मुंबई : ज्यांनी ठाकरे ब्रँड म्हणून बोलबोला केला त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुव्वा उडाला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, अशी टीका विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणूकीत श्रमिक उत्कर्ष सभा पॅनेलचा विजय आणि ठाकरे बंधूंच्या दारूण पराभवावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
बुधवार, २० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत बोलताना आ. प्रसाद लाड म्हणाले की, "बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीत मी महायूती म्हणून नाही तर, श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित ही निवडणूक लढलो. यात ७ जागा जिंकल्या असून चार जागांवर पुर्नमतमोजणी सुरु आहे. पण ज्यांनी ठाकरे ब्रँड म्हणून बोलबोला केला त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुव्वा उडाला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला गेला. ठाकरे ब्रँडला शून्य जागा मिळाल्या याचा मला जास्त आनंद आहे. त्यांना सहकार कसा चालतो ते माहिती नाही. २५ वर्षांपूर्वी एखादी संस्था हातात आल्यावर तिला ओरबाडून काढण्याचे त्यांनी काम केले. त्यामुळे मुंबईतील कामगारांनी आणि मराठी माणसाने त्यांना त्यांची जागा दाखवली." लिटमस टेस्ट मध्ये आम्हीच जिंकलो
"संजय राऊत या विजयावर काहीही बोलले नाहीत. त्यांना उद्धवजींनी एक स्टँडर्ड लाइन लिहून दिली असून त्यावर त्यांचा बोलबोला असतो. शशांक राव आणि प्रसाद लाड हे दोघेही ठाकरे ब्रँडच्या विरोधात लढले. मुंबईतील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आरोप करणे सोपे असते पण सहकारामध्ये संस्था चालवणे कठीण असते. संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांनी एखादी संस्था चालवून दाखवावी. पण त्यांना फक्त आरोप करता येतात. या लिटमस टेस्ट मध्ये आम्ही जिंकलो आहोत. हा सहकाराचा विजय आहे," असेही ते म्हणाले.
उबाठा गटाने हार स्विकारावी
"या निवडणूकीत २ हजार १५८ मते अवैध झालीत. ही मते अवैध न होता माझ्या पॅनेलला १०० मते मिळाली असती तर ७ चा आकडा १७ झाला असता. यामध्ये जवळपास १७०० मते माझ्या पॅनेलची अवैध झालीत. ठाकरे ब्रँडला एवढी मतेदेखील मिळाली नाहीत. त्यामुळे पहिल्या क्रमांकावर शशांक राव, दुसऱ्या क्रमांकावर श्रमिक उत्कर्ष सभा, तिसऱ्या क्रमांकावर अवैध मतपत्रिका राहिल्या, आणि ठाकरे ब्रँड चौथ्या क्रमांकावर ठाकरे ब्रँड ढकलला गेला आहे. त्यामुळे आतातरी ठाकरे ब्रँडने विचार करायला हवा. उबाठा गटाने हार स्विकारावी आणि सुहास सामंत यांचा राजीनामा घ्यावा. मी काल रात्री अवैध मतपत्रिकेबाबत पत्र दिलेले आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल. उद्या सकाळपर्यंत मतपत्रिकेची पुन्हा मोजणी चालू होईल," असेही त्यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....