लाभार्थ्यांच्या थकीत कर्जप्रश्नी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुंबई लिडकॉम कार्यालयात धरणे आंदोलन

    20-Aug-2025
Total Views |

मुंबई , प्रसंत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत मंजुरी पत्र देऊनही दीड-दोन वर्षांपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा न झाल्याने राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दि.१८ रोजी मुंबईतील महामंडळाच्या मुख्य कार्यालयात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्यानमंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच विदर्भ प्रमुख संभा वाघमारे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विप्लव लांडगे, अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामटे, नांदेड (योग) जिल्हाध्यक्ष रवी गंगासागरे, अकोला जिल्हाध्यक्ष यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने लाभार्थी सकाळी अकरा वाजता कार्यालयात जमले. दोन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होऊनही सहभाग रक्कम भरल्यानंतर निधी न मिळाल्यामुळे हे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

लाभार्थ्यांनी स्पष्ट केले की, सतत पाठपुरावा करूनही कोणतेही कर्ज प्रकरण निकाली निघत नाही. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाले असून व्याजाने पैसे उचलून सहभाग रक्कम भरलेल्या अनेक कुटुंबांचे हाल होत आहेत. शासन व महामंडळ प्रशासनाने तातडीने लक्ष घालून निर्णय द्यावा, अशी मागणी या वेळी जोरदार करण्यात आली.

हे धरणे आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू होऊन रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहिले. आंदोलनादरम्यान व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांना महासंघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनामुळे लाभार्थ्यांच्या प्रलंबित कर्जप्रश्नी शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागेल, अशी भावना उपस्थित आंदोलकांनी आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.