मुंबईकरांनी मोठ्या संख्येने म्हसा यात्रेला भेट द्यावी : आमदार किसन कथोरे

    11-Jan-2025   
Total Views |
MLA Kisan Kathore

मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावातील अतिप्राचीन म्हसोबा यात्रेला यंदा सोमवार, दि. १३ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. संपूर्ण राज्यात पशुधनाच्या विक्रीसाठी सुप्रसिद्ध असणार्‍या या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमधून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे दरवर्षी या यात्रेचे पालकत्व स्वीकारून यात्रेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी फार मेहनत घेतात. त्यानिमित्ताने म्हसोबा यात्रेबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने आमदार किसन कथोरे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी मुंबईकरांनी या यात्रेस आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले.

मुरबाडच्या म्हसा यात्रेला वर्षानुवर्षांची परंपरा लाभली आहे. तेव्हा, या यात्रेच्या परंपरेविषयी काय सांगाल?

मुरबाड शहरापासून दहा किमी अंतरावर कर्जत रस्त्यावर म्हसा हे गाव आहे. या गावात म्हसोबा देवाचे प्राचीन मंदिर आहे. या देवस्थानावरूनच या गावास ‘म्हसा’ हे नाव प्राप्त झाले. गेली अनेक वर्षे पौष पौर्णिमेला येथे म्हसोबा मंदिराच्या परिसरात भव्य-दिव्य अशी यात्रा भरते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ही यात्रा नावारुपास आली आहे. या यात्रेत फार मोठ्या प्रमाणात पशुधनाची विक्री होते, तसेच कुटुंबात लागणार्‍या सर्व चीजवस्तू येथेच खरेदी केल्या जातात. राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथूनही हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. नवविवाहित जोडपी त्यांनी केलेले नवस फेडण्यासाठी येथे श्रद्धेने येतात. यामुळे ‘नवसाला पावणारा म्हसोबा’ अशी या यात्रेची विशेष ओळख आहे.

आपण सांगितले तसे, विविध प्रकारच्या पशुधनाची विक्री हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे. त्याबद्दल काय सांगाल?

आपल्याला कधीही पाहायला न मिळालेल्या खिल्लारी बैलजोड्या म्हसा यात्रेत पाहायला मिळतात. बैलगाडी, शेतीची कामे आणि हौसमौजेसाठी बैल घेणार्‍यांची मोठी गर्दी येथे दरवर्षीच होते. शेतकरीवर्गदेखील शेतीसाठी लागणारे बैल येथून खरेदी करतात. लाखो रुपयांची बोली लागते आणि ढोल-ताशांच्या गजरात, अगदी गुलालाची उधळण करत खरेदीदार आपल्या आवडीची जनावरे घेऊन जातात. ही यात्रा दोन आठवडे चालते. पण, त्यानंतरही इतर बाजार येथे चालू असतो. घरगुती खरेदीसाठी ग्रामीण भागातील महिला याठिकाणी येतात. या यात्रेतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्यांचा फायदा मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागाला होतो.
म्हसा यात्रेदरम्यान भाविकांसाठी प्रशासनातर्फे कोणकोणत्या सुविधा पुरविल्या जातात?

या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचे मोठे आव्हान असते. स्थानिक नळयोजना, गावाच्या परिसरात विविध ठिकाणी बोअरवेलच्या माध्यमातून हातपंपाद्वारे आणि स्थानिक विहिरींच्या माध्यमातून कोणालाही पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाते. आरोग्याची कोणतीही समस्या आल्यास तत्काळ दवाखाने, रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालय अशी चोख व्यवस्था केली जाते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त, गस्तपथके आदी व्यवस्था उत्तमपणे आपले काम बजावते. बाहेरगावाहून विक्रीस येणार्‍या जनावरांचे लसीकरण केले जाते, जेणेकरून त्यामार्फत होणार्‍या रोगराईस प्रतिबंध केला जातो. ‘एमएसईबी’कडून वीजपुरवठ्याचेही एक मोठे आव्हान असते. पण, सगळीकडे विद्युत पुरवठा होईल, याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. या काळात दारुबंदीवर भर दिला जातो. महिलांना त्रास होऊ नये, याकडे विशेष लक्ष दिले जाते.

स्थानिक आमदार या नात्याने यात्रेच्या आयोजनात आपण कोणते खास प्रयत्न करता?

सध्या येथील जिल्हा प्रशासनावर प्रशासक असल्यामुळे आमदार या नात्याने यात्रेच्या आयोजनाची जबाबदारी मी स्वतः घेत असतो. ग्रामस्थ मंडळींबरोबर नेटक्या आयोजनासाठी बैठका घेणे, सर्व प्रशासकीय व्यवस्थांचा आढावा घेणे, संबंधित विभागांना सूचना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेण्यावर माझे अधिक लक्ष असते. यात्रेच्या काळात येथे नियमित भेट देणे तसेच दररोज सर्व कामकाजाचा आढावा घेणे, अशी महत्त्वाची जबाबदारी आम्ही पार पाडत असतो.

सध्या दि. ७ ते दि. १४ जानेवारी या कालावधीत सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाबाबत काय सांगाल?

‘अंबरनाथ तालुका आध्यात्मिक उत्सव समिती’च्या माध्यमातून आम्ही दरवर्षी ‘राष्ट्रीय कीर्तन महोत्सवा’चे आयोजन करतो. यंदाचे २२वे वर्ष आहे. बदलापूर पूर्वेच्या गांधी चौक येथील मराठी शाळेच्या खुल्या सभागृहात हा महोत्सव सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील नामवंत असे कीर्तनकार आपले कीर्तन यावेळी सादर करतात. शहरी भागातदेखील कीर्तनाची आवड असणार्‍या प्रेक्षकांची मोठी गर्दी या कीर्तन महोत्सवात पाहायला मिळते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चांगले विचार समाजात रूजावेत आणि तरुण पिढीवर चांगले संस्कार करण्याचे काम या कीर्तन महोत्सवातून होत असते.

राज्यांतील पर्यटकांनी म्हसा यात्रेस भेट द्यावी, यासाठी आपण भाविकांना काय आवाहन कराल?

म्हसा यात्रा ही केवळ ठाणे जिल्हाच नव्हे, तर आपल्या राज्यातील एक मोठी यात्रा आहे. येथील गुरांचा बाजार, येथे मिळणारी मिठाई, येथे भरणारा शेती अवजारांचा बाजार, शेकडो एकर जागेवर लागणारी विविध वस्तूंची दुकाने, नवसाला पावणार्‍या खंडोबाचे दर्शन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून भाविकांनी आवर्जून यावे, ही विनंती. या यात्रेत ‘हातोली’ नावाची मिठाई मिळते. ती फक्त म्हसा यात्रेतच मिळते. आता ही मिठाई बनविण्यास सुरुवात झाली आहे. या मिठाईची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकदेखील मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेत सहभागी झाल्याच एक वेगळा आनंद असतो. मुंबईकरांनी या आगळ्यावेगळ्या संस्कृतीची अनुभूती घेण्यास जरुर यावे, असे आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकापर्यंत लोकलने येऊन कल्याण ‘एसटी’ आगारातून थेट म्हसा येथे येण्यासाठी विशेष बसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.