मुंबई : शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या संघटनेत उभी फूट पडली आहे. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.
नव्या संघटनेची घोषणा करताना कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले, शिवसंग्राम संघटना २००१ मध्ये स्थापन झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो कार्यकर्ते तयार झाले. विनायक मेटे यांच्या निधनानंतर ही संघटना बांधून ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, अलीकडे मेटे कुटुंबीयांनीच शिवसंग्राम संघटना वाटून घेतल्याने सोबतच्या कार्यकर्त्यांसाठी ‘स्वराज्य संग्राम’ संघटनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. अजित बानुगडे, अनंत देशमुख, विक्रांत आम्रे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन पंढरपूरला दि. १५ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येतील. त्यात संघटनेची पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे तानाजी शिंदे यांनी सांगितले.