शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८.३० लाख कोटींची वाढ
23-Sep-2024
Total Views |
मुंबई : आज शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ८.३० लाख कोटींची वाढ झाली आहे. वाढता विदेशी निधी प्रवाह आणि आशियाई बाजारातील मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. एकंदरीत, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला असून व्यवहाराच्या सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा कल कायम ठेवला आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजाराकडे पाहता बीएसई निर्देशांक सेन्सेक्सने ३८४.३० अंकांनी उसळी घेत ८४,९२८.६१ अंकांच्या उच्चांकवर बंद झाला. तर सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीनेही १४८ अंकांची वाढ नोंदविली असून नवा उच्चांक गाठतानाच निफ्टी २६ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. आजच्या सलग तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स निर्देशांक ३८४.३० अंकांनी तर निफ्टी १४८.१० अंकांनी वधारला आहे.
बीएसई सेन्सेक्समधील टॉप ३० कंपन्यांच्या समभागांपैकी १९ समभागांनी चांगली वाढ नोंदविली. यात एम&एम, एसबीआय, भारती एअरटेल, कोटक बँक आणि एचयुएल या कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. तर दुसरीकडे एनएसई निफ्टी ५० इंडेक्समध्ये बजाज-ऑटो, एम&एम, ओएनजीसी, हीरोमोटोको, एसबीआयलाईफ या कंपन्यांच्या समभागांनी मोठी वाढ केली असून विप्रो, आयसीआयसीआय बँक, डिव्हिसलॅब यांसारख्या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली आहे.