भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा आनंद तर सगळेच साजारा करतात, अवघा देश भगवतांच्या प्राकट्य उत्सवाच्या आनंदात रममाण होतो तो दिवस म्हणजे जन्माष्टमी होय! भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचे साक्षीदार असलेल्या व्रजात तर याचा आनंद काय वर्णावा. व्रजभूमीत साजर्या होणार्या श्रीकृष्णजन्म उत्सवाचा घेतलेला हा आढावा...
‘जयति तेडधिकं जन्मना व्रजः ।
श्रयत इन्दिरा शश्वद् अत्र हि ॥’
(श्रीमद्भागवत महापुराण १०३१.१)
वरील श्लोक हा ‘श्रीमद्भागवत महापुराणा’तील दशम स्कंधात समाविष्ट असलेल्या, गोपीगीतातील प्रथम श्लोक आहे. या गीतात गोपी भगवान श्रीकृष्ण यांची स्तुती करताना म्हणतात की, भगवंताच्या जन्मामुळे व्रजाची महती अधिक वृद्धिंगत झाली आहे, आणि इंदिरा म्हणजेच लक्ष्मी या कारणामुळे इथे सदैव वास करणार आहे. मथुरेत, देवकी आणि वसुदेव या दम्पतीच्या अष्टम पुत्राच्या रूपात, श्रावण कृष्ण अष्टमीला भगवंताचे प्राकट्य झाले, हे सर्वश्रुत आहेच. वसुदेवांनी भगवंताला आपला मित्र नंद यांच्या घरी सुखरूप नेले आणि नंद व यशोदा यांच्या नवजात कन्येला मथुरेला आणले. ‘हरिवंश’ या ग्रंथाप्रमाणे भगवंतांचे प्राकट्य वसुदेवांच्या घरीच झाले, तर ‘श्रीमद्भागवत महापुराण’ आणि इतर पौराणिक ग्रंथांप्रमाणे श्रीकृष्णांचे प्राकट्य कंसाच्या कारागृहात झाले.
मथुरेमध्ये भगवंतांचे प्राकट्यस्थान हे ’श्रीकृष्ण जन्मस्थान ’ किंवा ’कटरा केशवदेव’ या नावाने ओळखले जाते. श्रीकृष्ण जन्मस्थानाच्या ठिकाणी दोन हजार वर्षांपूर्वी ’वासुदेव महास्थान’ नावाचे मंदिर होते, ज्याला वसू नावाच्या एका कृष्णभक्ताने दान दिले होते. पुढे इ.स. चौथ्या शतकात गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य याने, याच स्थानावर भगवान केशवदेव यांचे एक मंदिर उभारले. पुढे या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झाला, पण दुर्दैवाने या मंदिराची तीनदा नासधूसदेखील झाली. परंतु, हे मंदिर परत बांधलेदेखील गेले. इ.स. अकराव्या शतकात मेहमूद गजनीने, इ.स. सोळाव्या शतकात सिकंदर लोदीने, तर इ.स. सतराव्या शतकात औरंगजेबाने हे मंदिर पाडले. औरंगजेबाने केशवदेव मंदिराच्या जागी एक मशीद बांधली; जी आजही अस्तित्वात आहे. इथे सध्या एक आधुनिक पण छोटे केशवदेव मंदिर आहे, तसेच एक अत्यंत विशाल असे भागवतभवन मंदिरदेखील आहे. भागवतभवन मंदिर हे स्वातंत्र्यानंतर बांधले गेले. या मंदिराच्या गर्भगृहात राधा आणि कृष्ण यांचे विग्रह आहेत. श्रीकृष्णजन्मस्थानाच्या आवारात श्रीकृष्णांचे प्राकट्य ज्या ठिकाणी झाल्याचे मानले जाते, त्या स्थानालाही भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. इथे बाळकृष्णांचे एक अत्यंत सुंदर चित्र ठेवले आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान हे एक महत्त्वाचे पुरातात्त्विक स्थळदेखील आहे, आणि इथे अनेक प्राचीन वास्तूंंचे अवशेष सापडले आहेत. मथुरेचे माहात्म्य सांगणार्या अनेक ग्रंथांमध्ये केशवदेवांचा उल्लेख सापडतो, आणि या स्थानाला चैतन्य महाप्रभूंसारख्या महान कृष्णभक्तांनी भेटदेखील दिली होती.
मथुरा येथील शासकीय वस्तुसंग्रहालयात साधारण १८००-१९०० वर्षे प्राचीन असा एक शिल्पपट आहे (चित्र क्र. १). हा शिल्पपट मथुरा येथे सापडला होता. या शिल्पात एक माणूस डोक्यावर काहीतरी घेऊन एका नदीतून जात आहे. मानवी शरीर आणि नागफणा असलेला दुसरा एक माणूस, नमस्कार मुद्रेत उभा आहे. आचार्य वासुदेव शरण अग्रवाल यांच्या मते, या शिल्पपटात वसुदेव बाळकृष्णांना मथुरेतून गोकुळाकडे नेतानाच्या दृश्याचे अंकन करण्यात आले आहे.
चित्र क्र. १ स्रोत : स्नेहा नगरकर
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा मथुरा आणि आजूबाजूच्या प्रदेशांतील सर्वात महत्त्वाचा उत्सव असतो. भारतात हा उत्सव किमान हजार वषर्ें प्राचीन आहे, हे काही वाङ्मयीन उल्लेखांवरून स्पष्ट होते. हा प्राकट्य उत्सव श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री अत्यंत उत्साहात आणि साग्रसंगीत पद्धतीने, श्रीकृष्ण जन्मस्थान येथे आयोजित केला जातो. रात्री साडेअकराच्या सुमारास श्रीकृष्णांच्या विग्रहाला अभिषेक करण्यात येतो. हा अभिषेक साधारण 12 वाजेपर्यंत चालतो, आणि त्यानंतर भगवंतांच्या विग्रहाला नवीन वस्त्रालंकारांनी सजवले जाऊन आरती करण्यात येते. आरती पूर्ण झाल्यावर, अनेक भक्त यमुनेच्या दुसर्या तटावर असलेल्या गोकुळ या गावी जातात. असे मानले जाते की श्रीकृष्णांनी अनेक बाललीला महावन-गोकुळ येथे केल्या. जन्माष्टमीनंतरचा दुसरा दिवस ’नंदोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. नंदोत्सव हा मथुरा प्रदेशातील लोकसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या नंदोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे ’दधि कंधा’ हा विधी असून, यात व्रजवासी एकमेकांवर हळदमिश्रित दही ओततात. नंद आणि यशोदा यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणजेच ’दधि कंधा’. मथुरा प्रदेशातील अनेक मंदिरांमध्ये पाळणे बांधले जातात, आणि भक्तगण या पाळण्यांना हळूच झोका देतात. मथुरा प्रदेशातील अनेक लोक भगवंतांच्या प्राकट्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू, खेळणी आणि कपडे यांचे वाटप करतात. या उत्सवादरम्यान व्रजवासी ’बधाई’ ही लोकगीते म्हणतात. या गीतांद्वारे व्रजवासी नंद आणि यशोदा यांचे पुत्रजन्मानिमित्त अभिनंदन करतात :
‘नंदघर घोटा जायो । बरसाने से टीको आयो ।’
या बधाईचा अर्थ असा की, नंद यांच्या घरी घोटा म्हणजेच पुत्र जन्माला आला आहे, आणि बरसाणा म्हणजे राधेच्या गावावरून टीका म्हणजेच या शिशूसाठी स्थळ आले आहे. असे मानले जाते की राधेचे वडील वृषभानू यांना तिचा विवाह कृष्णाबरोबर करायचा होता, आणि म्हणूनच त्यांनी शगुन म्हणून हा टीका पाठवला. ‘गर्ग संहिता’ आणि काही इतर मध्ययुगीन ग्रंथांप्रमाणे श्रीकृष्ण बाल्यावस्थेत काही काळ ’नंदगाव’ या ठिकाणी राहिले. नंदगाव हे मथुरेच्या पश्चिमेस असलेले एक छोटे शहर आहे, आणि येथील टेकडीवर श्रीकृष्ण, बलराम, नंद आणि यशोदा यांचे विग्रह असलेले एक भव्य मंदिर आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते.
मथुरा प्रदेशातील मौखिक परंपरांनुसार नंदांनी पुत्रजन्मामुळे अत्यंत हर्षभरित होऊन, व्रजवासीयांना हत्ती, घोडे, पालखी इत्यादी असे अनेक उपहार दिलेः
‘ज्वानंन को हाथी घोडा बूढन को पालखी । नंद के घर आनंद भयो जय कन्हैयालाल की ॥’
काही वर्षांपूर्वी मथुरा प्रदेशात ’ढानढी’ नावाची एक प्रथा होती. यात ढानढी म्हणून ओळखले जाणारे काही जण, लोकांकडून एखाद्या मंगल प्रसंगी उपहार मागत. मथुरा प्रदेशात अशी एक समजूत आहे की, या ढानढी लोकांना नंदांनी अमाप धन दिले होते. आजकाल मंदिरांमधले गोस्वामी किंवा पुजारी ढानढी यांचा वेश धारण करून नृत्य करतात. मथुरा प्रदेशातील अनेक मंदिरांमध्ये, विशेषकरून गोकुळातील मंदिरांमध्ये श्रीकृष्णजन्माचा प्रसंग नाट्यरूपात सादर केला जातो आणि मंदिरांचे पुजारीच नंद, यशोदा आणि इतर पात्रांची भूमिका करतात. सोळाव्या शतकाच्या प्रारंभीस महाप्रभू वल्लभाचार्य यांनी पुष्टी मार्ग वैष्णव संप्रदाय स्थापन केला. या संप्रदायात रागसेवा किंवा कीर्तनसेवेला अत्यंत महत्त्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारलेली अनेक कीर्तने किंवा पदे, पुष्टी मार्गाच्या हवेली मंदिरांमध्ये गायली जातात. त्यात भगवंतांच्या प्राकट्याचे वर्णन करणारी अनेक ’बधाई कीर्तने’ यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. ही बधाई कीर्तने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात पुष्टी मार्गीय हवेली मंदिरांमध्ये गायली जातात.
जन्माष्टमीच्या दिवशी व्रजवासी व्रत करतात. निंगी पाल आणि पंजिरी नावाचे पदार्थ घरोघरी तयार केले जातात. निंगी पाल हा पदार्थ नुकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रियांना दिला जातो. रात्री भगवंतांना माखन मिश्री म्हणजेच लोणी-साखेरचा नैवेद्य दाखवला जातो. जन्माष्टमीला वृंदावनातील राधारमण मंदिरात, दिवसा राधारमणजी यांच्या विग्रहाला अभिषेक केला जातो. वृंदावनातील प्रसिद्ध बांकेबिहारी मंदिरात फक्त याच दिवशी मंगल आरती केली जाते. बांकेबिहारीजी यांच्या विग्रहाचा मध्यरात्रीनंतर, साधारण दीड वाजेपर्यंत अभिषेक होतो, आणि त्यापाठोपाठ मंगलआरती केली जाते. भक्तमंडळी सकाळी ५ वाजेपर्यंत बांकेबिहारीजी यांचे दर्शन घेऊ शकतात, आणि नंतर नंदोत्सवाची तयारी सुरू होते.
अशा प्रकारे मथुरा प्रदेशात अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात भगवान श्रीकृष्ण यांचा प्राकट्य उत्सव साजरा केला जातो. हा अनुभव खरोखरीच अतुलनीय असतो.
- स्नेहा नगरकर