फाटाफूटीच्या भितीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार चिडीचूप!
29-Aug-2024
Total Views |
ठाणे : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता निवडणूकीसाठी आपण इच्छुक असल्याचे खुलेपणाने सांगत आहेत. मात्र याला शरद पवार गट अपवाद आहे. शरद पवार गटातही अनेकजण पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट मिळावे यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्याबाबत त्यांच्याकडून खुलेपणाने कोणतेच वक्तव्य केले जात नाही. एकूणच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील मौन बाळगले आहे. इच्छुकांची नावे बाहेर आली तर फाटाफूट होईल या भितीमुळे मौन बाळगल्याची चर्चा आहे.
निवडणूक जवळ आली की, सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या फाटाफूटीचे राजकरण चांगलेच रंगत असते. कल्याण डोंबिवलीत शरद पवार गटाची फारशी ताकद नाही. बहुजन समाज पार्टी (बसपा) पक्षामधून कल्पना किरतकर यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीत उमेदवारी मिळावी अशी किरतकर यांची इच्छा आहे. याशिवाय पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी वंडार पाटील, त्यांचा मुलगा सुधीर पाटील, राजू शिंदे असे अनेक पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज भरून देण्याच्या सूचना केल्या आहेत. या इच्छुक उमेदवारांनी अद्याप उमेदवारीसाठी आपण इच्छुक आहोत याबाबत कुठे ही वाच्यता केली नाही.
किरतकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत येणार होते. मात्र जितेंद्र आव्हाडांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते डोंबिवलीकडे फारसे लक्ष देत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. कल्याण डोंबिवलीत फारशी ताकद नसलेल्या शरद पवार गटाला मोठ्या तयारीने निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची गरज आहे. मात्र, ज्येष्ठ नेते लक्ष देत नसल्याने कार्यकर्त्यांमधील नाराजीचा फटका निवडणूकीत शरद पवार गटाला त्याअनुषंगाने महाविकास आघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे.