मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dattatray Hosbale RSS) "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ एक संघटना नसून भारताच्या उत्थानाची मोहीम आहे. ही राष्ट्रीय जीवनातील एक महत्त्वाची चळवळ आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी केले. नुकत्याच जैसलमेर येथे झालेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी नगर एकत्रिकरणात स्वयंसेवकांना संबोधित केले.
हे वाचलंत का? : कृष्णनगरी मथुरेत मिशनरी रॅकेटचा पर्दाफाश!
'हिंदू राष्ट्र' या संकल्पनेवर बोलताना ते म्हणाले की, हिंदू हा केवळ धर्म नसून जीवनपद्धती आहे. या संघटित विचाराने स्वामी विवेकानंदांनी धर्माचा प्रचार केला. अशा महापुरुषांच्या प्रेरणेने संघाने देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये हिंदू संघटीत होऊ शकतात, असा आत्मविश्वास निर्माण केला. हिंदुत्वाबाबत सुरुवातीला लोक म्हणायचे की ते जातीयवादी आणि संकुचित विचारसरणीचे आहे. पण संघाने हिंदू हा संप्रदाय नसून जीवनाचे तत्वज्ञान असल्याचे स्पष्ट केले. मानवतेच्या उद्धारासाठी देशातील ऋषी-मुनींनी परिश्रम घेतले.
पुढे ते म्हणाले, १९२५ मध्ये नागपुरातील एका छोट्या ठिकाणाहून सुरू झालेले संघाचे कार्य देशातील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे. ते देशातील प्रत्येक विभाग आणि शहरापर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, जे फार दूर नाही. सुरुवातीच्या काळात सामान्य लोक संघाची खिल्ली उडवत असत, पण स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाने निर्माण झालेली ही संघटना जगातील सर्वात मोठी सामाजिक संघटना म्हणून ओळख मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.