महात्मा गांधी ते अरविंद नेताम; संघाशी थेट संबंध नसलेल्यांचा संघस्थानी प्रवास

    01-Oct-2025   
Total Views |

मुंबई : संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूलभूत कर्तव्य असल्याने संघ कायमच सर्वसमावेशकता, समरसता यांचा पुरस्कार करत आलेला आहे. समाजात भेदभाव उत्पन्न करणारी जातीयता, पक्षीय राजकारण, वैचारिक मतभेद या सर्व बाबींच्या पलीकडे जाऊन संघ हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. संघाशी थेट संबंध नसलेल्या किंवा अन्य विचारसरणीच्या अनेक नेत्यांनी संघस्थानाला वेळोवेळी भेटी देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत गौरवोद्गार देखील काढले आहेत.

१९३४ मध्ये झालेल्या वर्धा येथील एका शिबिराला महात्मा गांधींनी भेट दिली होती. त्यावेळी संघात विविध जाती-धर्माचे स्वयंसेवक असल्याचा प्रत्यय त्यांना आला होता. शिबिरातील कोणत्याच स्वयंसेवकाला आपल्या जातीचा अभिमान किंवा दुसऱ्या स्वयंसेवकांची जात जाणून घेण्याचे औत्सुक्य नव्हते; याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात आपण हिंदू आहोत हीच एकमेव भावना होती. दुसऱ्या दिवशी आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवार यांच्याशी भेट झाली. त्यावेळी गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम यशस्वीपणे चालविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी दि. १२ डिसेंबर १९३८ रोजी नागपूर येथे दिलेल्या संघभेटीच्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सैनिकी संचलन करून त्यांना मानवंदना दिल्याची माहिती आहे. त्यावेळी डॉ. हेडगेवारांनी आपल्या भाषणात सावरकरांचा केलेला गौरव संघ व सावरकर यांच्यातील घनिष्ठता आणि सावरकरांबद्दल संघाला असलेल्या आदराचे थोर प्रतीक म्हणावा लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दि.२ जानेवारी १९४० रोजी कराड येथे गेले होते. तेव्हा त्यांनी संघाच्या शाखेस भेट दिली व तेथे उपस्थित संघ स्वयंसेवकांसमोर भाषण सुद्धा केले. राजकीय व्यक्तींच्या व्यतिरिक्त काही मान्यवर निवृत्त सेनाधिकाऱ्यांनी देखील संघस्थानाला भेट देऊन शिस्त आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा प्रसार करण्यासाठी संघाचा गौरव केला आहे. १९५९ मध्ये मंगळुरू येथील संघ शाखेच्या एका कार्यक्रमाला स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा उपस्थित होते. त्याप्रसंगी त्यांनी स्वयंसेवकांना संबोधित करून समाजात शिस्त आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा प्रसार करण्यासाठी संघाला गौरवले.

उद्योगपती रतन टाटा, माजी राष्ट्रपती प्रणवकुमार मुखर्जी, माजी इसरो प्रमुख के. राधाकृष्णन, वरिष्ठ काँग्रेस नेते आणि सलवा जुडुमचे संस्थापक अरविंद नेताम, पद्मश्री शंकर महादेवन, इ. अशा अनेक मान्यवरांनी संघस्थानी भेट दिल्याची माहिती आहे.

एअर चीफ मार्शल (निवृत्त) अनिल टिपणीस ७ जून २००७ रोजी वार्षिक संघ शिक्षा वर्गाचा समारोप समारोहास उपस्थित राहिले. त्या प्रसंगी भाषण करताना टिपणीस म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण म्हणून भूमिका बजावणारा संघ कट्टरतावाद, सांप्रदायिक शक्तीं विरुद्ध एक मजबूत आधार म्हणून उभा राहून मोठी सेवा देऊ शकतो. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आणि मूलभूत हक्कांमध्ये प्रत्येक नागरिकाला श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. अहिंसा आणि सांप्रदायिक सौहार्द वाढवू शकणारी आणि समस्यांवर अहिंसक उपाय शोधण्यास मदत करणारी संघटना म्हणून संघाची भूमिका महत्वपूर्ण आहे.”

१७ ऑक्टोबर २०१० रोजी रेशीमबाग, नागपूर येथे झालेल्या विजयादशमी उत्सवास ख्यातनाम संगीतकार आणि गायक पं.हृदयनाथ मंगेशकर उपस्थित राहिले होते. तेव्हा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) वैज्ञानिक आणि नीती आयोगाचे सदस्य वीरेंद्रकुमार सारस्वत २०१५ रोजी झालेल्या विजयादशमी उत्सवात सहभागी झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील प्रमुख राष्ट्रवादी संस्था अशा शब्दात गौरवले. ते म्हणाले, “आज, आपला देश विविध अडचणींवर विजय मिळवून विकसनशील देशातून विकसित राष्ट्रामध्ये स्वतःचे रूपांतर करत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी आणि भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. पण, या लढाईसाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांचे विश्लेषण किंवा नियोजन सुरू करण्यापूर्वी, आपल्या देशाची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेणे महत्वाचे आहे.”


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक