दिवस होता रामनवमीचा; दि.११ एप्रिल १९५४ रोजी दुपारी ठीक बारा वाजता, सांगलीमध्ये पेंडसेंच्या घरात पुत्ररत्नाचा जन्म झाला. नाव अर्थातच रामचंद्र ठेवले गेले. पण त्याऐवजी श्रीरामाचेच दुसरे नाव, रघुनंदन हे घरातल्यांना प्रिय असावे. त्या नावाच्या लघुरूपाने म्हणजे नंदन या नावाने त्या बाळाला सारेजण संबोधू लागले आणि त्यामुळे नंदन पेंडसे पुढे - नंदनजी पेंडसे-हेच नाव त्यांनी आयुष्यभर मिरवले. संघ वर्तुळात रूढ झाले. त्यांचे दप्तरी नाव रामचंद्र आहे, हे फक्त त्यांच्या सोसायटीतील सदनिकाधारकांच्या नामावलीच्या फलकावरून कळायचे.
कै. रघुनंदन पेंडसे यांचे मूळ गाव सांगली आणि आजोळही सांगलीचेच. दोन्ही आजोबा (आईचे वडील आणि वडिलांचे वडील) कर्तबगार होते. त्यांच्या मायेच्या धाकाखाली नंदनजींचे सुरुवातीचे बालपण गेले. त्या काळात १९४८ च्या संघबंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हळूहळू सावरत होता. सांगली जिल्ह्यातील आणि पुढे महाराष्ट्र प्रांतातील - संघकार्याला सांगलीचे श्री. का. भा. तथा काका लिमये यांचे नेतृत्व लाभले होते. त्यांच्या प्रभावाने सांगलीत संघकार्य वेगाने वाढत होते. छोटा नंदनही त्यावेळीच शाखेत जाऊ लागला.
वडिलांच्या नोकरीचे केंद्र कोल्हापूर असल्याने नंदनजींचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाले. त्या काळात शाखेच्या गटनायक या दायित्वापासून सुरुवात करून ते एकेक पायरी उत्तरोत्तर चढत गेले. १९७५ साली वयाच्या १९ व्या वर्षी कॉमर्सचे पदवीधर होऊन, ते पुण्यात उपजीविकेसाठी आले. पहिली २१ वर्षे बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेटमध्ये नोकरी. त्या काळातच कंपनी सेक्रेटरीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे बारा वर्षे फिनोलेक्स कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी आणि तिथूनच २०११ ह्या वर्षी, वयाच्या ५७व्या वर्षी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती. असा त्यांचा नोकरीचा प्रवास झाला. खाजगी नोकरीत अकाउंटस किंवा ॲडमिन विभागात काम करणे हे, भरपूर कष्टदायी आणि वेळखाऊ असते.फार सुखाची नोकरी नसते. त्यातूनही नंदनजी जे संघकार्यासाठी वेळ देतच होते.
२०११ साली , नोकरीतून मोकळे झाल्यावर नंदनजी पूर्ण वेळ संघ कार्याला देणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची काही गरज नव्हती. ते १९९९ सालापासून सिंहगड भागात आनंदनगरला राहण्यासाठी आले होते. त्यामुळे सिंहगड भागातील, एकेक जबाबदाऱ्या ते पार पाडू लागले. नगर कार्यवाह, प्रचार प्रमुख म्हणून अशा वाढत्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन पडू लागल्या. त्याशिवाय विवेक मासिकाच्या अकाउंटस विभागाची मानद जबाबदारी ते सांभाळत होतेच. हसतमुखाने हे सर्व काम ते पार पाडतच. प्रचार विभागाचे काम करायला सुरुवात केल्यावर त्यांनी सर्वप्रथम सोशल मीडिया वापरण्याचे कौशल्य तरुणाच्या उत्साहाने शिकून घेतले. 'अद्ययावत् रहा'हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेश त्यांनी मनापासून ऐकला असावा.
स्वयंसेवकांना प्रेरणा देऊन त्यांना कार्यप्रवण करण्याचे उत्कृष्ट कौशल्य नंदनजींच्याकडे होते. २०१२ मध्ये केव्हातरी, माणिकबागेतील माझ्या घरी ते एके दिवशी, सकाळी आठ वाजताच्या सुमाराला आले. माझा त्यांच्याशी त्यावेळी परिचय झाला. नमस्कार चमत्कार झाल्यावर ते म्हणाले ,"माणिकबागेतील सावरकर प्रभात शाखेचे कार्यवाह म्हणून उद्यापासून तुम्ही काम पाहायचे ." मी त्यावेळी खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होतो. त्यामुळे 'सकाळी नियमित जायला जमणार नाही. जास्त वेळ देता येणार नाही." वगैरे सबबी ( खऱ्याखुऱ्या! खोट्या नव्हेत.) मी सांगून पाहिल्या, पण त्यांनी बरोबर मला कामाला लावलेच.
पण केवळ कामापुरते भेटणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. पुण्यातल्या विठ्ठलवाडी नगरातील असंख्य कार्यकर्त्यांच्या लक्षात राहतील. ते वेळोवेळी घरी गप्पा मारायला येणारे, अडीअडचणीत मदत करणारे, मिस्कील स्वभावाचे नंदनजी म्हणून. इतर अनेक गोष्टीत त्यांना रस होता. एका संघ शिक्षा वर्गात रात्री मुक्कामाला मी त्यांच्याच खोलीत होतो. वर्गाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून, कार्यकर्त्यांशी गप्पा मारून, नंदनजी झोपेसाठी (अर्थात मध्यरात्रीच) आडवे झाले आणि मोबाईलवर जुन्या हिंदी सिनेमातील गाणी लावून, ती ऐकत झोपून गेले.
नंदनजी कुटुंबियांसह, डिसेंबर २०१६ मध्ये, कोकण सहलीला गेले होते. त्यावेळी एका फेरीबोटीत बसल्यावर, नातीला हसत हसत चॉकलेट देत असताना, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि कुणालाही काहीही कळायच्या आतच, त्यांचे निधन झाले. हसत हसत कुणाचाही निरोप घेण्याची त्यांची सवय, शेवटच्या क्षणीही सुटली नाही! नंदनजींच्या सौभाग्यवतींचे नाव वैदेही. रामाला साथ देण्याचे सीतेचे व्रत त्यांनी आजन्म पाळले. नंदनजींच्या आकस्मिक निधनानंतरही खचून न जाता, त्या आजही गीताधर्म मंडळाचे काम मोठ्या तळमळीने करत आहेत. मला वाटते, नंदनजींना हीच खरी श्रद्धांजली आहे.