मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जुलै महिन्यात सुरु झाला होता. या पर्वात अनेक नव्या गोष्टी घडल्या त्यातली पहिली महत्वाची बाब म्हणजे यंदा महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख यांनी शोचं सुत्रसंचालन केलं. आणि आता आणखी एक आजवर कधीही न घडलेला निर्णय बिग बॉसच्या इतिहासात घेण्यात आला आहे. नुकतीच घरात पत्रकार परिषद झाली होती आणि त्यावरुन यंदा सीझन १०० नाही तर ७० दिवसांचा असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
बिग बॉसची पहिली चारही पर्व १०० दिवसांचे होते. पण आता पाचवा सीझन केवळ ७० दिवसातच गाशा गुंडाळत असणार हे पक्क झालं आहे. चॅनलकडून हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला असून चॅनलच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना माहिती दिली आहे. "होय. बिग बॉस ७० दिवसातच निरोप घेणार आहे. हा अचानक घेतलेला निर्णय आहे. याची कल्पना कोणालाच नव्हती. स्पर्धकांनाही आजच्या एपिसोडमध्ये ही माहिती देण्यात येणार आहे. तसंच शो इतक्या लवकर आटोपता घेण्याचं कारण लवकरच जाहीर करण्यात येईल."
दरम्यान, बिग बॉसमध्ये २२ सप्टेंबरच्या भागात अरबाज पटेल घराबाहेर पडला. सध्या घरात वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक घरात राहिले आहेत. यांच्यातील कोण ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.