नाद‘निधी’

    08-Jul-2024
Total Views |
nidhi prabhu


कलेवर जिवापाड प्रेम करत, मेहनत, प्रामाणिकपणा आणि कलेप्रती संपूर्ण समर्पण अर्पित करून कथ्थक कलाप्रसाराचे कार्य करणार्‍या निधी प्रभू यांच्याविषयी...

दूरदर्शन ही एकच वाहिनी असणारा तो काळ.. त्यावेळी सगळेच कार्यक्रम याच वाहिनीवर प्रसारित होत असत. अशावेळी ‘पद्मविभूषण’ पंडित बिरजू महाराजांचे नृत्य पाहून एक अडीच वर्षांची मुलगी घरात खेळता खेळता थांबली. आपल्या बोबड्या बोलाने आईला म्हणाली, “आई, मला या आजोबांकडे शिकायचे आहे.” लहान असल्याने आईने त्याकडे गमतीनेच पाहिले. कारण, माणसांपासून लांब पळणारी माझी मुलगी हेच तिचे रुप आईला माहीत होते. मात्र, नंतर नंतर ठेक्यावर एका लयीत हळूहळू अंग हलवताना आईने पाहिले आणि त्या मुलीचा नृत्यांगना होण्याचा प्रवास सुरू झाला.

ही गोष्ट आहे ठाण्यातील निधी प्रभू यांची. डोंबिवलीतल्या एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या निधी यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड. मात्र, घरात नृत्याची अशी काहीच पार्श्वभूमी नव्हती. मात्र, आपली मुलगी इमारतीतील कार्यक्रमात रंगमंचावर गेल्यावर अधिक खुलते, हे निधी यांच्या आईच्या चाणाक्ष नजरेने अचूक हेरले. निधी यांच्या अंगातली लय लक्षात आल्याने, त्यांचे नृत्याचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. याचवेळी निधी यांनी आपल्या शहरातील स्पर्धांमध्ये भागही घेतला. “या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने माझ्यात नकार पचवण्याची क्षमता विकसित झाली, ज्याचा मला पुढच्या प्रवासात फायदा झाला. या स्पर्धांनीच मला घडवले,” असे निधी सांगतात. निधी यांच्या कुटुंबीयांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कलाकार म्हणून मुलीला मोठे करायचे हा निश्चय दृढ झाल्यावर, निधी यांच्या आईने तर अनेक नामवंत कलाकारांची आत्मचरित्रे अभ्यासून काढली. त्यांची जीवनशैली, कलेप्रती समर्पण भावना, रियाज त्याच बरोबर शारीरिक, मानसिक तयारी आणि आहार याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार निधी यांच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करून घेतला.

शिक्षण, मेहनत यांच्या जोरावर स्पर्धांमध्ये यश मिळवत असल्याने आता सर्वत्र नावलौकिक मिळू लागला होताच. वयाच्या ११व्या वर्षीच निधी ‘कलाश्री पुरस्कारा’च्या विजेत्या ठरल्या. मग दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये निधी यांनी सहभाग घेतला. अशाच एका कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक सुबल सरकार यांची कन्या किशु पाल यांनी निधीला शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर निधी यांनी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण ’भरतनाट्यम्’ या नृत्यप्रकारातून घेतले. यामध्ये त्यांनी डिप्लोमापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या गुरूंनीच कथ्थकही शिकण्याबाबत सांगितले. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून निधी यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. निधी यांच्या कुटुंबीयांनी मुलीच्या भवितव्याकडे पाहून डोंबिवली सोडून ठाणे येथे घर घेतले. गेली १७ वर्षे निधी त्यांच्या गुरू मंजिरी देव आणि पं. मुकुंदराज देव त्यांच्याकडे शिकत आहेत.

यानंतरच निधी यांचा कथ्थकचा प्रवास सुरू झाला, तो आजतागायत सुरू आहे. या काळात महाविद्यालयातील अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नृत्यकौशल्याने अनेक नृत्य स्पर्धांवर नाव कोरले. त्याचवेळी ‘मेनका पुरस्कार’, ‘नृत्यरत्न पुरस्कार’, ‘गुणरत्न पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी निधी यांना सन्मानित करण्यात आले. आजमितीला निधी यांना ४५० पेक्षा अधिक सन्मान प्राप्त झाले असून, निधी यांचे हे गुणवैभव मोठ्या अभिमानाने त्यांच्या कुटुंबीयांनी घरात जपले आहे. “आमच्या मुलीने कमावलेले वैभव एवढे देखणे असताना, घर सजवायला आम्हाला दुसर्‍या कशाचीच गरज नाही,” असे निधी यांचे बाबा सगळ्यांना सांगतात.

‘पद्मविभूषण’ पंडित बिरजू महाराज यांनी माझ्यातील कथ्थकला पूर्णत्व दिले असल्याचे निधी सांगतात. बिरजू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात नृत्य करण्याची संधी मिळाली आणि निधी यांच्यातील नृत्य खर्‍या अर्थाने समृद्ध झाले. बिरजू महाराज यांचे माझ्या जीवनातले स्थान हे परिसासारखे असल्याचे निधी सांगतात. पंडित जसराज यांच्या ‘गीतगोविंद’ या प्रकल्पात बिरजू महाराज प्रशिक्षक होते आणि कथ्थक नृत्यांगना म्हणून निधी यांनी त्यांचा कलाविष्कार महाराजांसमोर सादर केला. तो अविष्कार पाहून बिरजू महाराजांनी निधी यांना जवळ बोलावले आणि म्हणाले की, “निधी, तुझ्या नृत्यामधले अंग आणि तालीम तुझ्या गुरूंची आहे.

मात्र, तुझ्या नृत्याचा आत्मा माझा आहे.” हा क्षण भारावणारा असल्याचे निधी सांगतात. आज निधी या नृत्यक्षेत्रात अध्ययनाबरोबर अध्यापनाचेदेखील कार्य करत आहेत. ’नादनिधी’ नावाचे शिकवणी वर्ग त्यांनी सुरू केले असून, त्या माध्यमातून त्या कलाप्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड, अमेरिका येथील विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ऑनलाईन प्रशिक्षण देतात. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका संमेलनात कथ्थक नृत्य सादरीकरणाचा मान निधी यांनी मिळाला. ७६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा कथ्थकचे बोल सर्वोच्च न्यायालयात निनादले होते.

“कलेने मला आजवर खूप काही दिले आहे. आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे कलेची सेवा करण्याचे स्वप्न आहे,” असे निधी नम्रपणे सांगतात. त्यांच्या माध्यमातून देशाच्या या अमूल्य अशा सांस्कृतिक ठेव्याचा जगभरात प्रसार व्हावा, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने शुभेच्छा!

कौस्तुभ वीरकर