लेखिका, अनुवादक, निवेदिका, मुलाखतकार आणि व्याख्याता अशा साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रात मनस्वी मुशाफिरी करणार्या पुण्याच्या स्वाती महाळंक यांच्याविषयी...
माजात खूप व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, जी समाजातील कोणत्या ना कोणत्या घटकांसाठी उपयुक्त आणि प्रेरक असतात. आपले कार्य समर्पित भावनेने करण्याच्या कृतीमुळे ते सर्वांचे प्रिय असतात. त्यांच्या सद्गुणांचा इतरांनी अभ्यास करणे किंवा अनुकरण करणे म्हणजे, एका चांगल्या समाजभरणीचा तो पाया म्हणता येईल. आपल्या प्रांतात चांगल्या समाजासाठी उपयुक्त असणार्या अशा व्यक्तींची खूप गरज आहे. यामुळे दुर्गुण शक्तींच्या प्रभावाखाली समाज येणार नाही. त्यांच्या सद्गुणांचा उपयोग भावी पिढीला अशा दुर्गुणी व्यक्तींपासून वाचविण्यासाठी होऊ शकतो.
स्वाती महाळंक हे असेच एक आनंददायी नाव. सदैव हसतमुख असणार्या स्वाती यांची पुण्यनगरी, विद्यानगरी आणि सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे महानगरातील वाटचाल एखाद्या आनंद वाटत फिरणार्या देवदूतासारखीच आहे.
आपल्यातील गुणांचा विकास करताना, त्यांनी इतरांसाठी काय चांगले करता येईल, हे ध्येय समोर ठेवूनच वाटचाल सुरु केली. पुण्यातील ‘जन प्रबोधिनी’, गरवारे महाविद्यालय, स. प. महाविद्यालय, तसेच विद्यापीठात शिक्षणाचा प्रवास केला आणि मग आपल्यातील कलागुणांचा विकास करताना त्यांनी मागे वळून बघितले नाही. स्वाती महाळंक यांनी महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारितेला प्रारंभ केला. गेली सुमारे 30 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना मुद्रित माध्यमे, ऑडिओ, व्हिज्युअल आणि वेब अशा चारही माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचे लेखनही विपुल. त्यांचे आतापर्यंत 500हून अधिक लेख वृत्तपत्रे, विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
सध्या त्या आकाशवाणी, पुणे आणि दूरदर्शनवर कार्यरत आहेत. त्यांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे विभागाच्या कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून, त्या ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या अभ्यास मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणूनदेखील नियुक्त झाल्या आहेत. त्यांची ‘किशोर’ या लोकप्रिय मासिकाच्या सल्लागारपदी राज्य शासनाकडून नियुक्ती केली गेली. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थीवर्गासाठी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.
याशिवाय राज्य शासनाच्या 2018 सालामधील 13 कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या ‘वनसत्याग्रह’ या पुस्तिकेचे लेखन आणि संपादन त्यांनी केले आहे.त्यांच्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ पुणे’ या इंग्लिश आणि जपानी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे टोकियो येथे प्रकाशन करण्यात आले.
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे देशातील आणि मराठीतील पहिले चरित्र ‘प्रतिभापर्व’चे देखील त्यांनी लेखन केले. विशेष म्हणजे, त्यांची आतापर्यंत एकंदर आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘कहाणी बचतगटांची’ या विषयावरील मराठीतील पहिले संशोधनात्मक पुस्तक स्वाती यांनीच लिहिले. ‘निस्वार्थी जननेता’ हे अण्णा हजारे यांचे मुलांसाठी अल्पचरित्रदेखील त्यांनी लिहिले.
लेखन सुरु असतानाच आपल्यातील अन्य गुण आणि कौशल्याचा उपयोग व्हावा, लेखन आणि आवाज याचा निवेदन शैलीसाठी उपयोग व्हावा, म्हणून त्यांनी आवाजाच्या उपयोगाचा प्रांत निवडला. ‘रेडिओ जॉकी व्हायचंय’ या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक (अनुवादित) त्यांनी सर्वांसाठी आणले.
लेखिका, पत्रकार त्याचप्रमाणे, उत्तम निवेदक, अनुवादक, वक्त्या, व्याख्यात्या, मुलाखतकार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश आपसूकच पोहोचत असतो, हे नाकारता येणार नाही.
समाजात वावरताना त्यांना अनेक अनुभव आले. त्याचे निरीक्षण आणि अवलोकन हे त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित होत असते. त्यांच्यातील निवेदन शैलीचा उपयोग करुन घेताना त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी विशेष निमंत्रण मिळाले आणि त्यांनी या संधीचे सोने केले. एवढेच नाही, तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल, विविध केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवरांच्या अनुवादक दुभाषी म्हणून काम करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली.
शिवाय ‘संत साहित्य’, ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ या विषयांवरदेखील त्यांचा गाढा अभ्यास आहे. ‘संतांचे योगदान’, ‘संत साहित्याची आजच्या काळातील संयुक्तिकता आणि महत्त्व’ इत्यादी विषयांवर त्यांनी आळंदीमधील मुक्ताई-जनाई व्याख्यानमाला तसेच, खेड -राजगुरुनगर, मंगळवेढा, सांगली या राज्याच्या विविध भागात व्याख्यानेदेखील दिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, महिलांच्या चळवळी, परिवर्तनवादी चळवळी, महिलांचे प्रश्न, पाणीप्रश्न, इतर सामाजिक प्रश्न आदी विषयांवर अभ्यास करुन त्यांनी राज्यभरात 500हून अधिक व्याख्याने दिली आहेत. गेली सुमारे 20 वर्षे प्रशिक्षण क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. यातून नव्या पिढीला संवाद कौशल्य, भाषणकला, स्वरसंस्कार, कार्यसंस्कृती इत्यादी 15 विषयांवर त्या प्रशिक्षण देत असतात. ‘यशदा’, ‘रामेति’, पुणे विद्यापीठाचा प्रौढ शिक्षण विभाग आदी संस्थांमध्ये ‘रिसोर्स पर्सन’, व्याख्यात्या म्हणून कार्यरत आहेत.
अनेक जाहिराती तसेच माहितीपटांसाठी त्यांनी निवेदन केले आहे. विविध क्षेत्रांतील सुमारे 300हून अधिक मान्यवरांच्या प्रकट तसेच छापील, रेडिओ, दूरचित्रवाणी या माध्यमांसाठी मुलाखती घेण्याची संधी त्यांना मिळाली. संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, चित्रपट इत्यादी ललित कलांमध्ये त्यांना विशेष गोडी. या विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रम, रसास्वाद कार्यशाळा आणि विविध परिषदांमध्ये वक्ते म्हणून त्यांचा सहभाग असतो. तसेच, स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली. राज्यातील प्रतिष्ठेच्या ‘पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’ (ऑगस्ट 2022), ‘राज्य परिवहन महामंडळा’च्या ‘आंतरविभागीय नाट्यस्पर्धा’ (डिसेंबर 2022), ‘लक्ष्मीबाई रानडे राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा’ (फेब्रुवारी 2022), ‘न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा’ इत्यादी स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून त्यांनी कार्य केले.
नुकतेच त्यांची अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘महात्मा बसवेश्वर अध्यासना’वर तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी ‘पीएच.डी’चा प्रबंध सादर केला आहे. अशा या साहित्य, संस्कृती सजविणार्या स्वाती महाळंक यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
अतुल तांदळीकर