पंतप्रधान मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा

    09-Jul-2024
Total Views |

Narendra Modi and Putin

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : बॉम्ब आणि बंदुकांच्या गदारोळामध्ये शांतीवार्ता शक्य नाही. चर्चा हा समस्या सोडविण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत मंगळवारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्य आणि विविध जागतिक प्रश्नांविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जागतिक शांततेस भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही जगाला दिली आहे.
 
युद्ध असो, संघर्ष असो, दहशतवादी हल्ले असो, मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला जिवीतहानी होते तेव्हा खूप त्रास होतो. निष्पाप बालकांचा मृत्यू हा ह्रदय विदिर्ण करणारा असतो. यासह युक्रेनच्या मुद्द्यावर विषयावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. जगातील कोणताही प्रश्न हा चर्चा आणि संवादाच्या मार्गानेच सोडविला पाहिजे. भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र, युद्धभूमीवर आणि बॉम्ब, बंदुकांच्या गदारोळात तोडगा आणि शांतता चर्चा यशस्वी होत नाही. संवादातून शांततेचा मार्ग स्वीकारावा लागेल. भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
संपूर्ण जग जग अन्न, खत आणि इंधनाच्या कठीण परिस्थितीतून जात असताना भारत आणि रशियाच्या मैत्रीमुळे भारतातील शेतकऱ्यांची खताची मागणी पूर्ण करू झाली. हे साध्य करण्यात आमच्या मैत्रीचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत गेल्या ४० ते ५० वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. त्यामुळे मॉस्को आणि दागेस्तानमधील दहशतवादी हल्लांच्या घटनांच्या वेदना भारत जाणतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा भारत विरोध करत असल्याचाही पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.
 
‘सेंट अँड्र्यू द अपोस्टल’ हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान – पंतप्रधान मोदी
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सेंट अँड्र्यू द अपोस्टल’ या रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी, हा सन्मान १४० कोटी भारतीयांचा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे रशिया आणि भारताची अनेक शतकांपासूनची मैत्री आणि परस्पर सन्मान, धोरणात्मक भागिदारी आणि विश्वासाचाही हा सन्मान आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रांचे संबंधांनी नवी उंची गाठली असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांना हा सन्मान देणे म्हणजे दोन्ही राष्ट्रांमधील संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या योगदानाप्रती रशियाची कृतज्ञता असल्याचे पुतीन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रशिया – भारत सहकार्य स्थैर्य आणि सुरक्षेसाठी काम करत असून दोन्ही राष्ट्रे बहुध्रुवीयतेच्या तत्त्वाचे रक्षण करत आहेत. त्यासाठी ब्रिक्स आणि एससीओमध्येही दोन्ही राष्ट्रांची धोरणे समान असल्याचेही पुतीन यांनी यावेळी नमूद केले आहे.