मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत गुणात्मक बदल होईल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
27-Jan-2025
Total Views |
मुंबई : मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्यात गुणात्मक बदल पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोमवार, २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नवीन भारतीय साक्ष कायद्याने साक्ष जमा करणे, त्यासंदर्भात योग्य व्यवस्था करणे, ते साठवणे याबाबत काही नवीन नियम सुरु केले आहेत. त्या नियमाच्या अंतर्गत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असेल. यामध्ये फॉरेन्सिक तज्ञांचा दर्जा प्राप्त असलेले एक वैज्ञानिक विश्लेषक आणि एक रासायनिक विश्लेषक उपस्थित असतील. पहिल्यांदा ते गुन्हेगाराचे ठिकाण ताब्यात घेऊन तिथले पुरावे जमा करतील. रक्ताचा नमुना, अंमली पदार्थाचा नमुना, एखाद्या स्फोटाचा नमुना यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्यांची जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "एखाद्या प्रकरणात योग्य पुरावे नसल्याने गुन्हेगार सुटताना आपल्याला दिसतात. पण यामध्ये असे काहीही होणार नाही. या कीटच्या माध्यमातून त्यांना प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष काढता येईल. तसेच यातून जमा झालेले पुरावे साठवून ठेवण्यासाठी एक ब्लॉक चेन पद्धत तयार केली आहे. या पद्धतीमुळे पुराव्यामध्ये छेडछाड करता येणार नाही आणि आपल्याकडे अतिशय सबळ पुरावा राहिल. या व्हॅनमध्ये सीसीटीव्ही आणि फ्रीजसुद्धा आहे. त्यामुळे गुन्हे उघडकीस येणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे या दोन्ही गोष्टींमध्ये एक गुणात्मक बदल पाहायला मिळेल. आम्ही जवळपास २५६ व्हॅन तयार करणार आहोत. सगळ्या भागांमध्ये या व्हॅन उपलब्ध होतील आणि यामुळे तपासात महत्वाचा फायदा होणार आहे," असेही त्यांनी सांगितले.