवरून देखील खरेदी करता येतात.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक