मुंबई : मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील अजरामर नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बर्डे आज जगात नसले तरी देखील त्यांचे चित्रपट, विनोद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांपैकी गाजलेला एक चित्रपट म्हणजे ‘मैने प्यार किया’. सलमान खान, भाग्यश्री, रिमा लागू, आलोक नाथ अशा अनेक कलाकारांसोबत लक्ष्मीकांत बेर्डे झळकले होते. त्यातील सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी विशेष गाजली होती. पण तुम्हाला माहित आहे का सलमान खान लक्ष्मीकांत बेर्डेंना जरा घाबरुन होता.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्वत: एका मुलाखतीत मैने प्यार किया या चित्रपटाचा एक किस्सा सांगितला होता. ज्यावेळी मैने प्यार किया चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यावेळी नुकतीच हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खानने अभिनयाची सुरुवात केली होती. पण लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे आणि नावाजलेले नाव होते. सलमान खानला त्यावेळी लक्ष्मीकांत यांची ख्याती माहित असल्याने तो थोडा घाबरुनच असायचा. या संदर्भातला किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
या व्हिडिओमध्ये हिंदी नायक नायिकांसोबत काम करताना तुम्हाला काही वेगळे अनुभव येतात का? असा प्रश्न एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आला होता. त्यावर लक्ष्मीकांत म्हणाले होते की, ‘’माझ्या नशीबाने मी मराठीतला नायक असल्यामुळे तसंच मराठीत मला चागलं नाव असल्यामुळे ती लोकं थोडी मला घाबरुन होती.’’
पुढे ते म्हणाले की, ‘’सलमान खानला कोणीतरी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डेपासून जरा सावध राहा. तो कधीही आयत्यावेळेला अडिशन करतो वगैरे... त्यामुळे सुरुवातीला तो माझ्याशी बोलायचाच नाही. चांगला पोरगा आहे तो अजूनही दोस्ती आहे आमची. तर तेव्हा तो माझ्याशी बोलायचा नाही माझ्याशी म्हणून मी एकदा त्याला विचारलेलं की तू माझ्याशी असं का करतोयस. जो पर्यंत आपलं ट्युनिंग चांगलं होणार नाही तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाही आणि ’भाग्यश्री त्याच्यासोबत या चित्रपटात नायिका होती. ती महाराष्ट्रीयनच असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच ती माझी फॅनच असल्यामुळे आमचं ट्युनिंग छान जुळून आलेलं. पण सलमान आणि माझं ट्युनिंग जुळायला थोडा वेळ लागला. मग हळूहळू ते फुलत गेलं”.
पुढे ते म्हणाले की, ”पुढे एका सीनमध्ये आमच्या दोघांचा शॉट होता. तेव्हा मी स्वत:हून दिग्दर्शकाला सांगितलेलं की मला सीनमध्ये थोडं अव्हॉइड करा नाहीतर लोकं माझ्याकडेच पाहात राहतील. तेव्हा सलमान म्हणालेला असं नको करायला... मग मी त्याला सांगितलेलं की आम्ही मराठीत असंच काम करतो. आम्ही सगळे एकत्र राहतो. त्यामुळे आमचं काम छान होतं.”
राजश्रीची निर्मिती असलेला आणि सुरज बडजात्या यांचे दिग्दर्शन असलेला ‘मैने प्यार किया’ या चित्रपट १९८९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान, भाग्यश्री, रिमा लागू, मोनिश बेहेल, आलोक नाथ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप जोशी यांच्यासह अनेक कलाकार होते. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने त्यावेळी ५० कोटींची कमाई केली होती.